रडत बसलो तर काय होईल?
By admin | Published: November 20, 2014 06:18 PM2014-11-20T18:18:55+5:302014-11-20T18:18:55+5:30
अमिताभ बच्चन, नेल्सन मंडेला आणि युवराज सिंग यांच्यात कॉमन काय? त्सुनामीत बेचिराख झालेला जपान आणि बॉम्बस्फोटानंतर धावणारी मुंबई यांचं ‘स्पिरीट’ कुठलं?
Next
>आपल्या जगण्यात असे क्षण केव्हा ना केव्हा तरी येतातच जेव्हा सगळं काही उन्मळून पडल्यासारखं वाटत, सगळंच संपल्यासारखं वाटतं.. अगदी जगणंच थांबल्यासारखं वाटतं..
पण नंतर कालांतरानं असं लक्षात येतं की, आपण त्या क्षणी थबकून गेलो होतो खरं, पण आपणच पुन्हा जगण्याची वाट चालायला, प्रवास करायला सुरुवात केली.
अनेक जीवघेण्याक्षणांनंतर जगण्याची पाऊलवाट चढणीचीच वाटली तरी आपण ती नेटानं चालत राहतो. वाटेत अंधार दाटला, धुक्यात हरवल्यासारखं वाटलं, अगदी सगळं धूसर झालं तरी आपण आपल्यासाठीच्या दिशा शोधतच राहतो.
कोणत्याही परिस्थिती काहीही झालं तरी न हरण्याचा, स्वत:ला हरवू न देण्याचा निकराचा प्रयत्न करतो. जगणं साकारण्याचा, जगण्याचा प्रयत्न करतो.
मनाचा काटकपणा, मनाचा कणखरपणा हाच
असतो ना?
खरं तर आपल्या आयुष्यातल्या खूपशा अवघड क्षणांना मनाच्या या कणखरपणानंच आपल्याला साथ दिलेली असते. हा काटकपणा, कणखरपणा खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकडे असतोच. फक्त तशी वेळ आल्याशिवाय तो आपल्याला दिसत नाही.
त्सुनामीच्या धक्क्यातून स्वत:ला सावरणारा जपानसारखा देश, बॉम्बस्फोटाचा धक्का पचवत दुसर्या दिवशी पूर्ववत चालू होणारी मुंबई, फुफ्फुसाच्या कॅन्सरला यशस्वीरीत्या तोंड देऊन कमबॅक करणारा क्रिकेटपटू युवराज सिंग, मायस्थेनिया ग्रेव्हीस नावाच्या आजाराला तोंड देत उभं राहणारा आणि कर्जाच्या डोंगराखाली हा पुरता गाडला गेला असंही लोकांना वाटत असताना जिद्दीनं कमबॅक करत सुपरस्टारपद सिद्ध करणारा अमिताभ बच्चन, दक्षिण अफिक्रेत वर्षानुवर्षे तुरुंगात राहून लढा देणारे आणि नंतर देशाचं नेतृत्त्व करणारे नेल्सन मंडेला.
या सार्यांमध्ये कॉमन काय आहे? हाच मनाचा कणखरपणा.
तो त्यांच्याकडे होता आणि आपल्याकडे नाही असं थोडंच आहे? प्रत्येक माणसात ती क्षमता कमीअधिक प्रमाणात असतेच. हा काटकपणा अर्थात अँबिलिटी टू बाउन्स बॅक.
रबरासारखं ताणलं जाऊनही न तुटता पुन्हा पूर्वस्थितीत येण्याची क्षमता म्हणजे हा काटकपणा. मनाची जिगर, हिंमत, निश्चलपणा, जिद्द हे सारंच आपल्याला कठीण गोष्टीतून तावून सुलाखून बाहेर पडायला मदत करतं. हा मनाचा काटकपणाच आपल्यातली सकारात्मक वृत्ती जागी ठेवायला मदत करतो. अवघड काळात ‘बाजीगर’ ठरलेल्या थोड्याच लोकांना हे जमतं, असं मात्र मुळीच नाही. मनाची काटकता ही काही दुर्मीळ गोष्ट नाही. आपल्या सगळ्यांकडे ती असतेच. आपण ती वापरणार आणि वाढवणार का, हाच खरं तर महत्त्वाचा प्रश्न?
