मोटे हुए तो क्या हुआ?
By admin | Published: November 27, 2015 09:29 PM2015-11-27T21:29:50+5:302015-11-27T21:29:50+5:30
प्लस साइज्ड कपडय़ांच्या फॅशनची जगभर विस्तारणारी बाजारपेठ जाड असण्याचा न्यूनगंड कमी करून फॅशनेबल जगण्याचा पाया का घालतेय?
Next
>प्लस साइज्ड कपडय़ांच्या फॅशनची जगभर विस्तारणारी बाजारपेठ जाड असण्याचा न्यूनगंड कमी करून फॅशनेबल जगण्याचा पाया का घालतेय?
जगभरातल्या फॅशनच्या जगात एका घटनेची या आठवडय़ाच्या सुरुवातीला मोठी धूम होती.
आणि फॅशनवेडय़ा, जाडजूड, अमेरिकन तारुण्याला तर त्या घटनेचा मोठा आधारबिधार वाटला आणि आपल्या न्यूनगंडावर मात्र सापडली असं सोशल ऑनलाइन कमेटिंगही अनेकांनी केलं.
तर झालं असं की, अॅशली टीप्टॉन या प्लस साइज फॅशन डिझायनर बाईंनी आपलं एक अत्यंत धाडसी प्लस साइज कलेक्शन थेट न्यूयॉर्क फॅशन विकच्या रॅम्पवरच सादर केलं. त्यांच्या या उपक्रमाचं नाव आहे, प्रोजेक्ट रनवे!
गेल्या सोमवारी फॅशनच्या जगात या प्लस साइज धाडसाचीच मोठी चर्चा होती.
त्याचं कारणही तसंच की, आपल्याकडे नसेल इतका ओबेसिटीचा आणि ओव्हरवेट असल्याचा प्रश्न अमेरिकन तारुण्यात जास्त आहे. त्यामुळे बारीक होण्याची होड आणि त्यासाठीची इंडस्ट्रीही वेगात आहे.
त्या सा:याला एक प्रतिउत्तर दिल्यासारखं थेट न्यूयॉर्क फॅशन विकमधे प्लस साइज कलेक्शन सादर झालं म्हणजे थेट नव्या बाजारपेठेत पाऊल ठेवल्यासारखंच होतं. पण ते तेवढंच नव्हतं. कारण अॅशली टीप्टॉन म्हणते तसं ही घटना फॅशनच्या दुनियेत नव्यानं काहीतरी मांडत होती. अॅशली स्वत:ही चांगली वजनदार, जाडजूड आहे. म्हणजे प्लस साइजच. तिनं हे कलेक्शन तयार केलं त्यामागे बाजारपेठ तर होतीच पण ती म्हणते, ‘‘आम्ही आहोत जाड तर आहोत, आता आमची वजनं काहीकेल्या घटत नाही म्हणून किती काळ स्वत:ला छळत बसू? वी नीड टू बी ट्रिटेड इक्वली. मला जगाला हे सांगायचंय की जाड माणसंही फॅशनेबल असू शकतात, ट्रेण्डमेकर्स आणि ट्रेण्डसेटर्स असू शकतात.’’
अॅशली म्हणते ते फॅशन आणि कपडय़ांच्या बाजारपेठेच्या संदर्भात खरंय. जाड-ओव्हरवेट म्हणजे प्लस साइज्ड तारुण्य जगभर सर्वत्र आहे. आणि रेडिमेड कपडय़ांची बाजारपेठ जगभर झपाटय़ानं वाढतेय. असं असताना जाडजूड तरुणांसाठी रेडिमेड कपडेच न मिळणं, त्यांच्या मापात काहीच न बसणं हे अतिच होतं. आता त्यावर उतारा सापडलाय आणि बाजारात प्लस साइज्ड कपडेच नाही तर जगभर सर्वत्रच मॉलमधे प्लस साइज्ड स्टोअर्स उभी राहिली आहेत. तिथं एक्सएल आणि डबल व ट्रिपल एक्सएल आणि अमेरिकेत तर फाईव्ह एक्सएल साइजचे कपडे मिळू लागलेत. आणि तोच ट्रेण्ड आपल्याकडच्याही मॉलमधे दिसतोय. आता भारतातही सर्वच स्टोअर्समध्ये हे प्लस साइज्ड कपडे उपलब्ध होताहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने प्रसिद्ध ब्रॅँड्सनी प्लस साईज स्टोअर्सची संख्याही वाढवायला सुरुवात केली आहे.
तसं भारतातही ‘वजनदार’ तारुण्याची कमतरता नाही. एकतर तमाम भारतीयांपुढे चटकन सुटणा:या पोटाचा प्रश्न असतोच. अखिल भारतीय प्रश्न असल्यासारखं जरा वजन वाढलं की पोट चटकन सुटतं. कंबरेचे घेर बदलतात.
आणि मग आपल्या वाढत्या वजनाचे काटे चांगलेच रुतायला लागतात.
अनेकांचा आत्मविश्वास ढासळतो आणि डाएटसह व्यायामाचे प्रयोग सुरू होतात.
एवढं करूनही काहीकेल्या वजन घटत नाही आणि निराशा मात्र वाढते.
इतर सडपातळ लोक जेव्हा फॅशन ट्रेण्डची चर्चा करतात तेव्हा मात्र आपला जाडेपणा अजून छळतो. आत्मविश्वास कमी करतो. त्यावरही उत्तर म्हणून हे फॅशनेबल प्लस साइज्ड रेडिमेड कपडे बाजारात दाखल होताहेत. प्लस साइज्ड कपडय़ांची एक मोठी बाजारपेठच तयार होते आहे.
आणि म्हणूनच बॉलिवूडमधे ‘जोर लगा के हय्या’सारखे सिनेमे, त्यातली गाणी गाजतात, तर तिकडे प्रोजेक्ट रनवे तरुण मुलांच्या जगात चर्चेचा विषय ठरतो.
प्लस साईज्ड असणं आता यापुढे तितकंसं उणत्व देणार नाही, असे हे संकेत आहेत.
- सायली कडू
( सायली लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहे.)