शिकलेल्या मुलाचा भाव काय?
By admin | Published: February 25, 2016 09:28 PM2016-02-25T21:28:09+5:302016-02-25T21:28:09+5:30
खरं तर अपेक्षा अशी की, शिक्षणानं तारतम्य यावं, तर्काच्या कसोटीवर निर्णय घेतले जावेत आणि आत्मसन्मान वाढीस लागावा.. तसं होतं का?
खरं तर अपेक्षा अशी की, शिक्षणानं तारतम्य यावं, तर्काच्या कसोटीवर निर्णय घेतले जावेत आणि आत्मसन्मान वाढीस लागावा..
तसं होतं का?
हुंड्याच्या पत्राच्या ढिगाऱ्यातले पत्रं वाचताना हा प्रश्न पडतो, याचं कारण यातला चक्रावणारा मजकूर!
कारण मुद्दा आहे तो उच्चशिक्षितांचा!
अनेक पत्रात उच्चशिक्षित मुला-मुलींनी असं कबूल केलं आहे की, लग्न नावाच्या गोष्टीत आम्ही कॉम्प्रमाइज करणार नाही.
आता ‘कॉम्प्रमाइज’ म्हणजे काय?
तर जोडीदाराची निवड ते धूमधडाक्यात लग्न ते सेलिब्रेशन ते हनिमून!
बाकी सगळं ठीक, मनासारखा उच्चशिक्षित जोडीदार मिळावा असं वाटणं यात काही गैर नाही.
पण तो मिळवायचा तर मुलींसमोरचे प्रश्न निराळे आहेत आणि मुलांसमोरच्या संधी भलत्याच!
मुलींचं काय होतं?
मुली शिकल्या, खेड्यापाड्यातही किमान पदवीधर, डीएड/बीएड होऊ लागल्या. त्यांना ‘शिकलेला’ म्हणजे खरं तर स्वत:पेक्षा जास्त शिकलेला नवरा हवाय. त्यामुळे त्यांचे पालक तसा जोडीदार शोधतात. पुन्हा शिकलेल्या मुलीला शेतीत राबायला नको म्हणून शहरात नोकरीवाला असणं महत्त्वाचं!
त्यामुळे मग मुलींना स्थळ लवकर मिळत नाही. अनेक जातीत तर उच्चशिक्षित मुलींचं प्रमाण इतकं वाढलं की मुलं तेवढे शिकलेले नाहीत असं ही पत्रं सांगतात. त्यात वय वाढायला लागतं. दुसरं म्हणजे उच्चशिक्षित, शहरी, नोकरीवाला, पाचआकडी पगारवाला नवरदेव सापडला की, त्याचा हुंड्याचा आणि लग्न करून देण्याचा रेटही ठरलेला. जेवढी नोकरी भारी, तेवढा हुंडा जास्त.
तोही मोजायची मुलीची आणि मुलीच्या वडिलांची ना नाही. त्यामुळे उच्चशिक्षित मुलीचं लग्न ही वधूपित्यासाठी सर्वाधिक खर्चिक बाब होते आहे.
मुलांचं काय होतं?
आपला शिकलासवरला, सरकारी/खासगी नोकरी शहरात करणारा मुलगा हा आई-वडिलांसाठी बेअरर चेक. तो कसा वटवायचा हे ते ठरवतात. मुलाला मुलगी पसंत पडली पाहिजे. शिकलेली-गोरी-घरपण सांभाळणारी पुन्हा आज्ञाधारक या अटींवर पसंती झाली की पुढचा व्यवहार पालक सांभाळतात.
डॉक्टर-इंजिनिअर-सरकारी नोकरीत क्लार्क-शिपाई ते शिक्षक-एलआयसी-बॅँक ते थेट आयटी अमेरिकेपर्यंत हे रेटकार्ड बदलत राहतं.
मुलगी पसंत पडून, तेवढे पैसे वधूपित्यानं मोजले की कार्य संपन्न होतं.
म्हणजेच काय तर जितकं शिक्षण कमी, तितका हुंडा कमी. जितकं शिक्षण जास्त, तितका हुंडा जास्त!
हा विरोधाभास आहे..
पण तो आहे आणि वाढतो आहे, हे या पत्रांत स्पष्ट दिसतं कारण आपण शिकलो असतो तर आपल्यालाही भरपूर हुंडा मिळाला असता, अशी खंत या पत्रांत अनेक तरुण खुलेआम व्यक्त करतात.
..तरीही या पत्रात शुभवर्तमान म्हणावं असं काही सापडतं हा आशेचा किरण आहे. हुंड्यांचं राटकार्ड नि हावरट सेलिब्रेशनपायी होणारा खर्च, सोयीचा आधुनिकपणा पाहून वैताग येतो. पण तरीही उमेद वाटावी अशा काही गोष्टी या पत्रात आहेत..
