डेकोरेशनचं काय?

By Admin | Published: September 1, 2016 01:20 PM2016-09-01T13:20:54+5:302016-09-01T13:20:54+5:30

बाप्पा परवा वाजतगाजत येतील, पण त्यांच्या स्वागताचं आणि सजावटीचं काय? निसर्गाशी फारकत घेऊन तर आपण ही सजावट करत नाही ना?

What about decoration? | डेकोरेशनचं काय?

डेकोरेशनचं काय?

googlenewsNext
>- आल्हाद पाटील
 
आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला प्रश्न असेल तर तो म्हणजे गणपतीचं डेकोरेशन काय करायचं?
हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. उत्तर म्हणून बरीच खटपट करावी लागते. आणि तरीही वाटतंच की, यंदा काही खास जमलं नाही पुढच्या वर्षी भारी डेकोरेशन करू. आधीपासून तयारी करु..
मात्र पुन्हा जी व्हायची ती घाई होतेच.
त्यावर पर्याय म्हणून मग अनेकजण धावतपळत बाजारात जातात. थर्माकोलची मखरं आणि झिरमिळ्या उचलून आणतात. झालं डेकोरेशन.
पण आता असं काही करायची खरंच गरज उरलेली नाही. कारण डेकोरेशनच्या अनेक आयडिया आॅनलाइनही उपलब्ध आहेत. यूट्यूबवर अनेक व्हिडीओ आहेत आणि आपल्याला पाहून पाहून सहज करता येतील अशा डेकोरेशनच्या अनेक गोष्टीही आहेत.
मात्र हे सारं करताना निदान आपल्या घरातली सजावट तरी पर्यावरणपूरक असावी, न संपणारा कचरा करू न ठेवू नये याची आपण काळजी घ्यायला हवी.
त्यासाठीच या काही साध्यासोप्या टिप्स..
त्यावरून तुम्हाला इकोफ्रेण्डली डेकोरेशन करता येऊ शकतं आणि कदाचित त्यावरून काही अजून भन्नाट आयडियाही सुचू शकतात.
 
१) गणपतीला ‘गणपती’चेच डेकोरेशन का असू नये? त्यासाठीच ही कागदाच्या गणपतीच्या डेकोरेशनची आयडिया का करू नये? वर्तमानपत्राचे कागद घ्या. ते पाण्यात भिजवा. त्याचे लाडू करा. एक मोठ्ठा बेसवाला पसरट लाडू करा. त्याच्यावर दुसरा गोल आणि त्याच्यावर तिसरा. असं साधारण दोन फिटपर्यंतही ते करू शकतात. मग कान, सोंड असं सारं तांदळाच्या कांजीनं चिकटवा. त्यावर रंग म्हणूनही भाज्यांचे रंग, हळद, कुंकू, गेरु, चुना, मुलतानी माती, चंदन असं सारं वापरून रंगवा. तुम्ही स्वत: बनवलेला एक सुंदरसा गणपती तुम्ही तयार करू शकता. हा गणपती हेच तुमचं डेकोरेशन.
 
२) हे एवढं सारं करायला वेळ नसेल तर थोडे पैसे जास्त खर्च करा आणि रोज नवनवीन फुलं आणा. आणि रोज फुलांचं डेकोरेशन नवीन करा. साऱ्या घरात हा गंध आणि प्रसन्नता खुलेल!
३) याहूनही सोपा उपाय म्हणजे घरातले दुपट्टे, स्कार्फ यांच्यापासून पडद्यांसारखं कलरफूल डेकोरेशन करता येतं.
४) तुम्हाला क्विलिंग येत नसलं तरी काही बिघडत नाही. कागद वेगवेगळ्या आकारात कापून त्यापासून विविध प्रकारची, विविध रंगांची फुलंही बनवता येऊ शकतात.
५) त्या स्वत:च बनवलेल्या फुलांच्या माळा करा आणि त्या माळा गुंफत रंगीत सजावट करता येईल.
६) कागदाची वेगवेगळी तोरणं करता येतील.
७) नवरात्रात जसे गहू लावतात घटासमोर तसंच माती आणून गणपतीसमोर एक छोटुसं शेत दहा दिवसात तयार करता येईल.
९) बाजारात विविध छोट्या मोटारी मिळतात त्या वापरून घरच्याघरी सुंदर कारंजेही बनवता येतात.
१०) बाजारात मिळणारे टिश्यूपेपर वापरून, त्यांच्या रोलपासूनच मखर तयार करता येईल.
 
पर्यावरणस्नेहीच का?
गणपतीचं डेकोरेशन इकोफ्रेण्डली अर्थात पर्यावरणस्नेहीच करा, हा आग्रह आता वारंवार होतो. पण असं का?
म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून काळजी घ्यायला हवी हे मान्य; पण मग चमकधमकवालं डेकोरेशन करायचंच नाही का?
- असा प्रश्न अनेक तरुण मुलांना पडतो.
मात्र त्यावर साधं उत्तर हेच की, जो कचरा आपण नष्ट करू शकत नाही, जो नैसर्गिकदृष्ट्या विघटनयोग्य नाही, तो आपण का निर्माण करायचा?
आपला आनंद आपण निसर्गाशी दोस्ती असलेल्या गोष्टी वापरूनही उत्तम साजरा करू शकतोच ! त्यात प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती वापरल्यानं तर विसर्जनानंतर पाण्याचं प्रदूषण कैकपट वाढतं. सेण्ट्रल बोर्ड आॅफ पॉप्युलेशन कण्ट्रोलच्या अभ्यासानुसार, पर्यावरणस्नेही सजावट नसल्यानं विसर्जनानंतर पाण्यात अ‍ॅसिड पातळी वाढते. मेटलचं प्रमाण २०० ते ३०० टक्क्यांनी वाढतं आणि पाण्यात विरघळणाऱ्या विषारी घटकांचं प्रमाणही १०० टक्के वाढतं.
त्यामुळेच आपण जितकी पर्यावरणस्नेही सजावट करू तेवढा बाप्पा अधिक प्रसन्न होईल, अशी आशा ठेवायला हरकत नाही.

Web Title: What about decoration?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.