कस्लं हे फॅड?
By admin | Published: June 3, 2016 12:10 PM2016-06-03T12:10:14+5:302016-06-03T12:10:14+5:30
तरुण डोक्यात काही गोष्टींची क्रेझ अशी उसळी मारते की, मग त्यापुढे दुसरं काहीच सूचत नाही. आपल्या जगण्यात शिरलेल्या अशाच काही क्रेझी गोष्टींची एक भन्नाट लिस्ट.
Next
>तरुण-तरुणींमध्ये सध्या सगळ्यात जास्त क्रेझ कशाची आहे?
म्हणजे थेट सांगायचं तर सध्याची तरुण फॅड काय काय आहेत असं शोधलं, गप्पा मारल्या तरुण गॅँगशी किंवा डायरेक्ट अभ्यासच केला त्यांच्या ऑनलाइन वर्तनाचा तर काय दिसतं?
फार गमतीजमती दिसतात. एकसे एक भन्नाट फॅड दिसतात आणि आपल्याचसमोर आरसा ठेवल्यासारखं वाटतं.
सुटी संपून कॉलेज सुरूहोण्यापूर्वीच्या या धावपळीच्या दिवसात आपणच आपल्यावर हसावं म्हणून ही आपल्याच फॅड्सची एक यादी.
त्यातलं तुमचं कोणतं, हे तुम्हीच तपासा.
चेक इन /ट्रॅव्हलिंग टू
काहीजण अगदी कुठंही जातात म्हणजे अगदी मंदिरातही. पण चप्पल काढण्यापूर्वी आपलं फेसबुक स्टेटस टाकत ‘चेक इन’ म्हणतात. जेमतेम टम्पराट हॉटेलात जातात पण त्या हॉटेलच्या नावानं चेक इन करत वडापाव खातात. काही त्याहून हुशार काही कामानिमित्त एखाद्या बडय़ा हॉटेलात पाच मिण्ट गेले तरी शाइन मारायला चेक इन, ताज अमूक धमूक अशी पोस्ट टाकतात.
कहर त्याच्यापुढचे. ते ट्रॅव्हलिंग टू असं स्टेटस फ्रॉम किचन टू हॉल असं घरातल्या घरात टाकत नाही हे थोर. नाहीतर जातात अगदी कुठंही पण विमानाचं चिन्हं टाकत आपल्या प्रवासाची उद्घोषणा करतात.
आपण कसे हॅपनिंग आहोत, हे सतत चर्चेत ठेवायचा हा प्रय} असतो.
फोटोशॉप स्वत:चंच!
काहींना आलं फॉरवर्ड पुढे ढकलायची हौस आहेच. त्यात फोटोशॉप केलेली माहिती खरी खोटी न पाहता ते पुढं पाठवतातच. पण त्याहून हुशार काही स्वत:चेच फोटो फोटोशॉप करत काहीबाही कवितेच्या ओळी लिहितात. आणि स्वत:च पोस्ट करतात. हे फोटोशॉपचं फॅड सध्या पार येडं झालंय!
यू नो, आय नो एव्हरीथिंग
हा एक नवीन वर्ग उदयास आलाय. त्यांना सारंच माहिती असतं. म्हणजे काय कुणी आंतररराष्ट्रीय नेता देवाघरी जाओ, एखादा गायक-वादक, कुठली मोठी घटना, एखाद्या खेळातली काही मोठी गोष्ट. जे काही तत्कालिक घडेल. हे लगेच त्यावर एक सेण्टी स्टेटस टाकतात. असं सेण्टी जशी हेच त्या घटनास्थळी होते किंवा यांनाच त्या माणसाच्या नसण्यानं अतीव दु:ख झालंय. त्यात दहशतवादी हल्ले, सिनेमे, राजकीय घटना यासंदर्भात तर ते तावातावानं कमेण्टनारच!
अनेकदा असली स्टेटस याची त्याची ढापणारेही अनेक आहेत. पण यात मुद्दा एकच, मला सगळं कळतं, मला सगळ्यात मत आहे!
आय नो एव्हरीथिंग, आय फिल एव्हरीथिंग!
आपल्या माणसांना ऑनलाइन विश
हे तर महानवर्गीय आहेत. ही गॅँग आपल्या गर्लफ्रेण्ड/बॉयफ्रेण्डपासून ते भाऊबहीण, आईवडील, शेजारचे, मित्र, बॉस यासगळ्यांना फेसबुकवरच विश करणार. लिहिणार की तुम्ही कसे ग्रेट. आणि कसं माझं लाइफ तुमच्याविना अधुरंबिधुरं आहे.
असं ‘प्रेमप्रदर्शन’ करुन त्यांना काय मिळतं, हा शोधाचा विषय आहे.
ज्यात त्यात हॅशटॅग-
आपण हॅशटॅग वापरतो आहोत हीच त्यांना एक फॅशन वाटते. म्हणजे काय तर मित्रंबरोबरच्या पार्टीपासून आपल्या स्वत:च्या फोटोर्पयत सारं काही तुटक, हॅशटॅग वापरत लिहितात. हा टॅग कशासाठी वापरतात त्यानं काय होतं हेच माहिती नसताना ते वापरत सुटतात आणि आपली पर्सनल माहिती इतरांना कायमसाठी खुली करतात.
नवीन स्मार्टफोन सतत घेणार
हा तर अनेक तरुण मुलांचा छंद. बाजारात कुठला नवीन स्मार्टफोन येतोय, त्याची फिचर्स काय, ऑनलाइन केवढय़ाला मिळणार हे सारं त्यांना सतत माहिती असतं. आणि त्यातून ते आपला चार महिन्यापूर्वी खरेदी केलेला फोन विकतात, दुसरा घेतात. एकच ध्यास नवीन स्मार्टफोनची माहिती, आणि ती इतरांना सांगण्याचा सोस.