नवं आयुष्य देणारं ‘वॉकर’

By admin | Published: March 23, 2017 09:30 AM2017-03-23T09:30:38+5:302017-03-23T09:30:38+5:30

बिहारच्या पटण्याची शालिनी कुमारी. लहानपणापासून ती पाहात होती आपल्या आजोबांचं पानाफुलांचं आणि गार्डनचं वेड.

'Walker' | नवं आयुष्य देणारं ‘वॉकर’

नवं आयुष्य देणारं ‘वॉकर’

Next

 पाटण्याच्या शालीनीची कल्पक कमाल


बिहारच्या पटण्याची शालिनी कुमारी. लहानपणापासून ती पाहात होती आपल्या आजोबांचं पानाफुलांचं आणि गार्डनचं वेड. घरात जागा कमी असल्यामुळे आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी थेट आपल्या घराच्या टेरेसवरच छान बाग फुलवली. दिवसाचा त्यांचा बराचसा वेळ या बागेतच जायचा. या बागेनं त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ अतिशय प्रसन्न केली होती आणि नवी ऊर्जाही त्यांना दिली होती. त्यांच्या प्रेमामुळे गच्चीवरची बागही कशी फुलून आली होती. या बागेनं अख्ख्या घरातच आनंदाचे गुलाब फुलवले होते.


अचानक एके दिवशी शालिनीच्या आजोबांना अपघात झाला. त्यांचं चालणं-फिरणं बंद झालं. वॉकर घेऊन त्यांना चालावं लागू लागलं. या वॉकरच्या साहाय्यानं अंगणात तर ते फिरत, पण गच्चीवरच्या आपल्या आवडत्या बागेत जाणं मात्र त्यांचं कायमचं बंद झालं. त्याचा विषाद त्यांच्या चेहऱ्यावर कायम झळकायचा. छोट्या शालिनीला आजोबांकडे पाहून फार दु:ख व्हायचं. एवढंसं साधं वॉकर. पण ज्याच्या सहाय्यानं तुम्ही जिने चढू आणि उतरुही शकाल असं वॉकर मार्केटमध्ये का मिळू नये? त्यासाठी तिनं आणि घरातल्या लोकांनी अख्खं मार्केट पालथं घातलं, पण सगळीकडे नन्नाचा पाढा!
काय करावं काही सूचत नव्हतं. त्यावेळी ती नववीत शिकत होती.

तिच्या मोठ्या भावाचा मित्र चांगलाच खटपट्या होता. सतत काही ना काही करत राहायचा. ‘आॅटोमॅटिक फूड मेकिंग मशीन’ त्यानं बनवलं होतं आणि त्याबद्दल त्याला ‘एनआयएफ’चा पुरस्कारही मिळाला होता. त्यानं शालिनीला प्रोत्साहन दिलं आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनशी (एनआयएफ) संपर्क साधायला सांगितला. ‘एनआयएफ’च्या सांगण्यावरुन तिनं आपल्या प्रोजेक्टला सुरुवात केली. 
अगोदर आपली कल्पना तिनं कागदावर लिहून काढली. आपल्या आजोबांना आणि त्यांच्यासारख्या वृद्ध, अपघातग्रस्त आणि अपंग लोकांना ज्या अडचणी येतात, त्या डोळ्यांसमोर ठेवल्या. त्यांच्या सर्व समस्या कमी करू शकतील असा वॉकर कसा तयार करता येऊ शकेल यासाठीची असंख्य डिझाइन्स तयार केली. चित्रं काढली. आपली कल्पना स्पष्ट केली आणि आपला हा प्रोजेक्ट दिला ‘एनआयएफ’कडे पाठवून.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार हजार प्रवेशिकांमधून शालिनीचा हा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला आणि तरुण संशोधकांसाठीचा ‘इग्नाइट’ पुरस्कारही तिला मिळाला. 
‘एनआयएफ’ एवढ्यावरच मात्र थांबलं नाही. त्यांनी शालिनीची ही आयडिया आणखी डेव्हलप केली. वेगवेगळ्या डिझाइन्सचे आणखी काही आराखडे तयार केले. या वॉकरसाठी स्वस्त आणि दर्जेदार असं कुठलं मटेरिअल वापरता येईल यासाठीच्या चाचण्या घेतल्या आणि शालिनीच्या कल्पनेतलं वॉकर प्रत्यक्षात तयारही केलं. या वॉकरचं पेटण्ट शालिनीला मिळावं आणि बाजारात हे उत्पादन लोकांना उपलब्ध व्हावं यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. नागपूरच्या एका उत्पादकानं व्यापारी तत्वावर त्याचं उत्पादनही सुरू केलं. अशा प्रकारची दहा हजार वॉकर्स तयार करायचा संकल्प त्यांनी केला आहे. 
शालिनीच्या कल्पनेनुसार तयार झालेलं हे वॉकर अतिशय आगळंवेगळं आणि अगदी लहान मुलापासून कोणालाही ते वापरता येईल असं आहे. 
या वॉकरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अ‍ॅडजस्टेबल आहे. चार पायांच्या या वॉकरचे पुढचे दोन पाय कोणत्याही प्रकाराच्या चढउतारासाठी अ‍ॅडजेस्टबल असे आहेत. ‘स्प्रिंग लोडेड सेल्फ लॉकिंग सिस्टीम’ त्यात आहे. त्यामुळे केवळ जिने चढणं उतरणंच नाही, तर चढ-उताराच्या जमिनीवरही हे वॉकर अत्यंत उपयुक्त आहे. या वॉकरला घंटी आहे. अंधारातही ते वापरता यावं यासाठी दिव्याची सोय आहे. एवढंच नाही, तर थकल्यावर बसता यावं यासाठी फोल्डेबल सिटची सोयही त्यात केलेली आहे. या वॉकरचं डिझाईन तयार करताना शालिनीनं या सर्वच गोष्टींचा अगदी बारकाईनं विचार केला होता.
या वॉकरचं वजन आहे केवळ चार किलो, पण शंभर किलोपर्यंतचं वजन हे वॉकर सहजपणे पेलू शकतं. वृद्ध, लहान मुलं, अपंग, अपघातामुळे शरीराचा खालचा भाग पंगू झालेले अपघातग्रस्त, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण, आजारी व्यक्ती, वृद्धाश्रमातील लोक, पुनर्वसन केंद्रं, ज्याठिकाणी लिफ्टची सोय नाही अशा जागा, बहुमजली इमारती.. अशा अनेक ठिकाणी आणि लोकांसाठी हे वॉकर अत्यंत उपयोगी ठरेल. 
शालिनी म्हणते, माझ्या आजोबांसाठी अ‍ॅडजस्टेबल वॉकर तयार करण्यासाठी मी धडपडले, पण लाखो लोकांना त्याचा उपयोग होणार आहे, याचा मला खूपच आनंद आहे!

Web Title: 'Walker'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.