घरच्यांच्या अपेक्षांचं करता काय?

By admin | Published: June 8, 2017 11:46 AM2017-06-08T11:46:38+5:302017-06-08T11:46:38+5:30

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न

What are the expectations of households? | घरच्यांच्या अपेक्षांचं करता काय?

घरच्यांच्या अपेक्षांचं करता काय?

Next

 निर्माण आणि ऑक्सिजन

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
 
गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
 
म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..
त्यातला हा सहावा प्रश्न : आपल्याला जे करायचं ते आणि आईबाबांच्या अपेक्षा यांचा मेळ कसा घालता?
 
ट्रेलर दाखवा, पिक्चर क्लिअर होईल!

बोलून प्रश्न सुटू शकतात, हे का विसरायचं?
 
 
दहावीनंतर आपल्या मुलाने इंजिनिअर व्हावं असं माझ्या घरी वाटतं होतं. त्याप्रमाणे मी प्रवेशही घेतला आणि वर्षभरात ते सोडलंही. मुळात मला क्र ीडा क्षेत्राची आवड असल्यानं तसं त्यांना थेट कळवून मी कला शाखेत प्रवेश घेतला आणि हिंदी विषयात पदवी पूर्ण केली. यादरम्यान अनेक छोटी मोठी कामं केली. अनेक शिबिरं आणि खेळांसाठी भरपूर प्रवास केला. मात्र या प्रत्येक वेळी आपला मुलगा समाजासाठी हानिकारक काम करत नाही तसंच त्याला दिलेल्या मोकळीकेचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करत नाही हा विश्वास मी घरच्यांना दिला त्यामुळे मला सर्व कामे पार पाडता आली.
पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्णयाची वेळ आली.
यावेळीही माझा आत्मविश्वास, मी करत असलेली कामं, माझी मित्रमंडळी आणि मी वावरत असलेला परिसर आणि एकंदर माझा आणि त्यांच्यात असलेला प्रत्येक छोटा मोठा संवाद यामुळे मला कधीही निर्णय घेताना त्यांनी रोखलं नाही. 
वैयक्तिक आयुष्यात घेतलेले सर्व निर्णय जर तुमचे असतील तर त्याचे काहीही परिणाम येत्या काळात झाले तरी डगमगायचं नाही याबाबतीत आईवडिलांचं आणि माझं एकच मत आहे. त्यामुळे पदवीनंतर मला व्यावसायिक समाजकार्य शिक्षणासाठी त्यांनी कोणताही विरोध केला नाही. एकूणच सांगायचं झालं तर आपण करत असलेल्या कामात आईवडिलांचा प्रत्यक्ष सहभाग आणि त्यांचं मार्गदर्शन घेत गेलो की प्रत्येक निर्णय सोपा होत जातो.
 
निर्णयप्रक्रियेत मला उपयुक्त ठरलेल्या काही गोष्टी..
१. कोणतंही काम तुम्ही करत असाल त्याची योग्य आणि परिपूर्ण माहिती पालकांना द्यावी.
२. शक्य तितकं तुमच्या कामात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नोंदवून घ्या.
३. आपली मित्रमंडळी आणि त्यांच्या आवडीनिवडी घरच्यांना माहिती हव्यात. तसंच त्यांची भेट अधूनमधून घालून द्यावी.
४. आपली ठरावीक विषयांत असलेली परिपक्वता त्यांना स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करावा.
५. आपल्या डोक्यात चालत असलेली विचारांची वर्दळ कागदावर मांडण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न करावा. आपला अ‍ॅक्शन प्लॅन त्यांना दाखवावा, समजावून सांगावा. 
६. वैचारिक मतभेद मांडावेत, पण नेमकेपणानं. खुली चर्चा घडवून विचारात स्पष्टता आणून कृती करावी. - अविनाश पाटील, निर्माण ६
 
आईबाबा आणि आपण ही एकच टीम
आपल्याला त्यांच्या विरोधात उभं राहायचं नाही, तर चुकीच्या गोष्टींविरोधात लढायचंय.
आईबाबा आणि माझं बऱ्याच गोष्टींवर मत जुळायचं नाही, मग ते माझं काम/करिअर असो की लग्न.
आईबाबांचं मत होतं की मी आयटी कंपनीत काम करावं आणि मला सामाजिक प्रश्नावर काम करायचं होतं. खूप वेळा वाद/मतभेत व्हायचे आमच्यात. पण इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले.
 
माझ्यासारखाच विचार करणारे इतर मित्रमैत्रिणी त्यांना दिसले तेव्हा विरोध कमी झाला. तसंच लग्नाच्या बाबतीत. अनेक वेळा मी पत्र लिहून, समोर बसून चर्चा करून त्यांना मला माझा जोडीदार कसा हवाय हे समजून सांगितलं. मुलगा बघताना ते त्याचं घर, पगार नीट आहे का, नोकरी कशी आहे हे बघत. पण आमच्यातल्या चर्चेमुळे मूल्य, काम, स्वप्न, विचार या सगळ्या गोष्टी जुळायला हव्यात असं मला वाटे. 
 
