तुमची स्ट्रॅटेजी काय?

By admin | Published: July 28, 2016 05:18 PM2016-07-28T17:18:21+5:302016-07-28T17:46:50+5:30

असं वाटणं वेगळं, पण त्यासाठी नेमकं करायचं काय हे माहिती असणं आणि ते करण्याची दिशा ठरवणं वेगळं ! ते कसं जमायचं?

What is your strategy? | तुमची स्ट्रॅटेजी काय?

तुमची स्ट्रॅटेजी काय?

Next

 - डॉ. श्रुती पानसे

आपण आयुष्यात लवकरात लवकर सेटल व्हावं असं कोणाला वाटत नाही?
अगदी प्रत्येकाला वाटतंच की, आपलं जीवन आनंदात जावं. योग्य आणि मनाजोगतं शिक्षण आणि प्रगतीकडे नेणारं, आयुष्यच बदलून टाकणारं करिअर हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यादृष्टीनं प्रत्येकाचीच काही ना काही आखणी चालू असते. 
मात्र अनेकदा निर्णय घेता येत नाही. काहीतरी चुकतंय असं वाटत राहतं. कधी वाटा चुकतात, कधी अंदाज, तर कधी निर्णय. आणि मग पुढे जगण्याचा सारा ताळाच चुकत जातो. ‘वेंधळं हे... गोंधळलं’ अशी मनाची अवस्था होतेच. अगदी ‘याड लागल्या’सारखंही वाटतंच. 
या सगळ्या गोंधळातून आपण कसं शहाणं होणार? आपल्याला नक्की काय करायचंय हे कधी कळणार? की नाहीच कळणार? असं वाटत राहतं. 
या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी हवी असते. आणि ती स्ट्रॅटेजी दुसरं कुणी आपल्यासाठी ठरवूच शकत नाही. ती आपण आपली ठरवायची असते. 
पण मग ही स्ट्रॅटेजी नेमकी ठरवायची कशी? तेच सांगणारा हा एक छोटासा गृहपाठ. तीनच गोष्टींचा!
तेवढा करा, काही उत्तरं तुमची तुम्हालाच मिळून जातील, तीही अगदी सहज!

१. ज्या गोष्टींविषयी मनात गोंधळ होतो आहे, त्या मनातल्या सर्वच्या सर्व गोष्टी कागदावर उतरवा. कागदावर गिचमिड झाली तरी चालेल. जरा वेळाने शांतपणे त्यावर विचार करायला घ्या. जी गोष्ट अयोग्य आहे असं वाटेल, त्यावर एकेक करून फुली मारा. कागदावर आता थोड्याच गोष्टी उरतील. त्यातही काही गोष्टी वजा करायच्या असतील तर त्या करा. समोर आपल्याला काय करायचं, यासाठीच्या काहीच गोष्टी उरतील! हा गृहपाठ केला, तर निर्णय घेणं सोपं होईल.

२. या पहिल्या चाळणीतून जे काही उरलं असेल ते तुमचं ध्येय आहे का? विचारा स्वत:ला! ते तसं असेल, तर आपण ठरवलेलं ध्येय काळाशी सुसंगत आहे का, ते पाहा. आजच्या काळात तुम्ही जे करायचं म्हणतात ते ‘चालायला’ हवं. निर्णय घेताना भविष्याचा विचार कराच. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जे ध्येय ठरवाल ते तुमचं स्वत:चं हवं. मित्राला आवडतं, मैत्रिणीला आवडतं, अमुक एकानं सांगितलं, घरच्यांनी ठरवलं असं नको. तुम्हाला स्वत:ला वाटलं पाहिजे की हेच काम जे आपल्याला करायचं. हेच आपल्या व्यक्तिमत्त्वातलं बलस्थान. आणि इथंच आपण झोकून देऊन काम करू शकू. या टप्प्यापर्यंत आपलं आपल्याला येता आलं पाहिजे.

३. काय करायचं हे ठरवणं तसं सोपंच असतं. पण ते कसं करायचं हे ठरवणं मात्र अवघड! कसं करायचं हे ठरवताना लागते ती स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी म्हणजे यशाकडे जाणाऱ्या पायऱ्या. आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे असं म्हटल्यावर ती गोष्ट आपल्यासमोर हजर झाली, अगदी लगेच मिळाली असं कधी होत नसतं, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं. ठरवलेली गोष्ट झाली नाही की तिथेच मन खचायला सुरु वात होते. म्हणूनच जे करायचं आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्नदेखील कधी एका पद्धतीचे नसतात. प्रत्येक टप्प्यावर प्रयत्नांची दिशा बदलावी लागते. टिकून राहावं लागतं. स्वत:ला सिद्ध करावं लागतं. 
त्यामुळेच जे ठरवलं ते करण्याची धमक कमावणं हा सगळ्यात मोठा भाग, तो आपल्याकडे आहे का ते तपासा!


(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)


 

Web Title: What is your strategy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.