फिटनेस हवाय? सोप्पंय. - ही घ्या यादी..
By admin | Published: April 25, 2017 04:22 PM2017-04-25T16:22:02+5:302017-04-25T17:04:24+5:30
आपण रफटफ असावं, फिट राहावं यासाठी आजकाल सगळेच तरुण जिममध्ये घाम गाळताना दिसतात
Next
- मयूर पठाडे
आपण रफटफ असावं, फिट राहावं यासाठी आजकाल सगळेच तरुण जिममध्ये घाम गाळताना दिसतात.
त्यामुळेच व्यायाम आणि फिटनेस म्हटलं, की डोळ्यासमोर सगळ्यात आधी जिम आणि व्यायामशाळा येतात हे जरी खरं असलं, तरी व्यायाम करण्यासाठी जिममध्ये किंवा व्यायामशाळेतच जावं लागतं हे मात्र खरं नाही.
अनेकदा आर्थिक कारणांनी, किंवा वेळ नसल्यामुळे, किंवा मुलींना सामाजिक दडपणामुळे जिममध्ये वगैरे जाऊन व्यायाम करणं शक्य होत नाही. अशा वेळेला असे खूप साधे सोपे व्यायामप्रकार आहेत, जे कोणीही घरीसुद्धा करू शकतं.
आणि त्यासाठी काही महागडी साधनंही लागत नाहीत.
फिट राहाण्यासाठी काय करता येईल?
अगदी सोप्या सोप्या गोष्टी.
ही घ्या यादी.
1. चालणं.
2. पळणं.
3. सूर्यनमस्कार.
4. पी. टी.चे हात करणं.
5. गाण्याच्या तालावर मनसोक्त नाच करणं.
6. पुशअप्स मारणं. (जमिनीला समांतर झोपून, जमिनीवर हात टेकवून हातांच्या ताकदीवर शरीर वर उचलणं.)
7. सिटअप्स मारणं. (पाठीवर झोपून पाय न हलवता कमरेतून शरीर वर उचलणं आणि पुन्हा झोपणं.)
8. जोरबैठका मारणं.
9. बेंडिंग करणं. (शरीर कमरेतून पुढे, मागे आणि बाजूला शक्य तेवढं वाकवणं आणि पुन्हा सरळ करणं.)
10. स्ट्रेचिंग करणं. (शरीर कमरेतून पुढे, मागे आणि बाजूला शक्य तेवढं वाकवणं आणि पुन्हा सरळ करणं.)
11. मैदानावर जाऊन काहीही खेळणं.
वर दिलेले किंवा कुठलेही व्यायाम करताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे.
रोज 40 मिनिटं ते 1 तास व्यायाम करणं हे जरी आपलं ध्येय असलं, तरी हा व्यायाम आपण अचानकपणे करायला सुरुवात करू शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे.
15 मिनिटांनी सुरुवात करून हळूहळू वेळ वाढवत 40 मिनिटांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे रोज एकच एक प्रकारचा व्यायाम करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे दोन फायदे होतात.
एक म्हणजे वेगवेगळ्या स्नायूंना व्यायाम होतो आणि दुसरं म्हणजे कंटाळा येत नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे व्यायाम करताना टार्गेट हार्ट रेटवर लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचं गणित तसं सोपं आहे.
220 वजा तुमचं वय याचं जे उत्तर येईल त्याचे 70 टक्के काढायचे.
हुश्श!
ती जी संख्या येईल तो तुमचा टार्गेट हार्ट रेट.
म्हणजे तेवढे नाडीचे ठोके एका मिनिटात पडले पाहिजेत.
आणि असे ठोके पडणारा व्यायाम कमीत कमी 20 मिनिटं रोज केला पाहिजे.