- डॉ. संज्योत देशपांडे
तुम्ही कोण होणार? फायटर की रडे?
मनाची काटकता प्रयत्नपूर्वक वाढवता येऊ शकते का? -येऊ शकते! कणखर असणार्या व्यक्तींमध्ये काही ठळक गोष्टी दिसतात. त्या आपणही शिकून, आपलं मन अधिक काटक-कणखर बनवू शकतो.
जाणीव
ज्या माणसांना आपल्या भावनांची, विचार करण्याच्या पद्धतीची जाणीव असते, जी माणसं स्वत:च्या क्षमतांबाबत, र्मयादांबाबत जागरूक असतात अशी माणसं परिस्थितीचं आकलन लवकर करू शकतात. परिस्थिती नेमकी कशी आहे, घटनेचे नेमके काय परिणाम होऊ शकतात. याचा अंदाज त्यांना लवकर येतो. आपल्याला काय वाटतं आहे, ते का वाटतं आहे हे पटकन समजतं. भावना हाताळताना, परिस्थितीशी डील करताना यासार्याचा उपयोग होतो. आपल्या नियंत्रणात असलेले घटक आणि नियंत्रणाबाहेरचे घटक चटकन लक्षात आल्यानं निर्णय घेणं सोपं होतं.
समस्या सोडवण्याचं कौशल्य
प्रत्येक जणच कुठल्या ना कुठल्या समस्येला सामोरं जात असतो. त्या समस्या सोडविण्याची प्रत्येकाची एक पद्धत असते. काहीजण समस्येपासून दूर पळून जातात, काही हातपाय गाळून बसतात, काही समस्याच नाकारतात. पण मनाने काटक असणार्या व्यक्ती समस्येचं बारकाईनं निरीक्षण करतात. एक आव्हान म्हणून आलेली समस्या पेलण्याचा प्रयत्न करतात.
दु:ख होणारच !
कुणाचंच जगणं तसं सुरळीत नसतं. प्नश्न असतात. चिंता सतावता. पण तरीही समस्या आल्या की, बर्याच जणांना आयुष्यात अडथळा निर्माण झाल्यासारखे वाटतं. असंच का? मीच का? आताच का? असे अनेक प्रश्न विचारण्यात काही अर्थ नसतो. त्यापेक्षा समोर आलेला प्रश्न तडीस नेण्याची, जमेल तसा सोडवण्याची आणि जे येईल त्याला भिडण्याची ताकद गोळा करावी लागते. ज्याला हे जमतं, तो जिंकतो.
मीच का?
प्रत्येक माणसाचा आयुष्याकडे पहाण्याचा एक दृष्टिकोन असतो. मनासारखं काही घडत नाही, जे घडतं त्याचा त्रास होतो, तेव्हा आपण काय विचार करतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ‘असं सगळं माझ्याच वाट्याला का आलं?’ ‘आता काय संपलं सगळं, मजाच गेली सगळी !’ असं काहींना वाटतं. काहींना स्वत:चंच दु:ख सगळ्यात मोठं वाटतं. त्यांचा बराच वेळ आपलं दु:ख कुरवाळण्यात किंवा दु:खाचं उदात्तीकरण करण्यातच जातो. पण काहीजण मात्र याही परिस्थितीत वेगळा विचार करतात. आपल्या प्रश्नातून, दु:खातून जगण्यालाच एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न करतात. स्वत:ला ‘लढवय्या’ अर्थात फायटर समजून आपले प्रश्न लढतात. आणि ज्यांना हे जमत नाही ते स्वत:ला गरीब-बिचारे समजात. स्वत:ला परिस्थितीचे व्हिक्टिम अर्थात बळी समजतात. आणि रडत बसतात. आता ज्यानं त्यानंच ठरवायचं असतं की आपल्याला कोण म्हणून जगायला आवडेल? आपण कोण आहोत? फायटर की व्हिक्टिम?