एका तपाचं वजन

By admin | Published: August 7, 2014 09:40 PM2014-08-07T21:40:53+5:302014-08-07T21:40:53+5:30

गणेश फक्त २0 वर्षांचा आहे. कुरुंदवाडच्याच कुमार विद्यामंदिरात प्राथमिक तर एस. पी. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण त्यानं पूर्ण केलं.

The weight of a check | एका तपाचं वजन

एका तपाचं वजन

Next
>गणेश फक्त २0 वर्षांचा आहे.
कुरुंदवाडच्याच कुमार विद्यामंदिरात प्राथमिक तर एस. पी. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण त्यानं पूर्ण केलं. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. वडील पेंटर. एकट्याच्या जिवावर संसार कसा चालवायचा याचा विचार करून दुसर्‍याच्या शेतात मजुरी करायला जाणारी आई. चार काका. ते सुतार काम करतात. आपला मुलगा व्यायामशाळेत जाऊन वजन उचलतो, त्यातून त्याला नोकरीही लागते, याचं अप्रूप वाटावं अशी स्थिती. या वजनं उचलण्यामुळेच त्याला हवाई दलात नोकरी लागली तेव्हा तर त्यांचं आकाश ठेंगणं झालं होतं. 
पण हा खेळही सोपा कुठला. त्याला खुराक भरपूर लागतो. तो आणायचा कुठून? पण गणेशच्या आईवडिलांनी पोटाला चिमटे काढून त्याला खेळू दिलं. दुसर्‍यांची घरंदारं रंगवून गणेशच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांनी रंग भरले. दुसर्‍याच्या शेतातील बांधावर खुरपून आईनं गणेशच्या आयुष्याला उभारी दिली. जवळजवळ १२ वर्षं त्यांनी हा परिपाठ पाळला. एक तप पूर्ण केलं. ते फळाला आलं. आपले आई वडील, मित्र, प्रशिक्षक यांची कष्टाची जाण असलेल्या गणेशनं त्याच्या आई वडिलांनीच काय पण गावातल्या कुणीच कधी नकाशातही न पाहिलेल्या दूर स्कॉटलँडच्या ग्लासगो शहराच्या मातीत वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. 
त्यादिवशी पहाटे तीनच्या सुमारास गणेशनं कांस्यपदक मिळविलं, तेव्हा त्याचे आईवडील कुरुंदवाडच्या यशस्वीनगरातील दोन खोल्यातल्या कौलारू घरात आपल्या मुलाचा कौतुक सोहळा पहात रात्रभर जागले.  टीव्हीवरून हात फिरवत त्याची मायेनं दृष्ट काढली. गावातील लोक जेव्हा सकाळी अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घराकडे धावत होती, तेव्हा ते दोघे नेहमीप्रमाणे आपापल्या कामाच्या ठिकाणी निघूनही गेले होते. कुणीतरी बोलावून आणलं आणि मग त्यांचं घर माणसांनी भरून गेलं.
गणेशचा चुलत भाऊ रवींद्र माळी हा वेटलिफ्टिंगचा राष्ट्रीय खेळाडू होता. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गणेशनं व्यायामशाळेत जायला सुरुवात केली. २0१0 मध्ये मलेशिया येथे झालेल्या १७ वर्षाखालील सबज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी झाला, पण यश मिळालं नाही. वरच्या स्तरावर खेळलो तरच स्पर्धेत चांगली कामगिरी करता येईल, असं वाटून त्यानं मेहनतीला सुरुवात केली. नागपूरच्या राष्ट्रीय चाचणी स्पर्धेत त्याची निवड झाली आणि त्याचा सराव सुरू झाला. याच खेळानं त्याला चंदीगडच्या एअरफोर्समध्ये नोकरी मिळवून दिली. आज तो शिपाई पदावर आहे. आणि त्याचा जिंकण्याचा प्रवास खरंतर सुरू झालाय.

Web Title: The weight of a check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.