गडचिरोली जिल्ह्यातच काम करायचं ‘त्यानं’ ठरवलं तेव्हा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 04:17 PM2019-03-13T16:17:40+5:302019-03-13T16:17:49+5:30
सामाजिक काम म्हणजे काय, हे मला काम करताना कळलं. लक्षात आलं की, आपण काही वेगळं करायचं नसतंच. लोकांसोबत काम करायचं, ते काय म्हणतात हे ऐकून त्यांचे प्रश्न सोडवायला जमेल तशी मदत करायची. तोच आपला आनंद.
रवींद्र चुनारकर
मी मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ गावचा. जवळपास 400 लोकवस्तीचं गाव. प्राथमिक शिक्षण गावातच झालं. मी उत्तम शिकून नोकरी मिळवावी आणि शहरात स्थायिक व्हावं अशी घरच्यांची माझ्याकडून एकमेव अपेक्षा होती. कारण नोकरी मिळवून शहरात स्थायिक होणं अशीच यशस्वी होण्याची सरळसोपी व्याख्या गावाकडे होती. गावातील 80 ते 90 टक्के लोक दारू पिणारे, त्यातले 30 ते 40 टक्के लोक जुगार खेळणारे. एकंदरीत विकास आणि विचारांच्या दृष्टीने गाव खूपच मागासलेलं. लहानपणापासून गावातच वाढल्यामुळे या समस्यांना बघतच मोठा होत गेलो. त्यामुळे या समस्या केवळ गावाच्या असं कधीच वाटलं नाही. त्या समस्या माझ्याही होत्या. त्या त्नयस्थपणे बघणं मला शक्यच नव्हतं.
गावात मुख्य प्रश्न होता दारूचा. या दारूचा सोक्षमोक्ष लावणं मला फारच महत्त्वाचं वाटत होतं. 2014 च्या डिसेंबरमधला एका दिवस असावा. हातभट्टीवरील दारू काढणं आणि विकणं बंद केलं जाऊ शकतं ही कल्पना मी गावातील चार मित्नांसमोर मांडली. त्यांचा नकार नव्हता; पण विश्वासही नव्हता की हे आपण करू शकू. कारण गावातील महिलांनी दोनदा दारूबंदीचा प्रयत्न केला होता; पण तो व्यर्थ ठरला. त्यामुळे घाई करून चालणार नव्हती. गडचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकाराने दारूबंदी करण्यात आली होती. यासाठी त्यांनी दिलेला लढा, केलेले प्रयत्न आणि अभ्यास याबद्दल मी ऐकलं होतं. त्यामुळे संपूर्ण गावाचा आणि दारूचा कागदावर अभ्यास केला. गावातील दारू पिणारे व जुगार खेळणार्यांची संख्या काढली. प्रत्येक घरातून महिन्याला किती रुपये खर्च होतात त्याचा लेखी डाटा तयार केला. यात एक महिना निघून गेला.
जानेवारी 2015 मध्ये निर्माण 6 चे पहिले शिबिर झाले. या शिबिरात प्रथमच डॉ. अभय बंग यांच्याशी परिचय आला. बरंच काही शिकता आलं. माझ्यासारखा विचार करणारे अनेकजण मला तिथं भेटले. आत्मविश्वासही आला. स्वतर्विषयी विचार करू लागलो, सामाजिक प्रश्न समजून घेऊ लागलो. निर्माण शिबिरातून प्रेरणा मिळाल्यानं आता आपण दारूबंदीचं काम करू शकतो असा विश्वास वाटायला लागला. गावात गेल्या-गेल्या काम सुरू केलं. सर्वप्रथम निवेदन पत्न लिहिलं आणि सगळ्या गावाची जाहीर सभा घेतली. त्यात आम्ही आमची बाजू मांडली. गावकर्यांनी होकार दिला. चार दिवसांची सवलत देऊन दारू पूर्णपणे बंद करण्याचं आवाहन केलं. आम्ही दहा मुलांची नावं गावच्या ग्राम सुरक्षा दलामध्ये दिली.
आपल्या मनासारखं घडतंय म्हणून आम्ही सुरुवातीला खूप खुश होतो. पण आम्ही नाण्याच्या दुसर्या बाजूचा विचारच केला नव्हता हे नंतर कळालं! एक महिना जवळ-जवळ 60 ते 70 टक्के दारू बंद होती. पण हळूहळू परिस्थिती हातातून सुटू लागली. हातभट्टीने दारू काढणारे परत लपून-छपून दारू काढू लागले. आम्ही पुन्हा एकदा पूर्ण गावाची सभा घेतली; पण यावेळी चित्न बदललेलं होत. लोक आमच्या विरोधात बोलू लागले. तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या, अशा सूचना आम्हाला मिळायला लागल्या. साहजिकच मनोबल खचायला लागलं. पण एक गोष्ट कळाली की या प्रकारचं धोरण सुरू करणं तर सोपं असतं, पण ते टिकवून ठेवणं खूप कठीण. 400 लोकांच्या गावात जर हे काम करायला इतक्या अडचणी येत असतील तर पूर्ण जिल्हा दारूमुक्त ठेवणं, खरंच खूप मोठं प्रश्नचिन्ह उभा राहातं.
यादरम्यान इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष सुरू झालं. जानेवारी 2016 ला निर्माणच्या तिसर्या शिबिरादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण विकास आणि मुलांचे कृतिशील शिक्षण या संबंधात काहीतरी काम करायचे हा माझा विचार पक्का झाला. याचदरम्यान निर्माणतर्फे दिल्या जाणार्या ‘कर के देखो’ फेलोशिपसाठी फेलो म्हणून माझी निवड झाली. त्यानुसार मे महिन्यात माझे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पालघर जिल्ह्यात आदिवासींसाठी काम करणार्या ‘वयम’ या संस्थेला भेट दिली. त्याचं काम समजून घेतलं. 15 दिवस वयममध्ये प्रत्यक्ष काम करून पाहिलं आणि संस्थेच्या ‘बिन बुका या शिका’ या नवीनच सुरू झालेल्या उपक्र मासोबत एक वर्ष काम करण्याचं निश्चित केलं.
