आपलं लक्ष्य काय?
By Admin | Published: September 22, 2016 05:45 PM2016-09-22T17:45:28+5:302016-09-22T17:45:28+5:30
आपण नेहमी ऐकतो, ‘तो किंवा ती हुशार आहे’ पण आपल्याला हा प्रश्न कधी पडतो का, हुशार किंवा बुद्धिमान म्हणजे काय?
>- राजन हरकरे
(आयआयटी रुडकी)
गुणवत्ता, मेहनत आणि कौशल्य यांचा नीट मेळ घातला नाही तर यशाची वाट कशी सापडेल?
आपण नेहमी ऐकतो, ‘तो किंवा ती हुशार आहे’ पण आपल्याला हा प्रश्न कधी पडतो का, हुशार किंवा बुद्धिमान म्हणजे काय?
बुद्धिमत्तेची एक खूप चांगली परिभाषा प्रसिद्ध अमेरिकन मनोवैज्ञानिक डॉ. रॉबर्ट स्टर्नबर्ग आणि साल्टर यांनी दिली आहे. त्यांच्या थेअरी ऑफ इंटेलिजन्सप्रमाणे बुद्धिमत्ता किंवा ‘इंटेलिजन्स’ म्हणजे 'Goal Directed Adaptive Behavior' अर्थात, लक्ष्य वेधून त्याप्रमाणे स्वत:ला जुळवून घेण्याची प्रवृत्ती.
आणि खरंच आपण जर विचार केला तर हेच आढळून येईल की ही प्रवृत्ती म्हणजेच बुद्धिमत्ता आहे. जे लोक चांगल्या प्रकारे आपल्या लक्ष्याच्या, ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करू शकले ते हुशार झाले, सफल झाले. पण ही प्रवृत्ती येण्यासाठी आधी आपलं ‘लक्ष्य’ काय हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर स्वत:मध्ये बदल करण्याची इच्छा पण हवीच.
मग खेळ उरतो तो फक्त चोख मेहनतीचा. एका अध्ययनानुसार ९५ टक्के लोकांना आपलं लक्ष्यच माहिती नसतं, उरलेल्या ५ टक्क्यांपैकी ४ टक्के लोक आपल्या लक्ष्यासाठी बदलतच नाहीत. आणि जे १ टक्का बदलतात त्यात फक्त 0.१ टक्के निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी चोख अशी मेहनत करतात.
आपण कुठं असायला हवं?
उरलेल्या त्या 0.१ टक्क्यामध्ये आपण असायला हवं. हे ठरवून मग कामाला लागायला हवं.
परिस्थिती बदलते, काळ पुढे सरकतो पण नेहमी आत्मविश्वास असणंही हे गरजेचं आहे. आत्मविश्वास म्हणजे निगरगट्टपणा नव्हे तर स्वत:चं लक्ष्य आणि कौशल्यांवर विश्वास ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. काळासोबत स्वत:मध्ये बदल घडवणं, नवीन स्किल्स शिकणं, ती वापरणं हीच खरी परीक्षा असते.
आणि हे सारं करायचं तर मेहनत पण हवीच. स्किल्स असणारे सुद्धा खूप सापडतील पण मेहनत नसेल तर स्किल्सचा काय फायदा? त्यामुळेच प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू केविन दुरान्त यांनी म्हटलं होतं, ‘हार्डवर्कबीट्स टॅलण्ट इफ टॅलण्ट फेल्स टू वर्कहार्ड!’ म्हणजेच यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि बुद्धिमत्ता दोन्ही असणं गरजेचं. ती नसेल तर नुस्ती मेहनत करणारेही गुणी माणसांना मात देऊ शकतात.
आपल्या गुणांचा मेहनतीशी मेळ घालणं हेच खरं नव्या काळातलं आव्हान आहे.
आणि त्याशिवाय दुसरा काही पर्यायही आपल्यासमोर नाही.