क्लिक होतं तेव्हा..
By admin | Published: March 21, 2017 03:08 PM2017-03-21T15:08:48+5:302017-03-21T15:08:48+5:30
नात्यापासून शॉपिंगपर्यंत आपलं आयुष्य एका क्लिकवर येऊन पोहचलं आहे का?
- नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करायला हवेत, असं सर्वचजण म्हणायला लागले. या कॅशलेस व्यवहारापायी आपलं जगणंच एका 'क्किलवर' सामावलेलं असल्याचं वाटायला लागलंय. पैशांचे सगळेच व्यवहार आता आॅनलाईन आणि तेही एका क्लिकवर होतात. 'क्लिक' केलं की काहीही म्हणजे अगदी काहीही आपण पटकन करतो. ( आपल्या मैत्रीत, प्रेमात अगदी जुजबी गोष्टीतही काही गोष्टी क्लिक होतात, काही नाही!)
सोमवार ते शनिवार हे वार तर सगळ्यांचेच अत्यंत धावपळीत जातात. एका रविवारी किती आणि काय काय कामं करणार. आराम तर पाहीजे की नको! मग घर सावरायला,आवरायला बँकेची काम करायला अशा कितीतरी गोष्टींसाठी हे क्लिक करणं आता फायद्याचं ठरतं आहे.
आॅफिसला डबा नेतोच तरी मधे भूक लागली असली तर फोनवरून आॅर्डर देण्यापेक्षा तेही आॅनलाईन मागवलं जाऊ लागलंय. बरं टेस्ट कशी आहे त्यापेक्षा रिव्ह्यू काय आहे यावरूनही आता खाणं ठरायला लागलं आहे. त्यामुळे खाणं 'क्लिक' होण्यासाठी ते कसं दिसतंय यासाठीही अनेकदा क्लिक करत रिव्ह्यू वाचायला लागतात.
घरीसुद्धा कॉफीमेकर, टोस्टर, आॅव्हन हे दिमतीला असतातच. त्यांच्या बटणांचा योग्य उपयोग करून आता घेतला जातोय. घरी-दारी कुठेही हे क्लिक फार म्हणजे फार महत्वाचं ठरू लागलंय.
शॉपिंग ला जायचंय मात्र वेळच नाही. फिकर नॉट! आवडती साईट उघडायची आणि भरपूर प्रकारचे कपडे एका कळीसरशी आॅनलाईनच बिल भरून मागवायचे. एवढच नाही तर किराणा मालाचे सामान घ्या. प्रत्येकाचा ब्रँड हा ठरलेलाच. एका क्किलवर आपल्या सोयीप्रमाणे तेही सामान आॅर्डर करता येतं. हा मात्र किराणा माल घेताना वस्तू बघत बघत एखादं काही वेगळं घेण्याची मजा मात्र यात मिळत नाही. पण पर्याय नाही. त्यामुळे आॅनलाईन भटकंती करत ही हौस भागवायची. यात पण सॉल्लिड थ्रील वाटतं. फर्निचर घेतानाही हाच निकष लागू होतो आहे. अगदी प्रत्येक शॉपिंग एका 'क्लिक’वर आलं आहे.
आणखी एक गंमत, पूर्वी साग्रसंगीत वधू-वर सुचक केंद्रात जाऊन नाव नोंदणी व्हायची. पुस्तकं बघून आवडतं स्थळ बघितलं जायचं. आता मात्र यात सारं चित्रच बदललं आहे. सगळंच आॅनलाईन. आवडतं प्रोफाईल बघून क्लिक करायचं. इंटरेस्ट पाठवायचा आणि पलीकडून रिप्लाय आला तर कॉण्टॅक्ट करायचा. त्याच्या किंवा तिच्या अधिक माहितीसाठी झुक्याचं फेबु आहेच. अशा कितीतरी गोष्टीत आता मजा येऊ लागली आहे.
असं सगळं सगळंच आता एका क्लिकसरशी व्हायला लागलाय. मग ते कुठलही काम असो. त्या कामात पैसे जरी जात असतील तरी वाचतोय तो वेळ. आणि सध्या तोच गरजेचा आहे. कारण वेळच मिळत नाहीये. स्वता:साठी नाहीच तिथे इतरांची काय कथा... शेवटी काय जियो 'क्लिक'के संग..
-भक्ती सोमण