आयआयटीतून बाहेर पडून खेडय़ापाडय़ात जाणारा एक तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 07:00 AM2018-11-29T07:00:00+5:302018-11-29T07:00:04+5:30

आयआयटीमधून पासआउट मेकॅनिकल इंजिनिअर, त्यानं शहरी वाट नाकारली आणि कुपोषणमुक्तीसाठी थेट खेडय़ापाडय़ात पोहोचला!

when IIT pass out young man goes to villages.. | आयआयटीतून बाहेर पडून खेडय़ापाडय़ात जाणारा एक तरुण

आयआयटीतून बाहेर पडून खेडय़ापाडय़ात जाणारा एक तरुण

Next
ठळक मुद्दे कुपोषणग्रस्तांसाठी ‘स्वस्थ भारत प्रेरक’ म्हणून काम करायचं ठरवलं.

- चेतन ननावरे

आयआयटी गांधीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन तो उत्तीर्ण झाला. खरं तर त्याला कुठंही उत्तम पगाराची चकाचक कार्पोरेट नोकरी मिळाली असती; पण  24 वर्षाचा या तरुणानं कुपोषण या विषयात काम करायचं ठरवलं.
 करण पळसकर. त्याची आई अंगणवाडी सेविका. तिच्या कामाच्या निमित्तानं त्यानं गावखेडय़ातलं वास्तव अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे मोठय़ा शहरात काम करण्यापेक्षा आणि तिथं समाधान शोधण्यापेक्षा खरंखुरं समाधान शोधत त्यानं खेडय़ापाडय़ाची वाट धरली.  कुपोषणग्रस्तांसाठी ‘स्वस्थ भारत प्रेरक’ म्हणून काम करायचं ठरवलं.
केंद्र सरकार आणि टाटा ट्रस्टने एक करार केला आहे. त्याअंतर्गत महिला व बालविकास विभागासाठी स्वस्थ भारत प्रेरक म्हणून अहमदनगर जिल्ह्यात करण सध्या काम करतो आहे. आता राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांसोबत ग्राउण्ड लेव्हलवर काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. 
औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पोखरी येथील शाळेत करणनं प्राथमिक शिक्षण घेतले. करणची हुशारी पाहून तेथील शिक्षकांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी येथील जवाहर नवोदय विद्यालयात जाण्याचा सल्ला दिला. इथंच करणच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हुशार असल्यानं त्यानं आयआयटी गांधीनगर्पयतचा प्रवास सहज केला. तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं पदवी प्रशिक्षण घेताना करणला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. या महाविद्यालयात औपचारिक शिक्षण सुरू असतानाच सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी विद्याथ्र्याना डेव्हलपमेंटल स्टडीज आणि ग्लोबल पॉलिटिकल इकॉनॉमी हे विषय शिकावे लागतात. 
या विषयांच्या माध्यमातून करणने गुजरात सरकारसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर दोन महिने काम केलं. हा अनुभव करणसाठी मोलाचा होता. त्या काळात करण यूपीएससीची तयारीही करत होता. याच काळात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या उपक्रमात स्वस्थ भारत प्रेरक म्हणून कुपोषणमुक्तीसाठी काम करण्याची संधी चालून आली. 
याआधी आईसोबत कुपोषणमुक्तीवर चर्चा करणार्‍या करणला या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कुपोषणमुक्तीचं काम करण्याची संधी मिळाली. मनुष्यबळाच्या मदतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कुपोषणमुक्तीचं ध्येय लवकर साध्य करता येईल असं करण नेहमी आईला सांगायचा. आज हीच वाक्य खरी करून दाखवण्याची किमया करण करत आहे. 
अहमदनगर जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीवर तो सरकारसोबत काम करत आहे. जिल्हास्तरावरील माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना संकलित करून देणं, शासनाच्या निधी सोबतच  लोकसहभागातून कुपोषणमुक्तीसाठी  प्रयत्न करणं असं त्याच्या कामाचं स्वरूप आहे.  गेल्या सात महिन्यांपासून ग्रामीण भागात काम करत असताना आपल्या शहरी मित्रांचीही त्याला मोठी मदत होत आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचं ध्येयही त्याच्यासोबत आहेच. मात्र प्रत्यक्ष गावपातळीवर काम करण्याचा अनुभव आपल्याला अधिक समृद्ध करतोय असं तो सांगतो!

 

Web Title: when IIT pass out young man goes to villages..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.