वजन किती हवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:33 AM2018-04-19T08:33:17+5:302018-04-19T08:33:17+5:30

आपल्याला वाटते, वाढत्या वयानुसार आपले वजन योग्य आहे, पण खरे तर विसाव्या वर्षीचे वजन हेच आपले योग्य वजन!

What is the weight? | वजन किती हवे?

वजन किती हवे?

googlenewsNext


-डॉ. यशपाल गोगटे

लहानपणापासून शरीराचा विकास व वाढ होत असतांना उंची व वजन वाढणे हा नैसर्गिक नियम आहे, पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ज्यावेळेस वजन वाढते त्यावेळेस ते नुकसानकारक ठरत असते. यावरून जाडी किंवा लठ्ठपणा ठरत असतो. पण आपण जाड आहोत का नाही हे कसे ओळखावे? व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणेच प्रत्येकाची अंगकाठी व वजन वेगवेगळे असते. त्यामुळे लठ्ठपणा ठरवतांना केवळ वजनाचा निकष लक्षात न घेता आणखीन काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. यासाठी ‘बीएमआय’ हा साधारण लोकांना सहजपणे मोजता येईल असा फॉर्मुला उपयोगात आला.

बीएमआय = वजन / उंचीचा वर्ग
उदाहरणार्थ.. ५ फूट ७ इंच (१.७ मीटर) उंचीच्या व ७५ किलो वजनाच्या माणसाचा बीएमआय= ७५/ (१.७)२ = २५.९
आशिया खंडातील विशेषत: भारतीयांमध्ये बीएमआय २१ हा योग्य मानला जातो. परंतु तो अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल असे म्हंटले जाते. हाच मानक युरोपीय लोकांसाठी ३० असा आहे. याचे कारण भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यत: पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते. पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते कारण ही चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही टॉक्सिक हार्मोन्स सोडते ज्याला एॅडीपो- सायटोकाईन्स असे म्हणतात. हे एॅडीपो- सायटोकाईन्स स्थूलतेमुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक आजारांना आमंत्रण देतात. याउलट युरोपीय वंशातील लोकांमध्ये खांदा व मानेच्या अवतीभवती विसावलेली चरबी ही शांत व निष्क्रिय असल्यामुळे एकूणच कमी धोकादायक असते.

बीएमआयच्या व्यतिरिक्त पोटाचा घेरसुद्धा लठ्ठपणाचा एक चांगला मापदंड म्हंटला जातो. स्त्रियांमध्ये हा ३१ इंच (८० सेमी) वा त्यापेक्षा अधिक तर पुरुषांमध्ये ३५ इंच (९० सेमी) च्या वर असल्यास स्थूलतेत मोडतो.
वजनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम दोन प्रकारात मोडतात- एक चयापचयाशी संबंधित आजार जसे डायबेटीस, कोलेस्टेरॉल, उच्च- रक्तदाब इ. व दुसºया प्रकारातील आजार स्थूलतेमुळे हाडं व स्नायूंचे आजार- पाठदुखीपासून गुडघे दुखीपर्यंत. या दोन्ही धोक्यांमध्ये तुलना केल्यास चयापचयाशी संबंधित आजार हे थोडेही वजन वाढले तरी आपले डोके वर काढतात, तर हाडांच्या व स्नायूंचे आजार वजनातील लक्षणीय वाढीनंतरच होतात. आपल्या शरीराचे वजन वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे येऊ शकते. त्यामध्ये अक्षरश: किलो-दीड किलोचाही फरक पडू शकतो. त्यामुळे शक्यतो वजन मॉनिटर करतांना एकाच वेळी ऐकाच काट्यावर वजन करावे.

१८ ते २० वयानंतर आपली उंची स्थिरावते व हाडांची वाढ थांबते. त्यामुळे या वयात जे वजन असते (जर ते ‘अति’ प्रमाणात नसेल तर) ते आपल्या शरिराला सहजपणे पेलवते. सामान्यत: एक समज आहे कि वयाबरोबर वाढणारे वजन हे शरीराला सहजपणे पेलवता येते, पण या वाढणाºया वजनालाही ५ किलोपर्यंतची मर्यादा असते. म्हणजेच तुमच्या अठरा ते विसाव्या वर्षाच्या वजनापेक्षा जर तुमचे वजन ५ किलोपेक्षा अधिक असेल आणि जरी ते उंचीला प्रमाणशीर असेल तरीही ही लठ्ठपणाची सुरवात ठरू शकते.
उदाहरणादाखल एखाद्या अतिशय काटक स्त्रीचे अठरा ते विसाव्या वर्षीचे वजन ४५ किलो आहे व दहा वर्षानंतर ते ६० झाले, तर ती लठ्ठपणातच मोडते. तिच्या उंचीनुसार योग्य वाटणारे हे वजन तिच्याकरता धोकादायक असू शकते. त्यामुळे बारीक माणसाने आयुष्यभर बारीकच राहावे व जाड माणसाने आयुष्यभर बारीक होण्याचा प्रयत्न करावा.
माणसाच्या वजनवाढीचीही काही कारणे आहेत. ते पाहूया पुढील लेखात..


(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: What is the weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.