हंडीनंतर जखमी गोविंदांचं काय होतं?

By Admin | Published: September 1, 2016 01:29 PM2016-09-01T13:29:12+5:302016-09-01T13:29:12+5:30

दहीहंडी फोडताना सहाव्या थरावरून पडलेला, त्यावेळी २१ वर्षांचा तरुण असलेला नागेश आज गेली सात वर्षे अंथरुणात लोळागोळा पडून आहे.

What happened to Govind injured after the murder? | हंडीनंतर जखमी गोविंदांचं काय होतं?

हंडीनंतर जखमी गोविंदांचं काय होतं?

googlenewsNext
>- सोनाली शिंदे
( लेखिका ‘महाराष्ट्र वन’ या वाहिनीत पत्रकार आहे.)
 
दहीहंडी फोडताना सहाव्या थरावरून पडलेला, त्यावेळी २१ वर्षांचा तरुण असलेला नागेश आज गेली सात वर्षे अंथरुणात लोळागोळा पडून आहे. मानेखाली शरीरात संवेदनाच नाहीत. आईवडील उपचार, शुश्रूषा करताहेत. आणि नागेश स्वत:शी झगडत, बरं होण्यासाठी धडपड करतो आहे..
 
नागेशसारखे असे किती जखमी गोविंदा. एकदा दहीहंडीचा थरथराट संपला की त्या जखमी, जायबंदी गोविंदांचं काय होतं पुढे? कुणी मदत करतं त्यांना? निदान चौकशी तरी करतं? कसे जगतात ते? जखमा भरतात, की कायमच्या अपंगत्व देऊन जातात? थरावर थर चढवत उंच जाणाऱ्या हंडीच्या इव्हेण्टी वातावरणात हे प्रश्न कुणाला पडत नाहीत. आणि एकदा दहीहंडी संपली की पुढच्या वर्षीपर्यंत कुणी याविषयी काही बोलतही नाही. मात्र जखमी झालेल्या नागेशला भेटा, आणि मग ठरवा, की असुरक्षित काही फूट हंडीच्या थरांवर जोखीम घेत चढण्यात खरंच थ्रिल आहे? आणि त्यापायी मोजावी लागणारी किंमत? ती कुणी मोजायची? तरुण मुलांनीच..?
 
गेल्या आठवड्यात दहीहंडीच्या कोलाहलाचं वृत्तांकन करताना पत्रकारांना नागेश अभावानंच आठवला. जणू काही हा ‘अ’विनय कायदेभंग’ आहे, अशा थाटात राजकीय नेते दहीहंडीच्या थरथराटाकडं पाहत होते. न्यायालयाच्या विरोधात भूमिका मांडताना नवे स्वातंत्र्ययुद्ध सुरू आहे, अशा आवेशात अनेकजण बोलत होते. बातमीचा इव्हेंट साजरा करणारे पत्रकारही हे सारं आसूसून कव्हर करत होते. आणि घरोघरचे प्रेक्षक? ते तर दहीहंडीत सहभागी झालेल्या आर्ची अथवा बिपाशाला डोळे भरून पाहत होते. अशा या इव्हेण्टी वातावरणात नागेश कशाला कोणाला आठवेल? 
 
दहीहंडीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे २० फूट उंचीचे बंधन अन् १८ वर्षे वयाची अट. त्यात ‘राज’कारण्यांनी जितक्या थरांचा सराव केला, तितके थर लावण्याची केलेली घोषणा (की आदेश?). दहीहंडी समन्वय समितीची गोंधळाची भूमिका. न्यायालयातल्या याचिका, त्यावरचे निर्णय. ठाण्यात न्यायालयाच्या निर्णयातील तांत्रिक स्पेस घेऊन मनसे खेळली गेलेली दहीहंडी. या अशा वातावरणात भेट झाली नागेश भोईर या तरु णाची...! आणि बाहेरचा सगळा आवाज कानांना ऐकूच येऊ नये, अशी अवस्था झाली.
 
