...असं होतं तेव्हा?

By admin | Published: January 11, 2017 02:53 PM2017-01-11T14:53:42+5:302017-01-11T14:53:42+5:30

त्याच्याकडे तिचे ‘तसे’ फोटो असतात, त्याची भीती घालून धमक्या सुरू होतात, तेव्हा... जुने स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची भीती दाखवून कुणी कुणाला ब्लॅकमेल करतं, तेव्हा... ‘खासगी’ क्षणांच्या सेल्फीज काढू, शूट करू म्हणून कुणीतरी कुणालातरी भरीस पाडतं, तेव्हा... सायबर बुलिंगला तोंड द्यावं लागतं, तेव्हा... ...काय करावं?

... when that happens? | ...असं होतं तेव्हा?

...असं होतं तेव्हा?

Next


देव डी या सिनेमामधला नायक लग्न ठरलेल्या मुलीकडे पूर्ण नग्न फोटो पाठव अशी मागणी करतो. अशी मागणी किंवा विशिष्ट कपड्यांतले फोटो काढून पाठवण्याची मागणी अनेकजण प्रेमात पडलेले/लग्न ठरलेले ‘तिच्या’कडे करतात. ‘त्याला’ कसं दुखवायचं म्हणून रोमान्सच्या नावाखाली तसे फोटो पाठवण्याची जणू सक्तीच होते.
पण खरंच तसे फोटो पाठवावेत का? आणि पाठवलेच असतील तर?

- कितीही जुनाट वाटत असलं तरी असे नग्न किंवा उत्तान कपड्यांतले, अंतर्वस्त्रातले फोटो काढून कुणालाही पाठवू नये. एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरीही, कुणी कितीही इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि तुझा माझ्यावर विश्वासच नाही असा आरोप केला तरीही! 
‘नाही’ म्हणायला शिकणं, हा पहिला टप्पा.
वाढदिवस पार्टीत परस्परांना किस करतानाचे सेल्फी काढले जातात, मित्रमैत्रिणी फोटो काढतात. ते जवळच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रु्रपमध्ये शेअर केले जातात. आपले सेन्शुअस फोटो टाकण्याची आवाहनं ग्रुपमध्ये होतात. तिथं फोटो टाकले जातात. ते व्हायरल होतात. फिरत राहतात.
त्यामुळे कुणी कितीही आग्रह केला तरी आपले ‘सभ्य’ संकेतात न बसणारे कुठल्याच प्रकारचे फोटो कुणाला काढू देऊ नये, आपण स्वत:ही काढू नयेत.


ते दोघं प्रेमात आहेत. त्यातला ‘तो’ स्वत:च्या ‘खासगी’ क्षणांचे व्हिडीओज्, फोटो तिला सतत पाठवतो. त्यात मर्दानगी आहे, डेअरिंग आहे आणि आनंद आहे असंही सांगतो. अशावेळी तिनं काय करावं?

- हे ‘असं’ काही पाठवू नकोस, त्यात मला रस नाही, असं काही केलंस तर मला हे नातं तोडावं लागेल, असं त्याला स्पष्ट शब्दात ठामपणे सांगावं. आणि तो तसा वागला नाही तर प्रसंगी ते नातं तोडण्याची मानसिक तयारीही करावी.
मात्र त्यापूर्वी हे तपासून पाहावं की, अशा प्रकारच्या क्लिप्स आणि फोटो त्यानं यापूर्वी कुणाला पाठवले आहेत का? त्यासंदर्भात त्याच्याशी मोकळेपणानं बोलावं. स्वत: बोलणं शक्य नसेल तर विश्वासातल्या डॉक्टरकडे, मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जावं. कारण अशा क्लिप्स पाठवणं ही विकृती आहे असं थेट सर्रास म्हणता येत नसलं तरी ती सवय असू शकते. आणि त्यातून काही मानसिक डिसआॅर्डर निर्माण झालेली असू शकते. 
हे सारं योग्य उपचार, कौन्सिलिंगनं बरं होऊ शकतं. पण त्यासाठी त्या व्यक्तीशी संवाद साधून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली पाहिजे.
तो असं वागूच कसं शकतो, या धक्क्यातून सावरून या प्रश्नाकडे पाहता येऊ शकतं.


