१५-१६ लाख विद्यार्थी इण्टर्नशिप करणार कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:31 PM2017-08-10T12:31:31+5:302017-08-10T12:33:03+5:30

येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तीन इण्टर्नशिप करणं सक्तीचं करण्यात आलं आहे? पण योजना चांगली असली तरी ती राबवणार कशी?

Where 15-16 lakh students will be internship? | १५-१६ लाख विद्यार्थी इण्टर्नशिप करणार कुठे?

१५-१६ लाख विद्यार्थी इण्टर्नशिप करणार कुठे?

Next
ठळक मुद्देयेत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तीन इण्टर्नशिप करणं सक्तीचं करण्यात आलं आहे? पण योजना चांगली असली तरी ती राबवणार कशी? अमेरिकेची आर्थिक उलाढाल १६ लाख कोटींची आहे,  तेथे दरवर्षी १ लाख अभियंते निर्माण केले जातात. भारताची आर्थिक उलाढाल दरवर्षी २ लाख कोटींची आहे, येथे १५ लाख अभियंते निर्माण होतात.

- डॉ. सुनील कुटे 

अमेरिकेची आर्थिक उलाढाल १६ लाख कोटींची आहे,  तेथे दरवर्षी १ लाख अभियंते निर्माण केले जातात. भारताची आर्थिक उलाढाल दरवर्षी २ लाख कोटींची आहे, येथे १५ लाख अभियंते निर्माण होतात. यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक. गुणवत्ता नाही. परिणाम? बेरोजगारी. मार्कशिटवर गुण भरपूर, पण अंगात गुणवत्ता शून्य. म्हणून मग इण्डस्ट्रीवाले एका अभियंत्याच्या पगारात २-३ आयटीआयवाले नोकरीत घेतात. आणि अभियंता बनण्यासाठी खर्च केलेले लाखो रुपये वाया जातात. आता त्यांना इण्टर्नशिप किंवा प्रशिक्षण द्या असं सरकार म्हणत असेल तर ते देणार कोण? कसं? आणि घेणारे ते घेणार कसे?

