ब्ल्यू टिक गायब , तेव्हा तुमच्याही मनात डाउट आलाच होता का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:07 PM2020-06-25T19:07:04+5:302020-06-25T19:31:50+5:30
दोन दिवस व्हॉट्सअॅपवर लास्ट सीन, ब्ल्यू टिक्स गायब झाल्या तर अनेकांनी नात्यावर, प्रेमावरच संशय घेतले, बरंच काहीबाही वाचलं ‘ते’ दिसण्यात.- हे असं का झालं?
-गौरी पटवर्धन
‘‘काही बोलू नकोस ......’’
‘‘अगं असं काय करतेस? ऐकून तरी घे ना.’’
‘‘काय ऐकून घेऊ? तुला जे करायचं होतं ते तू केलंस आणि त्यातून मला जे समजायचं होतं ते मला समजलं.’’
‘‘पण मी केलं काय?’’
‘‘मला कशाला विचारतोस? स्वत:च्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन बघ म्हणजे आठवेल.’’
..
‘‘हे बघ तुला फ्रेण्डशिप ठेवायची नसेल तर सरळ सांग ना. पॉलिटिक्स कशाला करतेस?’’
‘‘मी? मी काय पॉलिटिक्स केलं?’’
‘‘पॉलिटिक्स नाही तर काय?’’
‘‘उगाच काहीपण बोलू नकोस हां, मी असं कधीच करत नाही.’’
‘‘हो का? मग त्या दिवशी केलंस ते काय होतं?’’
‘‘काय होतं?’’
‘‘किती जास्त शहाणी आहेस गं तू. पण मीही काही कमी नाहीये. मला समजतं.’’
‘‘समजतं तर घे मग समजून. काहीतरी अर्धवट बोलत.’’
‘‘मी नाही अर्धवट बोलत, तूच काय ते केलं आहेस.’’
****
‘‘भाई, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.’’
‘‘काय केलं राव मी?’’
‘‘बस का म्हणजे? असं बोलू रहायले जसं तुम्हाला माहितीच नाही.’’
‘‘काय माहितीच नाही?’’
‘‘जाऊंद्याना, आता बोलून काय फायदा? आम्हाला जे समजायचं ते समजलं ना.’’
गेल्या आठवडय़ात आपल्या अवतीभोवती अनेक लोकांनी एकमेकांवर असे आरोप केले. बॉयफ्रेण्डने गर्लफ्रेण्डवर, गर्लफ्रेण्डने बॉयफ्रेण्डवर, मित्नाने मित्नावर, मैत्रिणीने मैत्रिणीवर.
सगळ्या जगात अविश्वासाचा नुसता महापूर आला. त्यात ज्यांच्या नात्याचा पाया भक्कम होता ती नाती टिकली, ज्यांच्या नात्यात आधीच धुसफूस होती, ती या अविश्वासाच्या लाटेत चक्क कडाकडा भांडली किंवा धुसफूसत राहिली.
आणि हे सगळं झालं कशामुळे? तर एका तांत्रिक अडचणीमुळे!
झालं असं, की मागच्या आठवडय़ात अचानक लोकांच्या असं लक्षात आलं, आपल्याला जी व्यक्ती अत्यंत जवळची वाटते, जिने आपल्याशी पूर्ण प्रामाणिक आणि पारदर्शक राहावं असं आपल्याला वाटतं, त्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपची सेटिंग्ज बदलली आहेत.
आपल्याला अचानक त्या व्यक्तीचं लास्ट सीन दिसत नाहीये. आपण त्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज तिने वाचला की नाही, ते दाखवणा:या दोन ब्लू टिक्स दिसत नाहीयेत.
एखाद्या माणसाने त्याचं लास्ट सीन आणि ब्लू टिक्स बंद केल्या याचा अर्थ सरळ आहे, की तिला आपल्यापासून काहीतरी लपवायचं आहे. ती शेवटची कधी ऑनलाइन होती ते आपल्याला माहिती नसेल तर तिने रिप्लाय का केला नाही हे आपण तिला विचारू शकत नाही. तिने ब्लू टिक्स बंद करून ठेवल्या तर आपला मेसेज तिने बघितला आहे की नाही हे कळायला आपल्याला काही मार्गच उरत नाही.
व्हॉट्सअॅपचं सेटिंग असं करणा:या व्यक्तीच्या मनात काहीतरी काळंबेरं आहे की काय असे डाउटही अनेकांना येतात.
