भविष्यात कशाला स्कोप असेल ? हे घ्या उद्याच्या जगातल्या 12 इमर्जिग करिअर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:50 PM2019-06-06T13:50:23+5:302019-06-06T13:54:27+5:30
उद्याच्या जगातल्या नव्या संधी आजपासूनच आपली वाट पाहत आहेत. मात्र त्यांना एकच गोष्ट कळते, तो म्हणजे बदल. जो बदलांना सामोरं जाण्याची धडाडी दाखवेल तोच या लाटेत टिकेल, जो बदल स्वीकारणार नाही, त्याचं काही खरं नाही! नव्या वाटेवरच्या या काही संधी. एल्डर केअर, सोशल मीडिया मार्केटिंग, सोलर एक्सपर्ट, एज्युकेशन काउन्सिलर , मेण्टल हेल्थ, वेस्ट मॅनेजमेण्ट, वॉटर एक्सपर्ट, रिन्युएबल एक्सपर्ट, गेमिंग, पर्यावरण, यूजेबिलिटी एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी
अतुल कहाते
उद्याचं जग नक्की कसं असेल याविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनात विलक्षण कुतूहल असतं.
या नव्या जगात आपल्या दैनंदिन आयुष्यात काय बदल होतील, कोणत्या नव्या गोष्टी येतील, समाजात कोणत्या नव्या घडामोडी घडतील याविषयी आपण अधूनमधून वाचतंही असतो. कारण तंत्रज्ञानानं जग वेगानं बदलतं आहे. निरनिराळ्या विषयांमधले तज्ज्ञ आणि अभ्यासक नव्या बदलत्या जगातल्या अनेक चांगल्या वाईट शक्यता वर्तवत असतात. माणसाचं जगणं, रोजगार, सामाजिक बदल, परस्पर नातेसंबंध आणि वर्तन यासंदर्भातल्या या सगळ्याच शक्यता आणि वेगवेगळ्या प्रकारची भाकितं हे सगळंच सुखावणारं असतं, असंही काही नाही.
काही गोष्टी आपल्याला घाबरवून सोडणार्याही असतात.
त्यातलाच सगळ्यात महत्त्वाचा आणि तरुणांच्या जगण्यात ऐरणीचा असा मुद्दा आहे तो म्हणजे रोजगार आणि व्यवसाय संधी. जॉब आणि करिअर. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा, दुसरीकडे कुशल-अकुशल मनुष्यबळाचा प्रश्न, उपलब्ध प्रचंड मनुष्यबळ, अनेक क्षेत्रातलं बदलत जाणारं कामाचं स्वरूप आणि आवश्यकता असे अनेक बदल नजीकच्या भविष्यातच काय; पण वर्तमानातही बदलाचा वेग सूचित करत आहेत. त्यामुळेच आजही अनेक जणांना आपली नोकरी उद्याच्या जगात शाबूत राहील की नाही याची चिंता वाटते. सतत चर्चा होतेय की, आज जे जॉब्ज आहेत, ते उद्या नसतील, त्यांचं स्वरूप बदललेल, त्यांची गरज संपेल. अशावेळी आता ते काम करत असलेल्यांनी कसं बदलायला हवं, कोणती नवीन स्कील्स शिकायला हवीत हे तर सारे चर्चेचे विषय आहेतच.
मात्र आज जे शिकत आहेत, ज्यांना आपल्या करिअरचे निर्णय घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. कारण पारंपरिक जॉब्ज मागे पडत असले तरी काही नवीन क्षेत्रं आणि त्या क्षेत्रात व्यवसाय, रोजगार आणि जॉबच्या संधी विविध पातळ्यांवर उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे भविष्यात आयटीला स्कोप असेल का? इंजिनिअरिंगला स्कोप असेल का? नेमका कशाला स्कोप असेल? असे प्रश्न आज जर तुम्हाला आणि तुमच्या पालकांनाही छळत असतील तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की, उद्याच्या जगात नव्या संधी आजपासूनच आपली वाट पाहत आहेत. कारण एकीकडे उद्याचं जग काळजीचा विषय वाटत असलं तरी दुसरीकडे ते भन्नाटही होत जाणार आहे.