प्रश्न : सीमेंटचे प्रकार सांगा.
उत्तर : अंबुजा सीमेंट, अल्ट्राटेक सीमेंट, चेट्टीनाड सीमेंट
प्रश्न : रंगाचे विविध प्रकार सांगा.
उत्तर : नेरोलॅक पेंट, स्नोसेम पेंट
प्रश्न : भूकंपासाठी कोणता आय.एस. कोड आहे?
उत्तर : कोड हा त्वचेचा आजार आहे. तो माणसांना होतो. भूकंप पृथ्वीवर होतो त्यामुळे पृथ्वीला कोड येतं.
प्रश्न : २ स्ट्रोक इंजिन व ४ स्ट्रोक इंजिन यातील फरक सांगा.
उत्तर : २ ठोके देते ते २ स्ट्रोक इंजिन व ४ ठोके देते ते ४ स्ट्रोक इंजिन.
प्रश्न : मग घड्याळात कोणते इंजिन असते?
उत्तर : २४ स्ट्रोक इंजिन.
प्रश्न : कॅनाल डिझाइन करताना कोणते घटक विचारात घ्याल?
उत्तर : कॅनालमध्ये पाणी सोडण्याआधी ते पाणी टर्बाइनमध्ये नेऊ . तेथे पाण्यातील वीज काढून घेऊ म्हणजे कॅनालमधून पाणी सोडल्यावर त्या पाण्याचा शॉक बसणार नाही.
प्रश्न : अ.उ. मोटर व ऊ.उ. मोटर यातील फरक सांगा.
उत्तर : अ.उ मोटरसाठी एअर कंडिशनर लागतो. ऊ.उ मोटरची माहिती नाही.
***
    वरील प्रश्नोत्तरे ही कोणत्याही विनोदी लेखातून केलेली कॉपी नसून अभियांत्रिकी महाविद्यालयात तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेतील विद्यार्थ्यांचा ‘लाइव्ह परफॉरमन्स’ आहे! भारताचे उद्याचे अभियंते, विकासाचे जनक आणि उज्ज्वल भविष्य घडविणारे हे विद्यार्थी व त्यांची अशी उत्तरे ऐकली म्हणजे भगवद्गीतेतील ‘स्थितप्रज्ञ योग’ न वाचताही स्थितप्रज्ञ (म्हणजे आधुनिक भाषेत ‘बधिर’) होण्याचे प्रशिक्षण मिळते! कोणीतरी सॉक्रेटिसला तो इतका महान तत्त्वचिंतक कसा झाला, हा प्रश्न विचारला. सॉक्रेटिस म्हणाला, ‘याचे सर्व श्रेय माझ्या पत्नीला जाते. ती इतकी भांडकुदळ व कजाग स्त्री आहे की घरातल्या अत्यंत स्फोटक वातावरणातही मन शांत कसे ठेवावे याचे प्राथमिक धडे घेण्याची संधी मला तिच्यापासून मिळाली’. तुम्ही इतके स्थितप्रज्ञ कसे, असा प्रश्न मला आज कुणी विचारला तर मी त्याचे सर्व श्रेय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना देईल!
   वरील प्रश्न व उत्तरे वास्तव आहेत व ती विनोदी वाटतात म्हणूनच त्यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा प्रत्ययही अलीकडेच आला. भारताच्या संसदेत भाषण करताना मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात किमान ३ आंतरवासिता (इण्टर्नशीपचा) समावेश करण्यात येईल असे जाहीर केले. भारतातील १०,३२८ अभियांत्रिकी महाविद्यालये व संस्थांतून १५.८७ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील केवळ ६.९६ लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. म्हणजे हे प्रमाण केवळ ४३.८५% इतके कमी आहे. लाखो रुपयांचे ट्युशन क्लास आठवी ते बारावी याकाळात व नंतर लाखो रुपये फी भरून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर जर केवळ ४०.४३% विद्यार्थी रोजगारक्षम असतील तर ही गंभीर घटना आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून अशा प्रशिक्षणाची घोषणा झाली ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. याची गरज होतीच. पण ही गरज का निर्माण झाली व असे प्रशिक्षण, १५ ते १६ लाख विद्यार्थ्यांना कसे देणार, त्याची कोणती यंत्रणा उपलब्ध आहे, तिची प्रभावी अंमलबजावणी कशी करणार याचाही विचार होणे आवश्यक आहे.