ती दोघं प्रेमात पडतात, मनानंच नाही तर शरीरानंही जवळ येतात. पण पटत नाही, भांडणं होऊ लागतात. अशावेळी ते नातं तोडावंसं वाटतं; पण ‘जवळिकीचे’ फोटो, व्हिडीओ असतात. ते दाखवून दडपण वाढवलं जातं. अशावेळी काय करावं?

- हे सांगणं पुन्हा जुनाटच वाटेल. पण तुम्ही प्रेमात पडलेले आहात असं वाटतं म्हणून लगेच सर्व प्रकारच्या जवळिकीची परवानगी संबंधित व्यक्तीला देणं टाळा(च). पूर्ण विचार करून, आपण हे नातं निभावू शकतो का, याचा निर्णय झाल्यानंतरच बाकीच्या जवळिकीचा विचार करा. त्यातही प्रत्येक गोष्टीचे फोटो कुणी काढत असेल तर गांभीर्यानं आणि दरवेळी न चुकता नकार द्या. त्या नकारावर ठाम राहा. आपल्या खासगी क्षणांचं असं चित्रण करणाऱ्या, अगदी फोटो काढणाऱ्याचाही संशयच यायला हवा. त्यामुळे एकतर ‘नाही’ म्हणा..
आणि योग्य वेळ येईपर्यंत थांबा.
दुसरी गोष्ट कुणी दडपण दाखवून ब्लॅकमेल करत असेल तर थेट घरच्यांना, निदान ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल अशा मित्र-मैत्रिणीला सांगा. पोलिसांत जा. बदनामीची भीती वाटणं साहजिक आहे. पण रोज त्रास सहन करण्यापेक्षा यातून बाहेर पडणं हाच एकमेव योग्य मार्ग.
अनेकजणी ब्लॅकमेल होत असतानाही भावनिक गुंतवणूक म्हणून ते सहन करतात, आणि त्यातून अत्यंत गंभीर परिणामांना त्यांना सामोरं जावं लागतं.
कुणी ब्लॅकमेल करत असेल तर निर्णय भावनिक होऊन नव्हे, तर जास्तीत जास्त विचारपूर्वक आणि प्रॅक्टिकल होऊन घ्या.

फोनमैत्रीच्या जाहिराती सरसकट दिसतात, प्रसिद्ध होतात. त्यावर एकदा फोन करून पाहू म्हणत अनेकजण त्या फोनच्या चावट बोलण्याच्या जाळ्यात आणि पुढे अन्य गर्तेत फसतात, असं होतं तेव्हा?

- आपल्या जवळच्या माणसांना तरी हल्ली आपल्याशी आपण बोलू तेव्हा बोलायला वेळ असतो का?
मग एक फोन फिरवून ओळखीची ना पाळखीची व्यक्ती (महिला?) आपल्याशी का बोलेल? 
पण तरी असे फोन करून एकेकटे अनेकजण फसतात. त्या नादापायी सांगितलेल्या अकाउण्टला पैसे भरले जातात किंवा मग थेट फोनमधून बॅलन्स उडतो. 
या आर्थिक नुकसानीपलीकडे या फोनवरच्या चावट गप्पांची सवय हे एक सुटायला अत्यंत अवघड असं व्यसन आहे, हे विसरू नका. 
त्यात तुम्ही गुरफटला असाल, तर समस्या वेगळीही असू शकते. आत्मविश्वास नसण्याची, घेरून आलेल्या नैराश्याची किंवा एकटेपणाची.
- त्याकडे बारकाईने पाहा.
तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे, चावट सल्ल्यांची नाही, असं समजा.



फेसबुकवर एखाद्या ग्रुपमधून जेव्हा एखाद्या खास पार्टीचं आमंत्रण येतं, तेव्हा ते स्वीकारावं का?

- नाही. अजिबात नाही.
माहिती नसलेल्या आणि फक्त व्हर्च्युअल ओळख असलेल्या माणसांकडून पार्टीचं कितीही आग्रहाचं आमंत्रण आलं तरी ते स्वीकारू नये. केवळ रेव्ह पार्टीचंच ते आमंत्रण असेल असं नव्हे, तर पैशाबाबत फसवणूकही होऊ शकते.
आणि दारू, ड्रग्ज यासह गंभीर चक्रात तुम्ही अडकू शकता.
त्यामुळे अनोळखी व्यक्तींसह आणि आपले मित्र आग्रह करत असले तरी अशा पार्ट्यांच्या मोहात न पडणं उत्तम!


