अंडरटेकर थांबतो तेव्हा...
By admin | Published: April 4, 2017 06:29 PM2017-04-04T18:29:08+5:302017-04-04T18:39:52+5:30
बापरे... २७ वर्ष कशी भरभर निघून कळालंच नाही... १९९० साली डब्ल्यूडब्ल्यूएफमध्ये (आत्ताच डब्ल्यूडब्ल्यूई) आलेल्या आमच्या आवडत्या अंडरटेकरने रविवारी (भारतीय वेळेनुसार सोमवारी) वयाच्या ५२व्या वर्षी अचानकपणे निवृत्ती जाहीर केली
तरुण होतानाच्या वाटेवर ज्याच्या फाईट्सनं लढणं शिकवलं, तो रिटायर झाला हे कसं पचवणार?
रोहित नाईक, मुंबई
बापरे... २७ वर्ष कशी भरभर निघून कळालंच नाही... १९९० साली डब्ल्यूडब्ल्यूएफमध्ये (आत्ताच डब्ल्यूडब्ल्यूई) आलेल्या आमच्या आवडत्या अंडरटेकरने रविवारी (भारतीय वेळेनुसार सोमवारी) वयाच्या ५२व्या वर्षी अचानकपणे निवृत्ती जाहीर केली आणि आम्ही एकदम मागे म्हणजे आमच्या बालपणात गेलो.... आपलं वय काय होतं जेव्हा अंडरटेकर आपल्या गळ्यातला ताईत होता इथपासून ते अक्षय कुमारचा खिलाडी मूव्ही... तसेच, ७ वेळा त्याने मृत्युवर केलेली मात ते अगदी अंडरटेकर पहिल्यांदा कधी डब्ल्यूडब्ल्यूएफ खेळला... इथपर्यंत सर्व ऐकलेल्या गोष्टी आठवल्या.
नव्वदीच्या दशकातील कोणत्याही मुलाला (आत्ताचा युवक) विचारल्यास ‘अंडरटेकर’ची पुर्ण कुंडली मिळेल. अगदी आत्ताच्या मुलांकडूनही अंडरटेकरची पुर्ण माहिती मिळेल इतकी त्याची क्रेझ... कोण हा अंडरटेकर, याला इतकं महत्त्व का दिल जातंय.. अगदी क्रिकेटवेड्या भारतातील यंगिस्तानही अंडरटेकरच्या निवृत्तीची चर्चा सोशल मिडियावर का करतेय... असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेत... पण, ज्याकाळात केबल आणि इंटरनेट आमच्यासाठी नवीन होते तेव्हापासून अंडरटेकर प्रत्येक क्रीडाप्रेमीचा फेव्हरेट आहे... त्यामुळेच तर आज अचानकपणे त्याने घेतलेली निवृत्ती आमच्यासाठी धक्कादायक आणि दु:खद ठरली..
नव्वदीच्या दशकामध्ये ज्यांचे बालपण गेले त्यांच्यसाठी डब्ल्यूडब्ल्यूएफ जीव की प्राण होता, यावर कोणाचेही दुमत नसेल. शाळेतून आल्या आल्या घाई घाईत टीव्हीपुढे ठाण मांडून रोमांचक फाइट्स बघायच्या हा सर्वांचा नित्यक्रम. यानंतर याच फाइट्सच्या चर्चा शालेय गँगसोबत रंगवून सांगत आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्यात प्रत्येकाची चढाओढ रंगायची. प्रत्येकाचा फेव्हरेट स्टार वेगळा, परंतु एक स्टार कॉमन असायचा तो म्हणजे ‘अंडरटेकर’. हा तो काळ होता जेव्हा क्रिकेटपेक्षा अधिक डब्ल्यूडब्ल्यूएफमध्ये मुलांची आवड होती.
डब्ल्यूडब्ल्यूएफमधील प्रत्येक रेसलरची एक विशिष्ट स्टाईल असते, त्यात ६ फूट ९ इंच उंचीच्या धिप्पाड अंडरटेकरची स्टाईल सर्वात हटके मानली जाते. गेल्या २७ वर्षांमध्ये अनेक दमदार रेसलर्स आले आणि गेले. परंतु, तरीही अंडरटेकरची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाहीरास काय खास होतं अंडरटेकरमध्ये?
डब्ल्यूडब्ल्यूएफ किंवा डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये अंडरटेकर म्हणजे मृत्यु.. असे एक समीकरण आहे. हॉरर थीम असलेल्या अंडरटेकरची स्टाईल सर्वांना खिळवून ठेवणारी होती. ज्यावेळी अंडरटेकरची फाईट असायची तेव्हा तो एन्ट्री करीत असताना संपुर्ण स्टेडियममध्ये काळोख व्हायचा आणि तीनवेळा घंटानाद झाल्यानंतर अचानकपणे रिंगमध्ये प्रतिस्पर्धी रेसलरच्या समोर अंडरटेकर प्रकट व्हायचा. या भितीदायक प्रसंगानेच प्रतिस्पर्धी रेसलरची गाळण व्हायची. मुळात हे केवळ मोनोरंजन असल्याची माहिती असूनही प्रत्येक प्रेक्षक यातील थ्रील अनुभवायचा. पण आता हे थ्रील या खेळात यापुढे दिसणार नाही.
नुकताच झालेल्या ‘रेसलमेनिया’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या ३३व्या सत्रात फाइट हरल्यानंतर अंडरटेकरने आपले ग्लोव्हज, कोट आणि हॅट रिंगमध्ये टाकले आणि निवृत्तीचे संकेत दिले. त्यावेळी, उपस्थित आणि टिव्ही प्रेक्षक सर्वांनाच धक्का दिला. अंडरटेकरने एकप्रकारे आता आपण निवृत्त होत असल्याचे संकेत दिले होते. स्टेडियममधील प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात अश्रू तरळले..