एकदाचा जव्हारला पोहोचलो आणि स्तब्धच झालो. सगळ्या कल्पना ‘इज इक्वल टू झीरो’ झाल्या. तीन खोल्यांची कौलारू भाडय़ाची खोली म्हणजेच ‘वयम’चं कार्यालय. सकाळी सहाला उठून पाणी भरलं नाही तर पिण्याचे आणि अंघोळीचे हाल. अगदीच जर्जर व जुनी इमारत आणि तेच ऑफिस कम घर. दिवसभर तिथेच काम करायचं व रात्नी तिथेच झोपायचं. माझे कम्फर्ट झोन मला चिमटे घेऊ लागले. तेथील संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता मी तिथे काम न करण्याचं ठरवलं. पण जेव्हा मी परत घरी यायला निघालो तेव्हा माझ्यातला मी मला टोचून-टोचून विचारत होता की, मी का या संस्थेत काम करायचं नाकारतोय? तिथे मोठमोठय़ा इमारती नाहीत म्हणून, की जास्त लोक नाहीत म्हणून? सकाळी उठून पाणी भरावं लागत म्हणून, की खाली झोपावं लागतं म्हणून? मी स्वतर्लाच समर्पक उत्तरं नाही देऊ शकलो. रात्नभर विचार सुरू होते. विचारात परत चंद्रपूरच्या स्टेशनवर आलो; पण गाडीतून खाली जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वीच ठरवलं, ‘वयम’मध्ये काम करायचं.
माझं मुख्य काम होतं पाच पाडय़ांमधील मुलांसोबत ‘बिन बुक या शिका’ हा उपक्र म. ‘मुलं त्यांची तीच शिकू शकतात. त्यांना फक्त योग्य वातावरण उपलब्ध करून द्यायला हवं’ या थीमवर काम करत होतो. हळूहळू काम समजू लागलं. काम करताना मजा येऊ लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी सामाजिक कामाची व्याख्या बदलली. तिथे जाऊन मला समजलं की समाजसेवा, सामाजिक काम वगैरे म्हणजे खूप काही वेगळ नसतचं. मला लोकांसोबत काम करायला आवडतं. मला आनंद मिळायचा, शांत झोप लागायची आणि प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायला मिळायचं.या कामाचा आणि अनुभवांचा उपयोग मला आता मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो म्हणून काम करताना नक्कीच होतोय.
मागील दोन वर्षापासून मी ग्रामपंचायत आकरतोंडी, तहसील कुरखेडा, जिल्हा गडचिरोली येथे ग्रामपरिवर्तक म्हणून काम करतोय. गावातील नेमक्या समस्या कोणत्या आणि त्या सोडविण्यासाठी शासनाच्या काय योजना आहेत, गावातील एकंदरीत समस्या सोडवताना लोकसहभाग कसा वाढवता इत्यादी कामे माझ्याकडे आहेत. ग्रामसभा सक्षमीकरण व गावाचा आराखडा बनवताना लोकांचा सहभाग वाढवणे हे खरं तर फार मोठ्ठं आव्हान असतं. ते आव्हान थोडय़ा प्रमाणे पूर्ण करता आलं. आपण करत असलेल्या कामावर जेव्हा लोकांना विश्वास वाटतो तेव्हा आपोआपच त्यांचा सहभाग पण वाढतो आणि सामुहिक कामात लोकं रूचि घेऊ लागतात असा माझा या दोन वर्षाचा अनुभव राहाला आहे. उदाहरण म्हणून गावातील फक्त महिलानीच 22 वनराई बंधारे बांधलेत. गावातील महिलानीच खंबीरपणे उभ्या राहून दारूबंदीचा ठराव पास करून घेतला आणि त्या यावरच थांबल्या नाही तर पुढे दारूबंदीची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी झटत आहेत. माझा गावात काम सुरु करण्यापासूनचा एक कामाचा भाग राहिला आहे, की मी फक्त एकटा काम करणार नाही तर एखाद्या कामाच्या निर्णयापासून तर शेवट पर्यंत लोकांचा सहभाग असायलाच पाहिजे, त्यामुळे गावात झालेल्या प्रत्येक कामाला लोकांचीच मेहनत आहे. लोकसहभाग वाढवण्यासोबतच शेतीच्या विविध योजना ,शाळा , अंगणवाड्या ,कौशल्य विकास ,युवकांचे एकीकरण अशा विविध विषयांवर काम करता आली.
या फेलोशिपचा एक मोठा फायदा असा की आता काम करताना निरनिराळ्या प्रकारचे काम आहे, याचा फायदा असा होईल की मला भविष्यात कुठल्या एका मोठय़ा प्रश्नावर काम करायचं आहे याची कल्पना येत आहे. शासनाच्या विविध योजना आणि त्यामधील अडचणी इत्यादींची माहिती मिळत आहे. काम आता कुठं सुरू झालंय..
(इंजिनिअर असलेला रवींद्र आज गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील आकरतोंडी या गावी मुख्यमंत्री फेलो (ग्रामप्रवर्तक) म्हणून काम करतोय.)
‘निर्माण’विषयी अधिक तपशील?
या वेबसाइटवर पाहाता येईल.
http://nirman.mkcl.org