आणि आपल्या नात्यात काहीतरी घोळ आहे असंही वाटतं. त्यात लॉकडाऊनचा काळ. म्हणजे ऑनलाइन असणं, आणि ऑनलाइनच बोलणं हेच अनेकांच्या जगात श्वास घेण्याइतकं महत्त्वाचं झालेलं आहे.
विशेषत: कोरोनाची लंबी जुदाई सहन करणा:या जोडप्यांना तर व्हॉट्सअॅप म्हणजे अतिशय जीवनावश्यक गोष्ट.
पण मगएक दिवस अचानक लास्ट सीन दिसेना, ब्ल्यू टीक दिसेनात.
लगेच लोकांनी एकमेकांना विचारलं. फेसबुकला स्टेट्स टाकूनही विचारलं. बाकीच्यांनी ज्यांनी कुणाला विचारलं नाही, त्यांनी एकानंच ही सेटिंग बदलली आहे की अनेकांचं असं झालंय हे डिटेक्टिव्हगिरी करत तपासून पाहिलं.
खरं तर गेल्या आठवडय़ात व्हॉट्सअॅपमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक लोकांचे लास्ट सीन, टायपिंग ( म्हणजे मेसेज टाइप करताना दिसणं.), ब्लू टिक्स हे आपोआप बंद होऊन गेलं होतं. त्या बिचा:यांनी सेटिंग्जमध्ये जाऊन प्रयत्न केले तरी ते चालू होत नव्हतं.
पण तेवढय़ात केवढा संशय कल्लोळ झाला. कुणी कुणाला सफाई दिली, कुणी कुणाचे ‘ घे तुझं तू समजून’ घाला कोडी मूड्स सहन केले. कुणी कुणी तर नुसतंच धुसफुसत राहिलं.
आणि मग फायनली आता तो व्हाट्सअँपचा टेक्निकल प्रॉब्लेम होता हे सगळ्यांना समजलं. गैरसमज दूरही झाले असतील. पण त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांनी मनात ज्या गाठी पडल्या असतील त्यांचं काय?
आता प्रश्न खरं तर असा आहे की, मुळात एकमेकांबद्दलचा विश्वास असा एखाद्या अँपच्या तांत्रिक तंदुरु स्तीवर अवलंबून ठेवायचा? असं का होतं? आपला मित्न, मैत्नीण, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड आपल्याशी खरं बोलेल, आपल्याशी प्रामाणिक असेल असा विश्वास आपल्याला का वाटत नाही?
हे ब्लू टिक्सचं खूळ यायच्या आधी आपल्याला मित्नमैत्रिणी, इतर नाती नव्हती का? मित्नाला फोन केला आणि त्याने तो उचलला नाही आणि पुढचे दोन तास कॉलबॅकसुद्धा केलं नाही हा इतका गंभीर इश्यू कधीपासून व्हायला लागला?
मैत्रिणीने मेसेजला रिप्लाय केला नाही तर तिची काळजी वाटण्याचाही एक काळ होता. तिने मेसेजला रिप्लाय केला नाही, फोन उचलला नाही तर ‘ती बरी असेल ना?’ ‘नीट घरी पोहोचली असेल ना?’ असे प्रश्न आपल्याला आत्ताआत्तार्पयत पडायचे. त्याऐवजी तिने माझा फोन घेतला नाही याचा अर्थ ती मला टाळत असेल का? तिला दुसरी बेस्ट फ्रेण्ड मिळाली असेल का? असे प्रश्न आपल्या मनात कोणी पेरले? आपल्या मैत्नीला, आपल्या नात्यांना ही कीड कोणी लावली? का ती कीड कायमच आपल्या मनात होती आणि तंत्नज्ञानाने तिला फक्त वाट करून दिली?
दोन तीन दिवस व्हॉट्सअॅपचं लास्ट सीन आणि ब्लू टिक्स बंद पडल्यामुळे असे अनेक प्रश्न समोर आले आहेत.
तंत्नज्ञान आपल्याला जवळ आणतंय की आपल्यात भांडणं लावतंय असाही प्रश्न परत एकदा समोर आला आहे. पण त्याचं उत्तरही याच दोन दिवसांनी दिलं आहे.
ज्या तंत्नज्ञानाच्या जिवावर आपण आपल्या माणसांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका घेतोय, ते तरी पूर्ण विश्वासू कुठे आहे?
(गौरी मुक्त पत्रकार आहे.)