वीग निकाल के दिखाऊ क्या?
By admin | Published: April 7, 2016 12:52 PM2016-04-07T12:52:13+5:302016-04-07T12:52:13+5:30
पेशण्ट कोण आहे? मीच.. (डॉक्टर/ नर्स/आयांच्या चेह:यांवर धक्का+ दु:ख) किती वर्षाच्या आहात मॅडम तुम्ही? 23 (पुन्हा धक्का+दु: ख) कोणता कॅन्सर आहे? (मी हसून) ब्रेस्ट म्हणजेच स्तनाचा कॅन्सर आहे. हे असे सवाल-जवाब सरावाचे झाले आणि ऑपरेशनची तारीख समोर येऊन उभी राहिली तेव्हा.
Next
असं वैतागून सांगावं लागावं इतकं सारं अनपेक्षित होतं, माझ्यापेक्षाही, इतरांसाठीच!
कॅन्सर डेज् ऐन विशीत कॅन्सरशी सामना करून मिळवलेल्या हिमतीची जिगरबाज गोष्ट
टाटात दाखल होऊन तसे तीन महिने (चार किमो) पूर्ण झाले होते. आता सर्जरी करायची होती. दिवस तसे बरे चालले होते. कॅन्सर झाल्यामुळे मिळालेलं अटेन्शन, सहानुभूती, प्रेम सगळच सुखावणारं होतं. टाटामध्ये सगळेच कॅन्सर पेशण्ट्स. त्यामुळे कोणीही कोणाकडे वेगळ्या नजरेनं पहायचं नाही. वीग घातल्यामुळे वेगळे दिसणारे, तणावग्रस्त चेहरे टाटा हॉस्पिटलमधल्या गर्दीत बेमालूमपणो मिसळून जायचे. मात्र बाहेर गेल्यावर संशयित नजरा, धक्का बसलेल्या नजरा, भोचक नजरा लगेच जाणवायच्याच!
एव्हाना रांगेत उभं राहून नंबर लावणं, स्मार्टली आपलं काम कसं पटपट होईल यासाठी स्ट्रॅटेजी आखणं अशा गोष्टी सरावाच्या झाल्या होत्या. बाबा टॅक्सीला पैसे देईस्तोवर मी पुढे जाऊन नंबर लावणार. आमचा नंबर लागला, आम्ही आत गेलो की काका पैसे भरण्याच्या रांगेत उभा राहायचा. म्हणजे समांतरपणो सगळी कामं पटापट होत राहात. खोळंबा होत नसे. आईचा एक्सपिरिअन्स असल्यानं मी आणि बाबा टाटामधल्या सिस्टिमशी जुळवून घेऊ शकलो. मी ब्रेस्ट ओपीडी बाहेर माझा नंबर येण्याची वाट पाहात पुस्तक वाचत, गाणी ऐकत स्वत:ला बिझी ठेवायची. बाबा प्रत्येक वेळी असायचेच. प्रत्येक किमोच्या आधी ब्लड टेस्ट करावी लागायची, मग ते रिपोर्ट तुमच्या अॅन्कॉलॉजिस्टला दाखवून पुढच्या किमोची तारीख, वेळ नक्की करता यायची. मग किमोच्या दिवशी औषधं घेऊन तुम्ही हजर व्हायचं आणि मग तुमची त्या दिवसाची किमोथेरपी सुरू व्हायची. अशी सगळी व्यवस्था असायची. ही सिस्टिम नीट लक्षात ठेऊन आपल्या वेळेचं नियोजन केलं तर त्रस होत नाही. कारण टाटा हॉस्पिटलचा पसारा अवाढव्य आहे. वेगवेगळे वॉर्ड्स, ओपीडी, त्यांना दिलेले नंबर्स, त्यात प्रत्येक पेशण्टच्या बरोबर किमान तीन ते चार माणसं आलेली असायची. आपल्या माणसाच्या आजारामुळे हबकून गेलेले त्यांचे चेहरे. हे सारं हळूहळू वाचता येऊ लागलं. मी तर या सगळ्या अनुभवामुळे स्मार्ट झाले. लोकांशी कसं बोलायचं, अप्रोच कसं व्हायचं, डॉक्टरांना नेमकेपणाने प्रश्न कसे विचारायचे, हे सगळं या 8 महिन्यात शिकता आलं.