  खरं तर अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासूनच होते. आठवीपर्यंत कुणीही नापास होत नाही. त्याचा परिणाम म्हणून ही फौज पुढे ढकलण्यासाठी दहावीला ‘सबका भला हो’ या न्यायाने सर्वांना भरमसाठ गुण मिळतात. शेकडो विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळणे ही गुणवत्तावाढ आहे की गुणवत्तेला आलेली सूज हे सुज्ञास वेगळे सांगणे नको. पुढे बारावीनंतर अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळवणे इतके साधेसोपे केले गेले आहे की ते अभियांत्रिकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवावे. बारावीनंतर सीईटीला नॉनझिरो, म्हणजे शून्य मार्क फक्त नको. एक मार्कावर खातं उघडलं तरी प्रवेशाला पात्र अशी फौज पुन्हा अभियांत्रिकीत पुढे ढकलण्याची सुविधा आहेच. फरक एवढाच की आठवीपर्यंत परीक्षा न देताच पास होता येते. अभियांत्रिकीत परीक्षा देऊनही पास होता येते. तेही विशेष गुणवत्तेसहित. आता जवळपास सर्वांनाच डिस्टींक्शन मिळते. दहावीचा सुजलेला निकाल आणि अभियांत्रिकीचा निकाल यांच्यात गुणात्मक फारसा फरक नाही. त्यामुळे जसे दहावीला भरमसाठ गुण मिळूनही अनेक विद्यार्थ्यांना आपलं नावही लिहिता येत नाही तसंच अभियांत्रिकीची पदवी प्रथम वर्ग वा विशेष गुणवत्तेसह पास होऊनही विद्यार्थ्यांना साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. एकावर एक फ्री अशी जी योजना अनेक उत्पादकांनी सुरू केली आहे त्याचा शैक्षणिक आविष्कार म्हणजे दहावीवर बी.ई. पदवी विनासायास. अर्थात इतकं सौम्यीकरण होऊनही जे अभियांत्रिकीत नापास होतात त्यांच्याबद्दल आदरच व्यक्त करायला हवा!
   मुळाशी जाऊन याची कारणे पुढे शोधली तर लक्षात येते की प्रवेश घेतलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना आपण कशासाठी शिकतो आहे, पुढील ४० वर्षांचे आपले ध्येय काय आहे व इंडस्ट्रीच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत याची कल्पनाच नसते. त्यामुळे त्यांना अभ्यासाची गोडी लागत नाही व कसेबसे दिवस ढकलायचे म्हणून ते अभ्यासक्रम पूर्ण करतात. शिक्षकांच्या पातळीवर विचार करायचा झाला तर ज्ञान, व्यासंग, संशोधन, संदर्भ ग्रंथांचे वाचन या बाबी दुर्मीळ झाल्या आहेत. मुलाखतीसाठी येणाºया अनेक प्राध्यापकांच्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांपेक्षा फारशी वेगळी नसतात. गाइड या प्रकारातून शिकविल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तासाला बसण्यात रस नसतो. अनेक व्यवस्थापनांचे महाविद्यालयांकडे दुर्लक्ष असते. अपुरा प्राध्यापक वर्ग, त्यांना अपुरे वेतन, प्रयोगशाळा व ग्रंथालयांमध्ये कमी सुविधा, कागदावरची हेराफेरी यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता खालावते. पालकांचे मुलांकडे अक्षम्य दुर्लक्ष, मुलांचे फाजील लाड, अवास्तव अपेक्षा व काहीही न केले तरी मुलांना गुण मिळावे म्हणून अवाजवी आर्जव या सर्वांचा एकत्रित परिणम म्हणून भरमसाठ मार्क आहेत, पदवीचा कागद हातात आहे. पण बाजारात किंमत नाही.
   शासनाची अभियांत्रिकी शिक्षणाची धोरणेही धरसोडीची व उथळ आहेत. अमेरिकेची आर्थिक उलाढाल १६ लाख कोटींची आहे व तेथे दरवर्षी १ लाख अभियंते निर्माण केले जातात. भारताची आर्थिक उलाढाल दरवर्षी २ लाख कोटींची आहे व येथे १५ लाख अभियंते निर्माण होतात. यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक व त्यातही गुणवत्ता नाही. याचा परिणाम बेरोजगारी वाढण्यात होतो. मार्कशिटवर गुण भरपूर आहेत, पण अंगात गुणवत्ता शून्य. म्हणून आता डॉक्टर्स, सी.