आणि मुख्य म्हणजे आपले दोष मान्य करण्याचा खुलेपणाही या पत्रात दिसतो तो महत्त्वाचा आहे.
काय आहेत ते शुभसंकेत?
१) हुंडा घेणं, लग्नात अनाठायी खर्च करणं हे चूक आहे, अत्यंत अनाठायी हे सर्वांनाच मान्य आहे. काहींना निर्णय घेता येत नसला तरी आपण जे करतोय ते चूक आहे हे मनोमन मान्य आहे. निदान चूक आहे हे कळतंय इतपत प्रगती, शुभसंकेतच म्हणायची.
२) आपण हुंडा घेणार नाही, त्यापायी आईबाबांशी भांडू, निदान बोलू तरी असं म्हणणारी पत्रं बरीच दिसतात. त्या ब्लॅकमेलपुढे आपला टिकाव लागत नाही ही खंत व्यक्त करतात.
३) आपण हुंडा घेतो, आपलं आईबाबांपुढे काही चालत नाही हे कबूल करत आपल्या चुकीचा दोष अनेकजण इतरांना देत नाहीत हे महत्त्वाचं.
४) हुंड्यापायी शोषण कमी झालंय, हे मुली थोडंबहुत मान्य करतात. पण स्वच्छेने पालकांनी दिलं तर नाही का म्हणायचं हा त्यांचाच उलटा प्रश्न आहे.
५) हुंड्याला नाही म्हणणारा, त्यासाठी जनजागृती करणारा, लोकांशी भांडणारा, जातीचे टोमणे ऐकणाराही एक तरुण वर्ग खेडोपाडीसुद्धा आहे, तो आज अल्पसंख्य असला तरी भविष्यात तो वाढेल अशी आशा ठेवायला जागा आहे. या अंकातली पान ६ वरची पत्रं हे त्याचंच प्रातिनिधिक उदाहरण आहे. आशेच्या त्या किरणाकडे हुंड्याच्या कचाट्यातही दुर्लक्ष करता येत नाही.
लग्नाचं रेटकार्ड
कोण किती हुंडा घेतो याचं एक रेटकार्डच या पत्रांमध्ये सापडलं.
हे रेट कमी किंवा जास्तीही असू शकतात, कारण राज्यात विभागवार त्यात फरक पडतो असं ही पत्रंच सांगतात.
आयटीआय झालेला- २५,००० रुपये हुंडा+लग्न थाटात करून देणं+दागिने(ऐच्छिक)
सरकारी नोकरीत शिपाई- ५०,००० रुपये हुंडा+लग्न थाटात करून देणं+दागिने(ऐच्छिक)
पोलीस शिपाई- दीड ते दोन लाख रुपये हुंडा + लग्न थाटात करून देणं+दागिने
पीएसआय - आठ ते दहा लाख रुपये हुंडा+लग्न थाटात करून देणं.
सरकारी कर्मचारी- कारकून इत्यादि- दोन ते तीन लाख रुपये हुंडा + लग्न थाटात करून देणं+दागिने
सरकारी अधिकारी ( एमपीएससी लेव्हल)- पाच ते दहा लाख रुपये + लग्न आलिशान करून देणं+ १० तोळे सोनं.
बडा अधिकारी/अमेरिका किंवा फॉरेनवाला/ आयटीवाला/सीए/ डॉक्टर-
१० ते २० लाख+२० तोळे सोनं+ लग्न आलिशान.
सगळ्यात महत्त्वाचं लग्न आलिशान करून देणं यातच बॅण्डवरात, जेवणावळी ते मुलीला द्यायची प्रत्येक संसारोपयोगी वस्तू देणं हे अभिप्रेत आहे. याउपर हौसेखातर जे कराल ते वेगळं.
जाहीर बैठका होत्या तेच बरं!
ही पत्रं असंही सांगतात की, पूर्वी लग्नाच्या बैठका होत. त्यात याद्या केल्या जात. साक्षीदारांच्या देण्या-घेण्याच्या यादीवर सह्या होत. याउपर मागणं नाही हा नियम होता. काय ते बैठकीतच समाजासमोर ठरायचं. आता तसं होत नाही. तुम्हाला मुलीला जे द्यायचं ते द्या, तुमच्या ऐपतीप्रमाणं लग्न करून द्या, असं मुलीच्या वडिलांना सांगून मोठायकी केली जाते.
पण ‘आपल्या’ऐपतीप्रमाणं न करता, व्याह्यांना बरं वाटेल, त्यांच्या शब्दाचा मान राहील असं म्हणत मुलीचे वडील गरजेपेक्षा जास्तच करतात. आणि आपण सारं मुलीलाच देतो आहोत असं मानून हुंड्यालाच वेगळं रूप घेऊ देतात.
त्यावरून नंतर कटकटी होतात. त्यापेक्षा त्या बैठका नि याद्याच बऱ्या होत्या, असं या पत्रांचं म्हणणं!