दहीहंडीवरून पडून गेली सात वर्षे अंथरु णात लोळागोळा पडून असलेला नागेश. त्याच्याशी बोललं तर आजही त्याच्या आवाजात एक संयत सकारात्मकता दिसते. ना सुडाची भावना, ना कुणाच्या विरोधात आकांडतांडव.
तेव्हा २१ वर्षांचा असलेला हा तरु ण. २००९ मध्ये तो दहीहंडीच्या सहाव्या थरावरून पडला. खरं तर त्यावेळी आताइतकी थरांची स्पर्धा नव्हती, की दहीहंडीच्या ठिकाणी लाइव्ह कॅमेरे नव्हते. तर हा स्मार्ट दिसणारा, गोरागोमटा पोरगा शिकून नोकरीच्या शोधात होता. तात्पुरत्या स्वरूपात बॅँकेत डेली कलेक्शनचं काम करायचा. दहीहंडीला ‘जय महाराष्ट्र’ गोविंदा पथकात दहीहंडी फोडायचा. १४ आॅगस्ट २००१ ला सात ते आठ दहीहंडी फोडून तो आणखी एका दहीहंडीवर चढला. पाच थरांवर सहावा थर लावण्यासाठी चढला आणि हंडीची दोरी तुटल्याने तो खाली पडला. खाली पडताना खाली असलेल्या गोविंदांच्याही बाहेर फेकला गेला. त्याच्या मणक्याला दुखापत झाली आणि त्यामुळे मानेपासून खाली संपूर्ण शरीराला पॅरालिसीस झाला. तेव्हापासून तो अंथरुणात पडून आहे. मानेखाली काही संवेदनाच नाहीत. अजूनही त्याला युरिनबॅग आहे. मानेपासूनचे खालचे अंग म्हणजे त्याची आई आहे. नागेशची आई गेली सात वर्षे आपल्या मुलाची प्रत्येक गोष्ट करत आहे.
 
अशा या नागेशला भेटायला आम्ही त्याच्या घरी गेलो. भिवंडीतील धामणकर नाक्याजवळ राहणारा हा तरु ण. शांतपणे सारं सोसत होता. आईदेखील कोणतीही तक्र ार न करता, चेहऱ्यावर कोणताही ताण न दाखवता त्याची सेवा करत होती. शस्त्रक्रि या, औषधं आणि व्यायाम यातून तो आपल्या मानेपासून खाली काम न करणाऱ्या शरीराला ‘पुश’ करत होता. हसऱ्या चेहऱ्यानं त्यानं आमचं स्वागत केलं. ‘व्यायाम करून तो हातांची काहीतरी हालचाल करतो तेवढीच. नाही तर तो कोमात असल्यासारखा पडून असायचा’, असं त्याची आई सांगत होती.
 
आतापर्यंत त्याच्या सात शस्त्रक्रि या झाल्या आहेत. आणखी तीन शस्त्रक्रि या व्हायच्या आहेत. या सगळ्या उपचारांसाठी आतापर्यंत त्याला ३५ लाखांहून अधिक खर्च आलाय. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. त्याला चार बहिणी. तिघींची लग्न झालीयेत, तर मोठ्या बहिणीला मेंदूचा आजार असल्यानं त्या कुटुंबासोबत असतात. वडील डार्इंग कंपनीत नोकरीला होते, पण रु ग्णालयांमध्ये नागेशची ने-आण करावी लागत असल्यानं सध्या त्यांनी नोकरी सोडलीय. गेल्या सात वर्षांच्या काळात त्याच्या मित्रांनी खूप साथ दिली. आर्थिक मदत असो की उपचारासाठी ने-आण, आठव्या वर्षीही त्याचे मित्र धावून येतात. स्थानिक खासदार-आमदारांनीही त्याला मदत केलीय. 
पण ‘मोठ्या’ दहीहंडीचे आयोजक म्हणून प्रसिद्ध असणारे, आणि आजही उंच थरांचा आग्रह धरणारे बडे राजकीय नेते यांच्याकडे मदत मागूनही कुणी मदत केली नाही, असं नागेश सांगतो. अलीकडेच चॅनलवरच्या प्राइम-टाइम शो च्या चर्चेत चमकताना प्रताप सरनाईक यांनी त्याला एक लाखाची मदत जाहीर केली, तर बाळा नांदगावकर यांनीही मदतीचं आश्वासन दिलं. या चर्चेत जखमी गोविंदांचा प्रतिनिधी म्हणून स्वत: नागेश सहभागी झाला होता. दहीहंडीच्या दोन दिवसांनंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नागेशला ७५ हजार रु पयांची मदत देणार असल्याचं जाहीर केलं!
असा हा नागेश दहीहंडीपूर्वी एक दिवस सांगतो की, ‘‘दहीहंडी खेळायला विरोध नको. खेळा, धम्माल करा; मात्र कोर्टाने सणाला विरोध केलेला नाही हे लक्षात घ्या. पण न्यायालयानं सुरक्षिततेसाठी सांगितलेल्या नियमांचं पालन करा. माझ्यावेळी सुरक्षेचे हे नियम असते, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती.’’
 
