विनाअनुदानित कॉलेजातला प्राध्यापक डबेवाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 04:46 PM2019-05-09T16:46:30+5:302019-05-09T16:47:04+5:30

माझं शिक्षण विचारा, एम.ए., एम.एड., नेट/सेट उत्तीर्ण, पीएच.डी. मात्र प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली विनाअनुदान महाविद्यालयात. आर्थिक संकटानं अस्वस्थ होतो मग ठरवलं आपल्याला जे आवडतं, ते करायचं.

when a professor starts tiffin service. | विनाअनुदानित कॉलेजातला प्राध्यापक डबेवाला!

विनाअनुदानित कॉलेजातला प्राध्यापक डबेवाला!

Next
ठळक मुद्देउत्तम स्वयंपाक करता येत होता, मग लोक काय म्हणतील याचा विचार न करता मी टिफिन सेवा सुरू केली!

 - प्रा. सोपान  दहातोंडे

‘अपना टाइम आएगा’ हा लेख वाचला आणि वाटलं की, ही तर आपलीच गोष्ट.
हा असा प्रवास मीही करतोच आहे. त्या प्रय}ांबद्दल लिहितो आहे, यश-अपयशापेक्षाही हे प्रय} मला मोलाचे वाटतात. 
माझं शिक्षण म्हणाल तर एम.ए., एम.एड., नेट आणि सेट उत्तीर्ण, पीएच.डी. पण केलं आहे. उच्चशिक्षित म्हणताच येईल. मुळात मला  शिक्षणाची खूप आवड; पण घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे शिकताना काम करणं सरावाचं होतं. दुसर्‍यांच्या शेतीत मोलमजुरी करून मी शिक्षण घेतलं. घरी शेती नव्हती. त्यामुळे आपण शिकायचं आणि शिक्षणानंच आपलं आयुष्य बदलायचं हे डोक्यात पक्कं होतं. म्हणून मग मिळेल ते काम केलं आणि शिक्षण पूर्ण केलं. 2008 साली पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर प्राध्यापक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. वाटलं होतं या नोकरीनंतर आपलं आयुष्यच बदलून जाईल. त्यासाठी मी रात्नंदिवस कष्ट करून खूप अभ्यास केला. प्राध्यापकपदासाठी आवश्यक असणार्‍या नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालो. 
मात्र दरम्यान, शासनाच्या आदेशामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंद आहे. त्यामुळे अनुदानित महाविद्यालयात नोकरी  मिळू शकली नाही. एक-दोन ठिकाणी अनुदानित महाविद्यालयात मुलाखती दिल्या तर त्या ठिकाणी नोकरीसाठी वारेमाप पैशांची मागणी करण्यात आली. परिस्थिती साधारण असल्यामुळे हे पैसे भरून नोकरी घेणं तर शक्यच नव्हतं. त्यामुळे जेव्हा विनाअनुदानित महाविद्यालयात नोकरी मिळाली तेव्हा जी मिळेल ती स्वीकारणं भाग होतं. 
एकदिवस भरतीवरील बंदी उठेल आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आपण प्राध्यापक म्हणून उत्तम काम करू हे स्वप्न मनात होतं. या भाबडय़ा आशेवरच दिवस ढकलण्याचं काम चालू होतं. नोकरी करतच होतो. लग्न झालं. पत्नी सुषमा ही एम.कॉम., बी.एड. जी.डी.सी.एण्ड ए. तिचे को-ऑपरेटिव्ह ऑडिटर लायसन्स काढलं. मात्र सहकार कायदा बदलल्यामुळे सोसायटय़ांच्या ऑडिटमध्ये अनंत अडचणी निर्माण झाल्या. 
माझं महाविद्यालय एमआयडीसी परिसरात असल्यामुळे आम्ही पत्नी सुषमासाठी एका सीएकडे दोन वर्षे ट्रेनिंग घेतलं. एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये अकाउण्ट या पदावर ती काम करते. परिवारामध्ये निदान एका बाजूने तरी भक्कम आर्थिक आधार निर्माण झाला. 
मात्र मला चैन पडत नव्हतं. वाटत होतं, आपण काहीतरी करावं. मला लहानपणापासून स्वयंपाकाची खूप आवड. आईला घरकामात मदत करायचो. उत्तम स्वयंपाक करता येतो. भाज्यांचे, मसाल्यांचे वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड त्यातूनच निर्माण झाली. 
एकदा वाटलं विनाअनुदानित महाविद्यालयाच्या या कधीही न संपणार्‍या चक्रातून  बाहेर पडायला हवं. त्यासाठी डिसेंबर 2017 मध्ये आम्ही व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं.
          एमआयडीसी परिसरामध्ये कंपन्यांचे कामगार तसंच विविध महाविद्यालये आहेत.  विद्यार्थी हा मोठा ग्राहकवर्ग तिथं उपलब्ध होता. त्यामुळे टिफिन सव्र्हिस बिजनेस सुरू करण्याचे ठरवलं. 31 डिसेंबर 2017 रोजी आरंभ केला. ‘एस. स्क्वेअर मील, अ टेस्ट ऑफ होम’ या नावाने शॉप अ‍ॅक्ट व फुड लायसन्स काढून ‘घरचा डबा’ नावानं टिफिन सेवा सुरू केली.
मनात प्रश्न होतेच. सगळ्यात मोठा प्रश्न होता, लोक काय म्हणतील? एक प्राध्यापक असून, असं डबे बनवण्याचं काम करतो हे शोभतो का असं लोक म्हणतील, असं मनात येत होतंच. पण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ठरवलं आपला व्यवसाय नेमानं करायचा.  
 महाविद्यालयातील नोकरी सांभाळून सकाळी व संध्याकाळी दोन्हीवेळा टिफिन बनवणं/पोहोच करणं ही जबाबदारी पार पाडणं सुरू झालं. माझ्या महाविद्यालयानंही मला सहकार्य केलं आणि एक तासभर वेळ महाविद्यालय प्रशासनाने मोठय़ा मनानं  उपलब्ध करून दिला. त्यामुळे दोन्ही जबाबदार्‍या अतिशय सुव्यवस्थितपणे पार पाडता आल्या. माझी पत्नी सुषमा, आईवडील, भाचा आदित्य व मुलगी इच्छा यांचीही मदत होतीच. पोळ्या बनवण्यासाठी एक वैष्णवीताई आणि भांडी घासण्यासाठी मंगलताई मदतीला येतात. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानं आमची उमेद वाढली.  व्यवसायामुळे आमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या आम्ही सोडवू शकलो याचा आनंद आहे. या माध्यमातून भविष्यात आणखी मोठं काम करण्याचा मानस आहे. 
शिक्षण- पद या सार्‍याचा बाऊ न करता मी काम सुरू केलं आणि मग लक्षात आलं की, आपल्या आवडीचं काम आपल्याला समाधान देतं. उभारी देतं. आणि रडत न बसता झगडत राहण्याची जिद्दीही देतं.

 

Web Title: when a professor starts tiffin service.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.