मोकळा हो! १८ वर्षांचा अमेय ‘आज’च्या अमेयला काय सांगेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:01 PM2018-01-04T12:01:53+5:302018-01-04T12:02:38+5:30
खरं तर त्यानंच आजच्या अमेयला काहीतरी सांगायला हवं...
- अमेय वाघ
१८ वर्षांचा अमेय.
त्याला आज मी काय सांगणार?
खरं तर त्यानंच आजच्या अमेयला काहीतरी सांगायला हवं. ..आणि ‘आजच्या’ अमेयने त्या ‘१८ वर्षांच्या’ अमेयचं ऐकायला हवं आणि जमलं तर तसं वागायलाही हवं..
१८ वर्षांचा अमेय काम करायचा?
काहीही करायचा; पण त्यात एक इनोसन्स होता. त्या इनोसन्सनं काम करताना त्यानं रिझल्टचा विचार कधी केला नाही. वाटलं ते केलं. आपण हे का करतोय, त्यातून पैसा किती मिळणार, नाटक चालेल का असं काही डोक्यात नसायचं. ‘पुढे काय होणार’ या प्रश्नाचं काही पडलेलंच नसायचं.
मुख्य म्हणजे १८ वर्षांच्या अमेयच्या रोजगाराचं साधन नव्हतं अभिनय करणं. एक कला म्हणून तो ते काम करायचा. आपण जे काम करतो ते चांगलंच व्हावं हाच एकमेव हेतू मनात होता. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती होती.
व्यक्तिगत आयुष्यात नाती ओळखण्यात तो जरा चाचपडत होता. आपली जवळची माणसं कोणती आणि जवळचेच आहोत हा भास निर्माण करणारी कोणती हे त्या वयात चाचपडत का होईना हळूहळू त्याला समजलंच. त्यातूनही तो शिकला.
मुळात चुका करण्यात, नवीन काहीही करून पाहताना डोक्यात काही इन्हिबिशन्स नव्हती. कसला संकोच, कसल्या शंका नव्हत्या. जे जे वाटलं ते करून पाहायचा. बिनधास्त होता तो. त्या काळात अनेक गोष्टी करून पाहताना नवीन माणसं भेटायची, नवीन जग कळायचं. जो माणूस भेटला, त्याचं आयुष्य मस्त वाटायचं. त्या माणसांवर शिक्के मारायची कसली घाई नव्हती, गरजही वाटत नसे.
त्याला काहीतरी निर्माण करायचं होतं, त्यासाठी तो धडपडत होता.
आणि म्हणून तो आजच्या अमेयला भेटायला हवा.
या ‘मोठ्या’ झालेल्या अमेयला त्या ‘बिनधास्त’ अमेयनं काही गोष्टी सांगायला हव्यात.
त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बिनधास्त हो.
काम करताना ते यशस्वी होईल का, लोकांना आवडेल का हा प्रश्न जसा पूर्वी महत्त्वाचा नव्हता, त्याहून महत्त्वाचं होतं ते जे वाटलं ते करून मोकळं होणं, तसं करून बघ. जमेलच असं नाही, पण करून तर बघ !
मुख्य म्हणजे माणसांविषयी, कामाविषयी जजमेण्टल होऊ नकोस.
पूर्वी जगताना जशा अनेक गोष्टी करायचास, त्या करताना पैशाचा, धोक्यांचा फारसा विचार करायचा नाहीस, ते पुन्हा कर.
ते तसं मोकळं, बिनधास्त आणि मस्त जग !
१८ वर्षांच्या अमेयला जमलं होतं..
या ही अमेयला जमेल.. जमायला हवं!