यूपीचा चित्रकार जलजागृतीसाठी महाराष्ट्राच्या भींती रंगवतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 07:05 AM2019-08-29T07:05:00+5:302019-08-29T07:05:01+5:30

यूपीतला तरुण चित्रकार. आपल्या चित्रांनी माणसांच्या मनांना साद घालावी असं वाटलं म्हणून तो पाणीप्रश्नाचा हात धरून पश्चिम महाराष्ट्रात आला आणि रंगवू लागला गावोगावीजाऊन भिंती.

When the painter of UP paints in Maharashtra for save water awareness | यूपीचा चित्रकार जलजागृतीसाठी महाराष्ट्राच्या भींती रंगवतो तेव्हा...

यूपीचा चित्रकार जलजागृतीसाठी महाराष्ट्राच्या भींती रंगवतो तेव्हा...

googlenewsNext
ठळक मुद्देत्याच्या भन्नाट चित्रांनी जिवंत झालेल्या अनेक गावातल्या भिंती आता त्याचीच नाही तर पाण्याचीही गोष्ट सांगतात.

- प्रगती जाधव-पाटील

आपल्या कलेपायी कुटुंबीयांना आर्थिक भुर्दंड  नको म्हणून त्यानं काम शोधलं; पण एकवेळ अशी होती की त्याच्या हातात काम आणि अन्न दोन्ही नव्हतं. प्रसंगी रेल्वे स्टेशनवर मिळेल ते खाऊन त्यानं दिवस काढले. वाईट दिवस दिसले; पण त्या गरिबीनं त्याला अधिक संवेदनशील बनवलं. समाजासाठी आपल्या कलेतून आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटून त्यानं चित्रं काढायला सुरुवात केली. रेल्वे स्टेशनवर पडलेल्या कपडय़ांच्या चिंध्यांपासून त्यानं सुबक चित्नं तयार केली. त्याचदरम्यान त्याला वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाविषयी  कळलं.  त्यानं ठरवलं या कामाला मदत करायची, पाणीदार महाराष्ट्र आपल्या कुंचल्यातून साकारायचा. त्यासाठी तो तडक महाराष्ट्रात आला. 
उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जिल्ह्यातील सोनभद्र गावचा हा तरुण. अनिलकुमार. त्यानं चित्नकलेसाठी  दिल्ली गाठली. फाइन आर्ट्सची पदवी मिळविल्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांबरोबर कामही केलं. मग महाराष्ट्रात सुरू असलेल्या पाणी चळवळीची माहिती त्याला मिळाली. तो थेट महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पोहोचला. विनामोबदला त्याने चार-चार महिने गावांत राहून भिंती बोलक्या केल्या. गावातल्या भिंतींवर चित्रं काढली. त्याच्या या भिंती आता पर्यटकांचं आकर्षण  ठरत आहेत. 
त्याचे वडील कमलाराम  व्यवसायानं इंजिनिअर. आई शेती सांभाळते. त्यांना चित्नकार व्हायचं होतं, पण परिस्थितीने त्यांना अभियंता बनविलं. पण वडिलांचं हे स्वप्न अनिलकुमारने अवघ्या सहाव्या वर्षी पूर्ण केलं. वडिलांचे ‘लाइव्ह पोर्टेट’ काढून त्यानं सर्वानाच चकित केलं. मुलाच्या हातातील कला पाहून त्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं. पुढच्या शिक्षणासाठी त्याला दिल्लीलाही पाठवलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही स्वयंसेवी संस्था त्यांच्या संपर्कात आल्या. त्यासोबत त्यानं राजस्थान आणि गुजरात येथे कामं केली. या संस्थांबरोबर काम करताना तो सुधारगृहातील मुलांसाठी काम करू लागला. बालवयात गुन्हे केलेल्या या चिमुकल्यांच्या मनातील भावभावना चित्नाच्या माध्यमातून रेखाटण्याची अनोखी सवय त्यानं लावली. त्यामुळे मनोमन कुढणारी ही मुलं चित्नांच्या रूपाने बोलकी झाली. गुजरातमधील या यशस्वी प्रयोगानंतर त्याला राजस्थानला शासकीय एलिमेंटरी स्कूलमध्येही काम करण्याची संधी मिळाली. 
या शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढलेले होते. मुलींना पालक कचरा वेचण्याच्या कामासाठी न्यायचे. या मुलींना शिक्षणाची समान संधी मिळावी म्हणून त्याने गावात दिग्गज महिला खेळाडूंची चित्ने रेखाटली. या प्रेरणादायी चित्नांमुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण आटोक्यातही आले. 
कलाकार असलेल्या अनिलकुमारला आपल्या चित्नांचा बाजार मांडणं कधी रुचलं नाही. त्यामुळे त्याचा काहीकाळ आर्थिक विवंचनेत गेला. मोठय़ा शहरांच्या झगमगाटापेक्षा त्याला साधी राहणारी माणसं शोधावीशी वाटू लागली. त्याने खेडेगावात यायचं ठरवलं. याचदरम्यान वॉटरकप स्पर्धेविषयी कळलं आणि तो सांगली जिल्ह्यात पोहोचला. 
महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने सांगली जिल्ह्यातील सावर्डे, सातारा जिल्ह्यात सिंधीखुर्द, महिमानगड, बारामतीमध्ये साहिबाचीवाडी तसेच हिवरे बाजार या गावांच्या भिंतींवर चित्रं काढली. जलसंधारणाबरोबर पाणी अडवा पाणी जिरवा, बंधारे, वॉटरकप आदी विषयांची चित्ने रेखाटली आहेत. 16 तासात तब्बल 100 भिंती रंगवण्याचं भन्नाट कामही करून दाखवल.
त्याची चित्रं आज अनेकांना पाणी प्रश्नाचं वास्तव दाखवत आहेत.
***********