कुणी तरी अश्लील मेसेज पाठवतो तेव्हा, जवळचा कुणी आपले फोटो व्हायरल करतो तेव्हा, इंटरनेट बुलिंगचे शिकार होतो आहोत असं वाटतं तेव्हा काय करावं?

- फार गंभीर असेल प्रकरण तर तडक पोलिसांत जावं. सायबर पोलिसांकडे. नाहीतर पालकांशी बोलून समक्ष त्या व्यक्तीला दम द्यावा.
पण प्रकरण मिटलं म्हणून इथंच न थांबता मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला, प्रसंगी औषधं घ्यावी. कारण मानसिक धक्क्यातून सावरणं सोपं नसतं. आणि या साऱ्या प्रकरणातून जो मनस्ताप होतो, त्यातून आत्मविश्वास गमावण्यापेक्षा उपचार घेतलेले उत्तम.


अनेकजण अनेक व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक ग्रुप्सचा भाग असतात. गप्पांच्या ओघात वाहवत जातात. तिथं काहीबाही अश्लील बोलून बसतात. आणि मग ते बोलणं अनेकदा व्हायरल होतं, लोक स्क्रीनशॉट काढून ठेवतात, आणि त्यावरून टर उडवली जाते. खूप अपमान केले जातात, ज्याला आजच्या भाषेत बुलिंग म्हणतात. असं झालं तर काय करावं?

- एकतर कितीही जिवाभावाच्या माणसांचा ग्रुप असो, आॅनलाइन कमी बोला. आणि सभ्य भाषेतच बोला.
पण तरीही आपण बोललेलं अश्लील काही व्हायरल झालं किंवा त्याचे स्क्रीनशॉट काढून कुणी आपल्याला छळत असेल, टॉर्चर करत असेल, पैसे मागत असेल तर सायबर पोलिसांकडे मदत मागा. तक्रार करा. सायबर बुलिंग हा गुन्हा आहेच, संबंधित व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.
घाबरून जाण्याला पर्याय आहेत आणि मदत मागता येऊ शकते, हे लक्षात ठेवा.



सेक्सटिंग असा शब्द अनेकांच्या आयुष्यात सध्या घुसला आहे. काहीजण तर रोज तसे मेसेजेस पाठवतात, वाचतात. आणि आपल्या बॉयफ्रेण्ड/गर्लफ्रेण्डलाही सतत सेक्सटिंग करतात. त्याचं व्यसन लागतं, अशावेळी...

- एकतर असे सेक्स मेसेज, फोटो कुणाला पाठवले आणि त्यानं जर तक्रार केली तर लक्षात ठेवा की, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. शिक्षा होऊ शकते..
त्यामुळे आपण सेक्सटिंग करतोय म्हणजे गंभीर गुन्हा करतोय हे आधीे समजून घ्या.
दुसरं म्हणजे सेक्सटिंग हे व्यसन आहे. आणि ते जालीम आहे, जीवघेणं आहे. त्यातून तुमचा आत्मविश्वास तर कमी होईलच; पण जगण्यावरचा फोकसही हलेल..
त्यामुळे सेक्सटिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा. हे उद्ध्वस्त करणारं व्यसन आहे.


पिवळी पुस्तकं वाचणं, पोर्न पाहणं, त्यातून उत्तेजित होणं सुरू होतं; पण त्यापुढे जाऊन शारीरिक त्रास सुरू होतात, जे गंभीर असतात. अशावेळी डॉक्टरकडे न जाता ते लपवले जातात. तसं केलं तर परिणाम भयानक होतात, तेव्हा..

- उत्तेजित होणं अनैसर्गिक नाही; पण त्यापायी स्वत:वरच काहीजण प्रयोग करतात. काही इतरांना त्रास देतात किंवा त्यापायी चुकीची माहिती मिळवून ते स्वत:च्या संदर्भात वापरतात. स्वेच्छेनं, पण अवेळी ठेवलेल्या संबंधातून मुलींनाही त्रास होऊ शकतो. रक्तस्त्राव होतो, वेदना होतात. युरीन इन्फेक्शन, जंतुसंसर्ग, पोटात दुखणं असं होत असेल तर ते लपवू नये. डॉक्टरांकडे त्वरित जावं.
लपवून ठेवल्यानं हे आजार वाढतात.

Web Title: ... when that happens?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.