या सगळ्यांत एक समान धागा आहे.
तो म्हणजे बदल.
जो बदलांना सामोरं जाण्याची धडाडी दाखवेल तोच या लाटेत टिकून राहू शकेल. काळाच्या ओघात होणारे बदल जे स्वीकारू शकणार नाहीत त्यांचं मात्न काही खरं नाही असं सगळेच जण म्हणत राहतात. मात्र हे काही आजचं नाही. बदल तर निरंतर होतच आहे. सुप्रसिद्ध लेखक एच.जी. वेल्स यानं आपल्या 1922 सालच्या ‘अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकात याविषयी भाष्य केलं होतं, त्याकाळी त्यानं हे भाष्य करावं यातच सगळं आलं. म्हणजेच आजच्या सुमारे एक शतकाआधी वेल्सनं उद्याचं जग बदलांचं असल्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, असं म्हटलं होतं. म्हणजेच काय तर उद्याच्या जगाच्या अनिश्चिततेविषयीची भीती आजची नाही. पूर्वीपासूनच माणसाला याची काळजी वाटत राहिलेली आहे. मग यात नेमकं नवं काय आहे?
बदल आपल्याला नवे नाहीतच. बदल पूर्वीपासून होत आलेलेच आहेत. मात्र या बदलांसंबंधीचा अलीकडच्या काळातला सूक्ष्म; पण अत्यंत महत्त्वाचा फरक म्हणजे या बदलांचा वेग. हा वेग मात्न विलक्षण झपाटय़ानं वाढत चालला आहे. म्हणजेच पूर्वी एखादा बदल घडायला कदाचित काही शतकं लागत असतील तर आता हा बदल काही दशकांमध्येच होतो. काही दशकांमधला बदल आता काही वर्षामध्ये, तसंच काही वर्षामधला बदल अक्षरशर् काही दिवसांमध्ये होतो.
साहजिकच त्या वेगासह आपल्याला बदलांना सामोरं जावं लागणार आहे. बदल होतात, आपल्याला बदलावं लागणार हे सत्य आपल्याला आधीपासून माहीत असलं तरी बदलांचा आजचा विस्मयकारक वेग मात्न आपल्याला हादरवून सोडणारा आणि थकवणारा आहे.
या प्रचंड वेगाची आपल्याला अजिबात सवय नाही.
कदाचित या वेगाचा आपल्याला अंदाजही नाही.
म्हणूनच या वेगाशी जुळवून घेणं आपल्याला कठीण जातं आहे.
या वेगानं घडणार्या बदलांनी आपल्या आयुष्यात विलक्षण उलथापालथ घडवून आणण्याला केव्हाच सुरुवात केली आहे. आता तर या बदलांच्या वेगात आणखी वाढ होत चालली आहे. याची असंख्य उदाहरणंही आपण अनुभवतो आहोत.
ही त्याची नुसती एक झलक पहा. उदाहरणं पहा.
* अमेरिकेमध्ये चालकविरहित गाडय़ांची चाचणी मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे.
* चीनमध्ये एका माणसाचा तुटलेला हात कृत्रिमरीत्या बनवलेल्या हातानं बदलून टाकण्याची किमया घडलेली आहे.
* जर्मनीतल्या काही कारखान्यांमध्ये माणसांची गरजच नाही; आता यंत्नमानव तिथलं काम करतात.
* सौदी अरेबियानं स्रियांना अनेक जुनाट संकल्पनांमध्ये बांधून टाकलेलं असताना सोफिया नावाच्या एका (महिला) यंत्नमानवाला नागरिकत्व दिलं आहे.
* फेसबुक, ट्विटर यांसारख्या माध्यमांमधून मिळणारी माणसांचा कल आणि वर्तन याची अत्यंत उपयुक्त माहिती वापरून डोनाल्ड ट्रम्पसारखा माणूस अमेरिकेचा राष्ट्रपती बनला आहे.
* आयबीएम कंपनीच्या वॉटसन नावाच्या सॉफ्टवेअरनं अनेक वकिलांच्या नोकर्यांवर गंडांतर आणलं आहे.
* यंत्नमानव सर्रास शस्रक्रि या करायला लागले आहेत.