भाकरी आवडलीच!

उत्तर भारतीय असल्यामुळे अनिलकुमारशी संवाद साधण्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी या दोन भाषाच उपयोगाच्या होत्या. त्यामुळे गावातील युवावर्ग त्याच्याशी अधिक संपर्कात होता. दिवस उजाडल्यापासून सुरू असलेलं हे काम केवळ जेवण्यापुरतंच थांबायचं. महाराष्ट्रात मिळणारी ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी त्याला आवडू लागल्या. वडापाव, मिसळपाव यांच्याही चवी त्याने चाखल्या. महाराष्ट्रातील भाकरी आणि संवाद साधण्याची लोकांची वाणी त्याला अधिक भावली. 

आई आणि ताई


तो सांगतो, ज्या गावात गेलो, तिथं काम करताना घरोघरच्या महिला जेवायला घालायच्या. कहती थी, कितना काम करोगे, चलो जेवायला! त्यामुळे गावातील छोटय़ा-छोटय़ा मुली आणि बायका त्याच्या ताई झाल्या होत्या. मुलींची नावं लक्षात ठेवण्यापेक्षा बडी ताई, छोटी ताई, मोटू ताई अशी विशेषणं लावून त्याने यांच्याशी उत्तम नातं निर्माण केलं. 

कच्चा कपडा नही चिंध्या बोलो!

शिल्लक राहिलेल्या कपडय़ांचे तुकडे जोडून त्यापासून सुरेख पेंटिंग बनविण्याचा शोध अनिलकुमारने लावला. ज्या ज्या गावांमध्ये तो गेला तिथल्या तिथल्या स्थानिकांशी बोलून त्याने शिल्लक कापड देण्याची विनंती केली. या कपडय़ांना तो ‘कच्चा कपडा’ म्हणायचा. आता हा कच्चा कपडा म्हणजे काय भानगड, हे ग्रामस्थांना त्याने टेलरचे दुकान दाखविल्यावर समजलं. कच्चा कपडा नही चिंध्या बोलो, असंही स्थानिकांनी त्याला शिकविले. पिशव्या भरभरून चिंध्याही दिल्या.

‘महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मला खर्‍या भारताचे दर्शन झाले. वातानुकूलित खोलीत बसून आपल्या कल्पनाशक्तीने गाव रंगवण्यापेक्षा प्रत्यक्षात गाव आणि तिथली संस्कृती टिपणं हे जास्त इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे माझी कला या माणसांमध्ये राहून खुलवणं अधिक सोपं गेलं आणि या कामाने मला अभूतपूर्व असं मानसिक समाधानही दिलं,’ असं अनिलकुमार सांगतो.


( प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत वार्ताहर आहे.)

 

Web Title: When the painter of UP paints in Maharashtra for save water awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.