विराट कोहली ते आदित्य ठाकरे यांच्यात काय कॉमन आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:22 PM2019-11-01T12:22:40+5:302019-11-01T12:22:48+5:30
सध्या तरुण मुलांच्या जगात दाढी वाढवणं, रुबाबदार मिशा ठेवणं याची भलती क्रेझ आहे.
- स्वप्नील शिंदे
दाढी-मिशी ठेवणं किंवा दाढी वाढवणं हे एकेकाळी तरुणांच्या जगात गबाळेपणा किंवा असभ्यपणाचं मानलं जात होतं. क्लीन शेवची मोठी क्रेझ होती. चॉकलेट हिरो लूक तरुणांमध्ये फार लोकप्रिय होता. त्यातही आमीर खान, शाहरूख खान, सलमान आणि सैफ यांचे लूक हे तरुणांमध्ये भयंकर आवडते होते. आपण तसं चॉकलेटी, रोमॅण्टिक दिसावं असा एक अट्टाहासही होता.
मात्र आता हा ट्रेण्ड पूर्णपणे बदलला आहे. दाढी-मिशा हे
रु बाबदार तरुण व्यक्तिमत्त्वाचं लक्षण मानलं जाऊ लागलं आहे. आणि जो पहावा तो तरुण दाढी वाढवून फिरताना दिसतो आहे. त्यातच सध्या अनेक सेलिब्रिटी कलाकार, खेळाडूंसोबत राजकीय नेतेही दाढी-मिशा राखण्यावर भर देत असल्यानं तरुणांमध्ये त्याची क्रे झ आणखी वाढली आहे.
आपल्या भारतीय क्रिकेट टीमचंच उदाहरण घ्या, एक महेंद्रसिंग धोनीचा अपवाद वगळला तर आजच्या घडीला संघात खेळणार्या अनेकांनी दाढी राखलेली आहे. शिखर धवनच्या बब्बर मिशा लोकप्रिय आहेत. कोहलीच्या दाढीचे तर केवढे चर्चे, त्यासारखी दाढी ठेवायची फॅशन आता अगदी कॉलेंजगोइंग तरुणांतही दिसते आहे. एरव्ही कॉलेजात शिकणारे तरुण एकदम दाढी करून येत, आता अनेकजण खास दाढी जेल नी ट्रिम करणं हे सारं फार हौशीनं करताना दिसत आहेत.
हे सारं सुरू असताना राजकारण तरी त्याला कसं अपवाद राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांपासून ते थेट आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, अमोल कोल्हे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, नितीन नांदगावकर, विश्वजित कदम, जयकुमार गोरे, सुजय विखे, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यातही एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे त्यांची दाढी. या राजकीय नेत्यांकडे पाहिलं तर लक्षात येतं की प्रत्येकाच्या दाढीची स्टाइल वेगळी आहे. पण त्यामुळे त्यांचा रुबाबदार लूक अधिक खुलून दिसतो.
तरुण मुलांवर नेहमीच अभिनेते, क्रिकेटपटू आणि राजकीय नेत्यांच्या वेश-केशभूषेचा प्रभाव पडलेला दिसतोच. अगदी कपडे, चष्मे ते चपलांर्पयत. स्टाइल आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यात आता नव्या काळात सध्या दाढी हे एक नवीनच फॅशन स्टेटमेंट म्हणून उदयाला आलेलं दिसतं आहे.
पूर्वी एखाद दुसर्या चित्रपटात दिसणारी हिरोची दाढी आणि मिशी आता सिनेमांतही झळकू लागली आहे. दबंग सलमानचा मिशीचा लूक असो नाहीतर आता नव्या सिनेमासाठी आमीर खानने वाढवलेली दाढी असो, कबीर सिंगची खुरटलेली दाढी असो चर्चा तर त्यांच्या स्टायलिश लूकची होतेच. आणि आता त्याचाच प्रभाव म्हणून की काय आता आपल्या ‘माचो’ लूकसाठी तरुण मुलंही आपली दाढी निगुतीनं वाढवू लागली आहेत. दुसरीकडे बॉलिवूड अभिनेते आणि टी-20, आयपीएलपासून ते प्रो-कबड्डीच्या खेळाडूंर्पयतच्या प्रत्येकाच्या दाढी-मिशांच्या स्टाइल्स वेगवेगळ्या आहेत. आपल्याला जे आवडेल, चांगले दिसेल असं वाटतं ते लूक तरु ण मुलं धडाधड कॉपी करत आहेत. आणि ‘स्टायलिश’ दिसण्याचा रांगडा प्रयत्नही करत आहेत.
तरुणांशी ‘कनेक्ट’ वाढविण्याचा प्रयत्न करणारे राजकीय नेते तरी यापासून कसे दूर राहतील. एकेकाळी राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करणार्यांना ‘क्लीन शेव्ह्ड’ राहणं फार महत्त्वाचं मानले जात होतं. गालावर वाढत असलेले दाढीचे छोटे खुंटही ताबडतोब हटवले जात होते. पण आज हे चित्र पूर्णतर् बदललं आहे. अलीकडच्या काळात दाढी-मिशी ही ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनू लागली आहे. या स्टायलिश लूकमुळे राजकीय नेत्यांना, तरु णांना आपले करण्यास मदत होत आहे.
त्याचबरोबर हा लूक अधिक भारदस्त दिसण्यासाठी व्यायामशाळांमध्ये जाऊन शरीर कमावण्यावरही सध्या दणक्यात भर दिला जातो आहे. जिम, रनिंग किंवा सायकलिंग करताना अनेकजण दिसतात. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व अधिक भारदस्त दिसतं असं तरुणांना वाटतं.
त्यामुळे दाढी आणि व्यायाम हे दोन सध्याचा तरुण मुलांचे नवे मित्र झालेले दिसतात.
************
महाराज शेव्हिंग कटची भुरळ
ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भुरळ असलेल्या तरु णांना प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढी-मिशांसारखा प्रकार भलताच आवडतो. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी वाढवलेली दाढी अन् मिशीची स्टाइल लोकप्रिय ठरली. सातार्याच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाढवलेल्या दाढीचीही चर्चा झाली. तरु ण पिढी याला ‘महाराज शेव्हिंग कट’ म्हणून फॉलो करताना दिसते.
( स्वप्नील लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे.)