नागेशची ही संपूर्ण कहाणी त्याच्या एकट्याची नाही. दहीहंडीच्या वेळी जखमी झालेल्या गोविंदांच्या मदतीला नंतर कुणी दहीहंडी समर्थक येत नाहीत. ही सारी पोरं मध्यम ते कमी आर्थिक उत्पन्न गटातील असतात. आणि मग आपली आजारपण घेऊन त्यांचं जगणं अधिक असह्य होत जातं. ‘कोर्टाचा हिंदूंच्याच सणांना विरोध का?’ अशी बालीश वक्तव्यं धर्माचे ‘राज’कारण करणारे करतात. पण म्हणून आपला जीव धोक्यात घालून आणि लोळागोळा आयुष्य स्वीकारून तरुणांनी या असुरक्षित थरथराटाचं समर्थन करावं का? 
आपलं आयुष्य आपण नक्की कशासाठी धोक्यात घालतोय? - निदान नागेशकडे पाहून तरी अनेकांनी याचं खरंखरं उत्तर स्वत:ला द्यावं, नाही का?
 
थरथराटाच्या या सणात गेल्या तीन वर्षांत राज्यभरात दहा गोविंदांचा मृत्यू झालाय, तर सातशेपेक्षा अधिक गोविंदा जखमी झालेत. यात सर्वाधिक संख्या मुंबईतील आहे, तर यंदाही राज्यभरात १२६ गोविंदा जखमी झालेत. यंदा हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन पटींनी कमी आहे, हे नोंदवलं तरी आजवर जखमींची संख्या काय असेल याचा अंदाज लावता येईल. गेल्यावर्षी ३६४ गोविंदा जखमी झाले होते. न्यायालयाने उंची, वय आणि सुरक्षेच्या दृष्टीने घेण्याच्या काळजीबाबत जे नियम घालून दिले त्याचा हा परिणाम आहे, हे नाकारता येणार नाही. 
 
दहीहंडीत जखमी झालेल्या आणखीही काही तरु णांना भेटण्याचा प्रयत्न केला. थर लावले जात असताना खाली उभ्या असलेल्या एका गोविंदावर वरील थर कोसळल्यानं पायाला अपंगत्व आलेला एकजण होता. मित्रांच्या मदतीने त्याने आता चहाचा स्टॉल सुरू केलाय. पण त्यावेळी थरांची स्पर्धा नव्हती, तरी मला असं अपंगत्व आलं. आता तर सुरक्षिततेची खात्री करूनच घ्यायला हवी, असं हा गोविंदा सांगतो. 
* आता शिवसेनेच्या एका शाखेत युवा अध्यक्ष म्हणून काम करणारा माझा मित्र, जो आज महिला आणि पुरु ष अशा दोन हंड्यांचे कोचिंग करतो. तो सांगतो, आयोजकांनी अति केले म्हणून ही वेळ आली. सणामध्ये स्पर्धा, पैसा, प्रसिद्धी आणली म्हणून हे सारे झाले.’’
* चाळिशीला पोहचलेले एक गोविंदा सांगत होते की, ‘‘आमच्या काळात थरांची स्पर्धा नव्हती की थिल्लरपणा नव्हता. आम्ही पाच ते सहा थर लावून हंडी फोडायचो. धम्माल करायचो. ती खरी दहीहंडी.’’
 

Web Title: What happened to Govind injured after the murder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.