आम्ही घरात बोलत राहिलो. ते माझं ऐकत. आणि मग त्यांनाही काही अंशाने हे सारं महत्त्वाचं आहे हे हळूहळू पटतंय.
थोडक्यात काय तर, आपण आणि आईबाबा एकाच पार्टीत असतो. ही लढाई आईबाबा विरुद्ध आपण अशी कधीच नसते. नसावी. आईबाबा आणि आपण विरुद्ध समाजातील मागासलेले विचार, रूढी, परंपरा असा तो संघर्ष असतो. आईबाबांना सोबत घेऊन आपण तो लढलो तर आपली वाट सुकर होते. गरज आहे ती थोडं आपण त्यांना समजून घ्यायची. आणि ते करतानाही आपल्या निर्णयांवर ठाम राहण्याची. थोडा त्रास होतो, पण जमतं. 
- ऋतुजा जेवे, निर्माण
 
समजून कुणी घ्यायचं?... आपण
 
आपण काही वेगळं करू पाहतोय, तर आपण राग न येऊ देता मार्ग काढले पाहिजेत.
आजचा समाज, आरामदायी सुख-सुविधा व पैसे यांच्यातच आनंद शोधत आहे. या आनंदाच्या समीकरणात सर्वच आपले उज्ज्वल भवितव्य शोधत आहेत. या परिस्थितीत, माझा मुलगा जीवनात सो कॉल्ड सुख-सुविधांना सोडून सुरक्षित कसा राहणार? असल्या प्रश्नामुळे आई-वडील चिंतित असतात. 
यापेक्षा मोठा प्रश्न म्हणजे, ‘लोक काय म्हणतील?’ हा असतो. आपला मुलगा चांगले काम करतो, त्याचे विचार पण चांगलेच आहेत असं वाटत असलं तरी ‘लोग क्या कहेंगे?’ हा प्रश्न सर्व प्रकारच्या सकारात्मक विचारांना सप्रेस करतो. 
बऱ्याच वेळा आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र जमून समजावण्याचा प्रयत्न करतात. एवढे सर्व एकत्र बोलतात तेव्हा एकाच बाजूने संवाद होतो. नातेवाइकांमध्ये काही डॉमेनेटिंग लोक असतात. आणि त्यांच्या समोर अनेकदा आपल्या गळ्यातून आवाज पण निघत नाही. 
माझ्या घरीही असं सारं घडलंच. सर्वांचं समजवून झाल्यावर मला सपोर्ट करणारा लहान भाऊसुद्धा आज तुझा पीसीआर निघाला म्हणत मला चिडवतो. मी मात्र नेहमी शांत राहून उत्तर देत असतो. त्यांना असणारी काळजी लक्षात येते म्हणून विचार पटत नसले तरी त्यांचा राग मुळीच येत नाही. 
लहानपणापासून मी एक गुडबॉय होतो. घरच्यांचे ऐकणं, अभ्यास करणं, अनुशासनात राहणं इत्यादी. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा पण जास्तच वाढलेल्या.
मग मला जे योग्य वाटतं ते करताना मी काही गोष्टी नक्की करतो.
१. आई-वडिलांसोबत माझ्या कामाविषयी खरं बोलतो. बरीच मुलं-मुली घरच्या लोकांसोबत खोटं बोलून चांगले राहण्याचा प्रयत्न करत असतात. मी कामाविषयी, मित्रांविषयी नेहमी घरी खरं सांगतो. सर्चला निर्माण शिबिर असो की सालईबनला झुंज दुष्काळाशीचे शिबिर, मेळघाटात काम असो की मध्य प्रदेशला ट्रेनिंग असो.. घरी खरं सांगतो. खोटं बोलून त्यांना समाधानी ठेवणं मला चुकीचं वाटतं.
२. फक्त विरोध करायचा आहे म्हणून विरोध न करणं. जे अनेकजण न कळत करतात.
आपले घरच्यांसोबत काही मतभेद असतात. पण म्हणून प्रत्येक वेळी त्यांना विरोध करणं योग्य नसतं. फक्त मला वाटते म्हणून मी त्यांना विरोध करतो आहे की काय हे पाहावं. जे त्यांचं योग्य वाटेल त्याचाही विचार करावा.
३. आई-वडिलांच्या गरजा आणि अपेक्षांना वेगळं करून निर्णय घेणं. मुलाने आपलं कर्तव्ये नक्कीच पार पाडायला हवीत. आई-वडिलांच्या, आप्तेष्टांच्या, पत्नीच्या, मुलांच्या तर सोडाच स्वत:च्या अपेक्षांना पण पूर्ण करणं कोणालाही शक्य नसतं. पण गरजा मात्र नक्की पूर्ण करायला हव्यात. अपेक्षा वेगळ्या, गरजा वेगळ्या.- प्रतीक उंबरकर, निर्माण ६

Web Title: What are the expectations of households?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.