क्या स्वाद है जिंदगी में !

By admin | Published: September 8, 2016 12:58 PM2016-09-08T12:58:56+5:302016-09-08T13:31:25+5:30

कोणाला स्वस्तात गिफ्ट द्यायचं झालं तर चॉकलेट, कोणाला प्रपोज करायचं तर चॉकलेट, स्वत:ला खूश करायचं झालं तर चॉकलेट,

What is the taste in life! | क्या स्वाद है जिंदगी में !

क्या स्वाद है जिंदगी में !

Next

 - अनादि अनंत

कोणाला स्वस्तात गिफ्ट द्यायचं झालं 
तर चॉकलेट,
कोणाला प्रपोज करायचं तर चॉकलेट, 
स्वत:ला खूश करायचं झालं तर चॉकलेट,
दुश्मनी संपवायची असली तरी चॉकलेट,
खिशात फारसे पैसे नसताना
सेलिब्रेशनची सवय लावली ती चॉकलेटनं.
चॉकलेट फक्त खायचा आयटम राहिला नसून 
आयुष्याची थीम बीम बनलाय,
आहात कुठे?


‘हितेनचा सेंडआॅफ आहे उद्या, काय देणार आहेस त्याला?’ माझा काय संबंध, हे उत्तर गिळून म्हटलं, एखाद चॉकलेट आणेन. 
‘तू त्याला चॉकलेट देणार म्हणजे चॉकलेटच्या इतिहासातला सुवर्णक्षणच म्हणायला हवा’ - एकाची आगंतुक प्रतिक्रि या. 
पण चॉकलेटच्या इतिहासातला सुवर्णक्षण? मुळात चॉकलेटला असा लय भारी इतिहास-बितिहास आहे का? असावा. चॉकलेट हे फक्त खायचा एखादा आयटम नसून आयुष्याची थिम बीम असू शकतं मग बाकीचं आलंच की ओघानं. 
चॉकलेट आपल्या आयुष्यात व्यापारी म्हणून घुसून राज्यकर्ता व्हायलासुद्धा वर्षं लोटली. त्याचा सर्वसमावेशकपणा वादातित आहे. वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या रूपात आपल्या जगण्याचा हिस्सा बनण्याची चॉकलेटची ताकद थक्क करते. सोनेरी कागदाच्या वेष्टनातून सटी-सहामाही घरी येणारी चौकोनी वडी ते चॉकलेट फ्लेवर्ड डिओड्रंट, साबण, गोरी करणारी क्र ीम्स, सौंदर्य प्रसाधनं, कार फ्रेशनर, हेअर कलर आणि कंडोम इथपर्यंत ते येऊन ठेपलं आहे. 
एखाद्या खाद्यपदार्थानं जगावर अधिराज्य गाजवण्याची उदाहरणं विरळच. आणि अधिराज्य गाजवावं तेही किती वर्षं? थोडीथोडकी नाही, तब्बल ४००० वर्षं! धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, संस्कृती, लिंगभेदभाव या सगळ्यांना पुरून वर उरलं हे चॉकलेट. 
देवाचा प्रसाद म्हणून कोकोच्या बियांपासून बनवलं जाणार पेय ‘माया’ लोकांनी (मेक्सिकोतील प्राचीन संस्कृती) प्यायला सुरु वात केली ती इसवीसनपूर्व २००० पासून. त्यानंतर चॉकलेटनं कधी मागे वळून पाहिलंच नाही. मायानंतर आलेल्या ‘आस्तेक’ राजांना चॉकलेट उगवायची कला माहीत नव्हती म्हणून त्यांनी उगवू शकणाऱ्या लोकांकडून टॅक्स वसूल करायला सुरुवात केली चॉकलेटच्याच स्वरूपात. शतकानुशतकं चॉकलेटचा वापर चलन म्हणून केला गेला. ज्याच्याकडे जास्त चॉकलेट तो जास्त श्रीमंत. (आजही शाळा-कॉलेजेसमध्ये ही व्याख्या लागू पडते बुवा. जिला किंवा ज्याला चॉकलेट डे ला सगळ्यात जास्त चॉकलेट मिळणार ती किंवा तो सगळ्यात हॉट अँड सेक्सी.) 
युरोपियनांना हे गुलाबकावलीचं फूल शोधून दिलं ते ख्रिस्तोफर कोलंबसनं. सोळाव्या शतकात युरोपियन राजे-राण्या, सरदार, अमीरउमरावांना चॉकलेटची चटक लागली आणि अर्ध्या जगातली माणसं गुलामगिरीच्या साखळदंडात जखडली गेली. तत्कालीन शासकांनी साऊथ अमेरिका आणि आफ्रिका खंडातील कोकोच्या बागांमध्ये काम करणाऱ्या काळ्या गुलामांवर केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या आजही अंगावर शहारे आणतात. चॉकलेटने औद्योगिक क्र ांतीतही मोलाची भूमिका बजावली. स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर चॉकलेटचं उत्पादन करता यावं म्हणून यंत्रे निघाली. फूड इंडस्ट्रिजची ती सुरु वात होती. १८७५ मध्ये डॅनियल पीटर नामक उत्पादकानं मिल्क चॉकलेटचा शोध लावला आणि जन्म झाला चॉकलेट वॉर्सचा. 
त्यानंतरचं शतक राज्य केलं ते हर्शीज, नेस्ले, कॅडबरीसारख्या मातब्बर घराण्यांनी. नवनवीन चॉकलेट रेसिपीज शोधून, त्यावर प्रयोग करून स्वस्तातली चॉकलेट जगातल्या प्रत्येक बाजारपेठेत विकायचा सपाटा या कंपन्यांनी लावला. जागतिक बाजारपेठेला काबीज करण्याची या घराण्यांमधली स्पर्धा (चॉकलेट वॉर्स) एवढी तीव्र आणि नाट्यपूर्ण होती की त्यावर नंतर कित्येक सिनेमे, नाटकं आणि कादंबऱ्या निघाल्या. थोरामोठ्यांच्या ओंजळीतून आपण भारतीयांच्या हातात चॉकलेट पडण्याचा हाच तो काळ. ‘क्या स्वाद है जिंदगी में’ म्हणत आयुष्य व्यापलं त्यानं. 

