मी हैदराबादी झालो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:56 PM2018-06-15T15:56:12+5:302018-06-15T15:56:12+5:30

शहर म्हणजे फक्त रस्ते, बागा, इमारती एवढंच नसतं. शहर म्हणजे तिथली माणसं, तिथली संस्कृती, तिथली नाती, हे सारं भेटतं, तिथं परकेपणा कुठला.

When I become Hyderabady... | मी हैदराबादी झालो तेव्हा...

मी हैदराबादी झालो तेव्हा...

Next
ठळक मुद्देएक वन वे तिकीट

- महेंद्र सूर्यभान पांगारकर 

एप्रिल 2003. सामानसुमान घेऊन मी ऑटोनं बालानगरहून हैदराबाद स्टेशनला निघालो होतो, नाशिकला जाण्यासाठी. नोकरीची चांगली संधी मिळल्यामुळं मी पुन्हा नाशिकला निघालो होतो. जवळपास दोन वर्षानंतर मी शहराला कायमचा अलविदा करत होतो. आता ओळखीचं झालेलं हे शहर ऑटोमधून न्याहाळत होतो. गेल्या दोन वर्षात आतार्पयत कधीही न जाणवलेला या शहराविषयीचा आपलेपणा मला जाणवू लागला. शहर कायमचं सोडून चाललोय या विचारानं मन हळवं झालं, डोळे ओलावले.. 
नोकरीनिमित्त दोन वर्षापूर्वी जेव्हा या शहरात पाऊल ठेवलं तेव्हा वाटलं होतं कसं होणार इथं माझं? नाशिकसारख्या छोटय़ा शहरातून आलेलो मी, या मेट्रो सिटीत कसा निभाव लागणार? अर्थात, नवोदय विद्यालयात शिक्षण झाल्यामुळं घरापासून दूर राहणं, परिस्थितीशी जुळवून घेणं मला नवीन नव्हतं, तसं अवघडही नव्हतं; पण इथं भाषा वेगळी, जेवणखाण वेगळं, संस्कृती वेगळी, त्यामुळं  नोकरीनिमित्ताने अनिच्छेनंच इथं पाऊल ठेवलं होतं. मग आज निघताना मी असं का हळवं व्हावं? हे शहर सोडताना इतकं अवघडल्यासारखं का वाटावं मला? दोन वर्षात असं काय दिलं या परक्या शहरानं मला? डोळ्यातलं पाणी पुसत मी विचार करू लागलो. आणि आठवले मला दोन वर्षातील या शहराने दिलेले मैत्नीचे धागे, जुळलेले बंध, इथं मनमुराद जगलेले क्षण. मला आपलंसं करणारी इथली माणसं.. 
डेव्हिड. (मी  डेव्हील  म्हणायचो त्याला) तामिळनाडूतून हैदराबादेत आलेला. रजनीकांतचा जबरदस्त फॅन. डेव्हिडच्या हट्टापायी रजनीच्या  बाबा  चित्नपटाचा  फस्ट डे, फस्ट शो  बघायचा म्हणून तीन तास लाइनमध्ये, गर्दीत उभं राहून तिकिटं मिळवण्याची कसरत केली होती. या डेव्हिडमुळं मला तेलुगू चित्नपट व गाण्यांचं वेड लागलं. एवढं की मी नियमित तेलुगू गाणी गुणगुणू लागलो! 
संतोष मिश्रा. बिहारमधून इथं आलेला, स्थायिक झालेला. त्याच्याबरोबर मी कितीतरी वेळा गोवळकोंडा पालथा घातला, हैदराबादच्या गल्लीबोळातून हुंदडलो. त्या अमुकच हॉटेलमधली बिर्याणी खायची म्हणून वीस-पंचवीस किमी दूर, शहरात, रात्नी अपरात्नी त्याला हक्कांनं फिरवलं. नागमल्लेश रेड्डी. त्याच्याबरोबर सेकंड हॅण्ड पुस्तकांच्या मार्केटमध्ये दिवस दिवस घालवला. त्यानं मला नवीन पुस्तक विकत घेतलं की त्याच्या पहिल्या पानावर त्या दिवसाची तारीख व घेतलं तिथल्या शहराचं नाव टाकायची सवय लावली (जी आजही कायम आहे) जेव्हा कधी पुस्तक उघडतो तेव्हा त्या क्षणांना उजाळा मिळतो, पानांबरोबर आठवणीही चाळल्या जातात. 
श्वेता राव. कंपनीच्या अकाउण्ट डिपार्टमेंटमधली मुलगी. तिची हिंदी-इंग्लिश तोडकी-मोडकी तर माझी तेलुगु ! तिनं मला तेलुगू शिकवण्यासाठी खूप परिश्रम घेतले. जॉब रिझाइन केला तंव्हा मोठय़ा आनंदात मी श्वेताला सांगायला गेलो, की मी आता कायमचं हैदराबाद सोडून नाशिकला जाणार, तर ही बातमी ऐकून तिच्या डोळ्यांत पाणी आलं. मलाही मग जाणवलं, अरे, मी हा विचारच केला नाही की, आता या मैत्नीच्या नात्याला मी मुकणार. 
..पण तेव्हा जुळले गेलेले ते मित्नत्वाचे धागे आजही तितकेच घट्ट आहेत ! संतोष अलीकडेच कुटुंबासहित कुंभमेळ्याला येऊन गेला. दोन-तीन दिवस घरी पाहुणचार घेऊन गेला. इतक्या वर्षानंतर न भेटताही आम्ही जपलेलं नातं बघून त्याचे वडीलही गहिवरले. श्वेता शिर्डीला आली तेव्हा सहकुटुंब भेटायला घरी येऊन गेली. आजही नवीन पुस्तक घेतलं की नागमल्लेश हमखास आठवतो. नेटवरून तेलुगू गाणं डाउनलोड करताना डेव्हिडची आठवण हटकून येते. पांडुरंगा राव, श्रीनिवास, रामकृष्णा, मस्तान असे अनेक जण, जे आजही टचमध्ये आहेत. 
मग वाटतं, शहर म्हणजे फक्त रस्ते, गार्डन्स, बिल्डिंग्ज एवढंच नसतं मुळी, तर शहर म्हणजे तिथली माणसं, तिथली संस्कृती, तिथली नाती यांची वीण. 
या शहराच्या अंगाखांद्यावर खेळतो मी, कितीतरी वेळा हुसेन सागरची शीतलता, रामोजी फिल्मसिटीची भव्यता अनुभवली, इथले सण साजरे केले, मध्यरात्नी लागणारी लग्न अटेण्ड केली, एका गाण्यासाठी, त्याच पिक्चरच्या तीन तीनदा थिएटरच्या पायर्‍या  झिजवल्या (जयम, ओक्काडू इ.) वयाच्या पंचविशीत, नव्या संस्कृतीशी, नव्या भाषेशी, वेगळ्या जीवनशैलीशी ओळख करून दिली मला या शहरानं. या शहरानं मला जिवाभावाची माणसं दिली, नवी नाती दिली, माझ्या व्यक्तिमत्त्वास आकार दिला. एकंदर, माझं जगणं समृद्ध केलं या शहरानं! 


 

Web Title: When I become Hyderabady...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.