वेक-अप
By admin | Published: May 4, 2017 07:09 AM2017-05-04T07:09:18+5:302017-05-04T07:09:18+5:30
शिट्ट! आठ वाजले. पुन्हा उठायला उशीर झालाय. हे काम काल रात्रीच संपवायला हवं होतं. कधी बरं झोपलो रात्री? दीड वाजला
शिट्ट! आठ वाजले. पुन्हा उठायला उशीर झालाय. हे काम काल रात्रीच संपवायला हवं होतं. कधी बरं झोपलो रात्री? दीड वाजला होता वाटतं. आणि हे असं खुर्चीतच झोपलो? लाइट्स चालू, पंखा चालू, लॅपटॉप चालू. तरी बरा चार्जिंगवर आहे. काय काय सेव्ह झालंय पाहायला हवं. आठवत नाहीये. मान दुखतेय. थंडी वाजतेय.
यार हे असं एकटं राहण्यात हाच मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. काळजी घ्यायला कुणीच नाही. घरी असतो तर रात्रीच आजोबांनी गादीवर झोपवलं असतं. मानेपासून पायापर्यंत पांघरूण घातलं असतं. सकाळी आई आली असती. रात्री मी सांगितलेल्या वेळी उठवायला. घरी असणं सुख आहे.
पण नाही.
आपलं आपल्याला जमायला हवं सगळं.
हो, म्हणून तर ना हा सगळा आटापिटा. आणि जमतं पण की कधी कधी. स्वत:ला कधी काय हवं नको ते कळणं, स्वत:ची नीट काळजी घेणं. ही झोप मात्र सगळा हिरमोड करते. कितीही टक्क जागं राहायचं ठरवलं, कितीही चहा कॉफी ढोसली तरी डोळे आपोआप मिटू लागतात. डोक्यात आवाज येऊ लागतात. पुरे झालं. दमलोय. झोपू आत्ता. सकाळी लवकर उठून काम करू. फ्रेश असू तर फटाफट होईल.
नस्ते लाड स्वत:चे!
कशाला लागते इतकी झोप? मुळात काम असताना झोप येतेच कशी बरं? असं कोणतं काम असेल जे करताना झोप विसरून जायला होईल? ते म्हणतात तसं जगणंच स्वप्न होईल आणि मग झोप येणारच नाही वगैरे वगैरे. सब बकवास.
हवं तेव्हा हवं तेवढं जागता यायला हवं आणि हवं तेव्हा हवी तेवढी झोप. कशी बरं करावी प्रॅक्टिस? विचार करायला हवा. पण आत्ता नको. आत्ता सगळ्यात आधी लेट्स वेक-अप.
काम खत्म किया जाय.
हो जाय एक कप चाय!
- प्रसाद सांडभोर -