आज स्वस्तात गिफ्ट द्यायचं झालं तर चॉकलेट, कोणाला प्रपोज करायचं झालं तर चॉकलेट, स्वत:ला खूश करायचं झालं तर चॉकलेट आणि दुश्मनी संपवायची असेल तरी चॉकलेट. मार्केट तंत्राचा भाग म्हणून चॉकलेटला चकाकी आणि ग्लॅमर दिल खरं पाश्चात्त्यांनी, पण आज देशी कंपनीनं बनवलेला स्लॅब आणून घरच्या घरी चॉकलेट (तेही वाट्टेल त्या पद्धतीनं) तयार करत भारतीयांनी त्याला आपल्याच रंगात रंगवलंय. भरीस भर संपूर्ण स्वदेशी म्हणत योगगुरू बाबांनी त्यांचं चॉकलेट बाजारात आणलं आहेच. 
खिशात फारसे पैसे नसताना सेलिब्रेशनची सवय आपल्याला लावली ती चॉकलेटनं. तसेच स्वत:ला खूश ठेवण्यासाठी काही लागत नाही एक चॉकलेट सोडून असं ठसवलंही त्यानंच. आता तर ‘तुझे भूक लगी तो तू हिरॉईन बन जाता है, ले ये खा’ असं म्हणत चॉकलेट आपली प्राथमिक गरज बनत जात आहे. देवाचा प्रसाद ते प्रासादातलं उत्तेजक पेय असा प्रवास झालाच आहे पहिल्या टप्प्यात. आता स्वस्तातला आलिशान आनंद ते मुख्य अन्न असा प्रवास पाहायचा चॉकलेटचा. आणि ४००० वर्षं माणसाला या ना त्या प्रकारे अधिपत्याखाली ठेवणाऱ्या चॉकलेटला ते अवघडही नसावं. 

-------------------


इन्फो बॉक्स 1 

चॉकलेटचा शाप 

सोळाव्या शतकात चॉकलेटला गुलामगिरीचा शाप लागला तो अजूनही कायम आहे. काही अभ्यासकांच्या मते जगातल्या ९० टक्के चॉकलेट उत्पादनाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात गुलामांचा वापर केला जातो. हा शाप इतका जास्त प्रमाणात पसरला आहे की काही वर्षांपूर्वी नेस्ले कंपनीच्या बऱ्याच चॉकलेट्सवर अमेरिका तसंच युरोपियन कंपन्यांनी बंदी घातली होती. 
कारण? - त्याच्या कोको उत्पादनात बालमजुरांचा वापर केला जात होता. जगभरातल्या सेवाभावी संस्थांनी चॉकलेट उत्पादनातल्या कुप्रथा बंद व्हाव्या म्हणून पुढाकार घेतला असला तरी त्याला म्हणावं तसं यश आलेलं नाही. 

इन्फो बॉक्स 2 : 

फेअर ट्रेड चॉकलेट 

कोका उत्पादकांनादेखील दलालांच्या मुजोरीमुळे नुकसान सोसावं लागतं. जागतिक बाजारपेठेत चॉकलेटला सोन्याचा भाव असला तरी उत्पादकांच्या हाती फारसं काही पडत नाही. त्यामुळेच वेठबिगारीसारख्या कुप्रथा सुरू होतात. याला आळा घालण्यासाठी तसेच उत्पादकांना हमीभाव मिळावा म्हणून फेअर ट्रेड ही चळवळ सुरू झाली आहे. 


चॉकलेट आणि प्रणय 

चॉकलेटचा संबंध कायम प्रणयाशी जोडला आहे. चॉकलेट बरोबरीनं चहा कॉफीदेखील उत्तेजक पदार्थ आहेत, पण ते बापुडवाणे मध्यमवयीन संसाराच्या चक्र ात अडकलेले दिसतात कायम. जाहिराती तरी काय दाखवतात? चहा पिऊन तुम्हाला तरतरी येते, त्यामुळे तुम्हाला दिवसभराची कामं करण्यात उत्साह येतो, त्यात काम करणं आलंच ओघानं. पण चॉकलेटचं मात्र असं नाही. त्याच्या जाहिरातींमधल्या बहुतांश स्त्रिया या मोहाला चटकन बळी पडणाऱ्या आणि चॉकलेट पाहताच स्थळाकाळाची, चांगल्या-वाईटाची समज विसरणाऱ्या दाखवल्या आहेत. चॉकलेटच्या सिनफुल प्लेजर या तत्त्वाशी मिळतं जुळतं चित्रण आहे हे. 
पुरुषांचं म्हणाल तर चॉकलेट खाताच त्यांच्या समोर एखादी सुंदर ललना अवतरते. पुढे कल्पनाशक्तीला वाव आहेच! 

(लेखिका मुक्त पत्रकार आहे)

Web Title: What is the taste in life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.