* भारतातही काही ठिकाणी शेतीला आपोआप योग्य तेवढंच पाणी देण्यासाठीची यंत्नणा पूर्णतर् संगणकांद्वारे चालवली जाते आहे.
ही उदाहरणं काय सांगतात?
अलीकडच्या काळात आपल्या होमो सॅपियन्स आणि होमो डय़ुअस या पुस्तकांमुळे खूप गाजलेला युवल नोआ हरारी अमरत्वाच्या संकल्पनेविषयी भरभरून लिहितो. मृत्यू ही संकल्पना माणसानं अनेक अंगांनी कल्पिलेली आहे. काही जणांना मृत्यूची खूप भीती वाटत असल्यामुळे मृत्यूला अध्यात्मिक रूप देण्यात आल्याची टीका काही जण करतात. म्हणजेच आपण आपलं आयुष्य कसं जगतो, त्यात पाप-पुण्य यांना किती स्थान देतो यावर आपलं मृत्यूपश्चात जीवन अवलंबून आहे असं सगळ्याच धर्मामध्ये सांगितलं जातं. याचा मुख्य उद्देश आपल्या आयुष्याला चांगलं वळण लावण्याचा असतो असं हरारी म्हणतो. विज्ञानाच्या दृष्टीनं मृत्यू ही वीज चमकण्यासारखी किंवा सूर्यास्त होण्यासारखी फक्त एक तांत्रिक गोष्ट असते. एकदा हे मान्य केलं की मृत्यूभोवतालचं गूढ संपवून फक्त त्यामधल्या तांत्रिकतेचा विषय शिल्लक राहील, असं त्याचं म्हणणं आहे. 2012 साली गूगल कंपनीनं कॅलिको नावाची एक उपकंपनी स्थापन केली. या उपकंपनीचा एकमेव उद्देश अमरत्वाविषयीचं संशोधन करणं हाच आहे. 2050 साली जे लोक चांगली तब्येत राखून असतील आणि बर्यापैकी श्रीमंत असतील ते आपला मृत्यू अनेक दशकं लांबणीवर टाकू शकतील, असं आता या विषयातले तज्ज्ञ म्हणतात. म्हणजेच तोर्पयत या विषयावरचं संशोधन अत्याधुनिक पातळीपर्यंत पोहोचलेलं असेल असं मानलं जातं.
जगण्याचा वेग असा विलक्षण वेगानं बदलत असताना त्यासोबत जगण्यासाठी आवश्यक सेवा, वस्तू आणि मनुष्यबळही लागेल. त्या मनुष्यबळाकडून असलेल्या अपेक्षाही बदलतील.
साहजिकच नव्या जगात तरु ण/तरु णी कोणत्या क्षेत्नांमध्ये आपली कारकीर्द घडवू शकतील हा मुद्दा अत्यंत कळीचा ठरणार आहे. अनेक पारंपरिक उद्योग-व्यवसाय मोडीत निघण्याची आणि त्याच्याच जोडीला अनपेक्षितपणे नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. हे फक्त भारतापुरतं किंवा कुठल्याही एका देशापुरतं मर्यादित नसून त्याचा झपाटा अख्ख्या जगाला व्यापणारा ठरणार आहे. म्हणूनच सध्या शिकत असलेल्या तरुण/तरुणींनी पारंपरिक मार्गाचा विचार करण्यासोबतच नव्या इर्मजिंग क्षेत्रांचाही विचार करिअर म्हणून करावा. त्या क्षेत्राविषयी अधिक माहिती मिळवावी. त्यासाठी काय कौशल्य लागतील, कशाप्रकारे स्वतर्ला घडवावं लागेल हे समजून, शिकून घ्यावं लागेल.
म्हणूनच हा विशेष अंक.
येत्या काळात झपाटय़ानं उदयाला येणार्या, वेगळ्या व्यवसाय संधी आणि जॉब्ज देणार्या क्षेत्रांची ओळख करून देणारा.
इमर्जिग 12 क्षेत्रांची ही धावती ओळख आहे.
संधी शोधणारी नजर आणि धडाडी यांच्या साथीनं बदलत्या जगात उत्तम करिअर घडवण्याच्या शक्यता स्वतर्साठी निर्माण करता येतील, हे नक्की!