ओपीडी बाहेरच्या वेटिंग रूममध्ये लोकांचे असंख्य नमुने पाहिले. माझं वय लहान असल्यानं अनेकांना मला कॅन्सर झालाय हे सांगून पटायचं नाही. त्यांना वाटायचं की मीच पेशण्टची नातेवाईक आहे. एका बाईनं तर प्रश्न विचारून भंडावून सोडलं. इतने कम उम्र मे कॅन्सर? तिच्या शंका काही संपतच नव्हत्या. शेवटी मी तिला म्हटलं, वीग निकाल के दिखाऊ क्या? तेव्हा ती ओशाळून गप्प बसली.
पण हा असा संवाद नेहमी घडायचा.
पेशण्ट कोण आहे?
मीच..
(डॉक्टर/नर्स/आयांच्या चेह:यांवर धक्का+ दु:ख)
किती वर्षाच्या आहात मॅडम तुम्ही?
23
(पुन्हा धक्का+दु: ख)
कोणता कॅन्सर आहे? (समोर त्यांच्या हातात माझी फाइल आणि तरीही हा प्रश्न, माझं डोकं आउट..)
(मी हसून ) ब्रेस्ट म्हणजेच स्तनाचा कॅन्सर आहे मला. डाव्या ब्रेस्टचा. किती वेळ लागेल/किती पेशण्ट्स आहेत माङयापुढे असा आमचा प्रेमळ संवाद चालायचा..
टाटात पेशण्ट्सचा प्रचंड ताण. प्रत्येक तपासणीसाठी पेशण्ट्सची रांग. म्हणूनच वेळ वाचावा आणि सर्जरीची तारीख पुढे जाऊ नये यासाठी आमचा आटापिटा चालला होता. सगळे रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांसमोर गेलो. चला, मग कधी होताय अॅडमिट? ते म्हणाले.
बाबा लगेच म्हणाले, आत्ता होतो अॅडमिट. मी भीतीने तिथेच थिजले.
ऑपरेशन???
जिवंत नाही राहिले तर.. दुखेल खूप, काय होईल?? माङया डोक्यात टकटक टकटक सुरू. बाबांना वेळ घालवायचा नव्हता. लवकर ऑपरेशन झालं तर बरं असं त्यांना वाटत होतं. लगेच दोन दिवसांनंतरची तारीख मिळाली. ऑपरेशन आधी ब:याच टेस्ट करायच्या होत्या. ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, हार्टसाठी टुडी एको. खूप डिस्टर्ब वाटतं होतं. या ऑपरेशननंतरच आयुष्य कसं असेल, याचा काही अंदाजच येत नव्हता.
सकाळी लवकरच अॅडमिट व्हायचं होतं. आणि तेही अनाशेपोटी. काकाचं म्हणणं होतं की सिंगल रूम घेऊ; पण त्यासाठी थांबण्याची बाबांची तयारी नव्हती. न जाणो सिंगल रूमसाठी आणखी किती दिवस थांबावं लागेल, त्यामुळे रूम शेअर करावी लागणार होती. त्यामुळे माङया शेजारी कोण याची मला प्रचंड उत्सुकता होती. एक जमशेदपूरची बाई होती. मग तिची आणि माझी पेशण्ट कोण? अशी मला सवयीची पण तिला प्रचंड उत्सुकता असलेली प्रश्नोत्तरं झाली. माझी माहिती तिला कळली. आणि मला तिची कळलेली माहिती म्हणजे ती गेली सहा महिने याच खोलीत अॅडमिट होती. तिची किमो चालू होती. एक किमो चार ते पाच दिवस चालायची. तिचा नवराही तिथेचं राहायचा. खूप कंटाळलेली, घर आणि मुलांच्या आठवणीनं खंगलेली आणि कदाचित पाण्यासारखा पैसा चालल्यानं त्रसलेली. मला खिडकीजवळचा बेड मिळाल्यानं मी खूश. खिडकीतून खाली वाहता रस्ता दिसत होता. ती खोली आठव्या किंवा नवव्या मजल्यावर होती. क्षणभर मी ऑपरेशनची भीती विसरले, एवढंच!
- शची मराठे
shachimarathe23@gmail.com
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)