ए. व वकिलाप्रमाणे अभियंत्यांनीसुद्धा इण्टर्नशीप करावी असा प्रस्ताव आहे. खरं तर शिक्षण व प्रशिक्षण हातात हात घालून झाले पाहिजे. शिक्षण संपल्यावर वेगळे प्रशिक्षण घेणे यातच शिक्षण पद्धतीत दोष असल्याचे सिद्ध होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रम हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. त्यात कौशल्य, सॉफ्टवेअर व तंत्रज्ञानाचा व्यवहारात उपयोग आवश्यक आहे. या गोष्टी अभ्यासक्रमात पाहिजे त्या प्रमाणात नसतात. अभ्यासक्रम बनविताना उद्योगधंद्यांच्या गरजा लक्षात घेणे आवश्यक असते त्यासाठी अभ्यास मंडळात इंडस्ट्रीच्या प्रतिनिधीला स्थान असावे. प्रत्यक्षात हे स्थान कागदावर असले तरी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग व योगदान खूपच मर्यादित असते. प्राध्यापकांचाही इंडस्ट्रीशी संबंध यथातथाच असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे तितके व्यावहारिक ज्ञान मिळत नाही. या साºयाचा परिणाम नोकरी मिळण्यावर होतो. ज्ञान व कौशल्ये नसलेले अभियंते कामावर घेऊन पोसण्यात कोणत्याच इंडस्ट्रीला फायद्याचे नसते. शिवाय असा ज्ञान व कौशल्यरहित अभियंता कंपनीत येतो तो त्याचा अहंभाव (इगो) घेऊन. त्यापेक्षा इंडस्ट्रीला आयटीआय झालेले विद्यार्थी परवडतात. त्यांच्यात थोडे कौशल्य तरी असते आणि इगोही नसतो. एका अभियंत्याच्या पगारात २-३ आयटीआयवाले नोकरीत घेता येतात. पण या सर्वांमुळे अभियंता बनण्यासाठी खर्च केलेले लाखो रुपये वाया जातात. एक अभियंता बनण्यासाठी किमान सहा लाखापर्यंतचा खर्च येतो. दवर्षी १४ लाख अभियंते बेरोजगार बनले तर ८.४ लाख कोटी रुपयांचा तोटा देशाला सहन करावा लागतो.
   हे बदलायचे असेल तर अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीत अनेक मूलभूत बदल करावे लागतील. इण्डर्नशीप हा त्यातला एक बदल आहे. पण त्याची अंमलबजावणी करण्याचे काम तेवढेच आव्हानात्मक आहे. दरवर्षी निर्माण होणाºया अभियंत्यांना सध्या महाविद्यालय-उद्योगधंदे सुसंवाद ज्याला ‘इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन’ असं म्हटलं जातं याच्या अंतर्गत दोन पद्धतीने प्रशिक्षण दिलं जाते. एक तर इंडस्ट्रीमधील माणसाला महाविद्यालयात बोलावून त्याचं व्याख्यान आयोजित करायचं किंवा विद्यार्थ्यांची अभ्याससहल इंडस्ट्रीत न्यायची. पण हे दोन्ही मार्ग खूपच तकलादू आहेत.
   डॉक्टरची एक चूक फार तर एक रोग्याच्या प्राणावर बेतेल. पण अभियंत्यांची एक चूक हजारो जणांच्या जिवावर बेतू शकते. इंडस्ट्रीला हे चांगले कळते म्हणून आज लाखो अभियंते बेरोजगार आहेत. अभियंत्यांना हे जेव्हा कळेल तेव्हा त्यांच्या अभ्यास, व्यासंग व ज्ञानाचा प्रवास सुरू होईल. पुस्तकी ज्ञान व प्रात्यक्षिक ज्ञान यांच्या साधनेतूनच हे शक्य होईल. लॅबरोटरी जेव्हा फिल्डमध्ये जाईल तेव्हा अभियंते प्रगतीकडून उन्नतीकडे जाऊ लागतील. शिक्षण व प्रशिक्षणाच्या मार्गावरून हा प्रवास सुकर होईल.

इण्टर्नशिप करा, पण करणार कुठं? कशी?
वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न असे १०० बेडचे हॉस्पिटल असते तसे प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रत्येक ज्ञानशाखेशी किमान १० इंडस्ट्री संलग्न असणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी किमान ६ विद्यार्थ्यांची सोय होईल. अशा इंडस्ट्रीशी सुसंवाद वाढविण्यासाठीही हे संलग्नीकरण आवश्यकता आहे. या इंडस्ट्रीला त्याबदल्यात त्यांच्या समस्यांची उत्तरे प्रकल्पाच्या माध्यमातून सोडवायला मदत होईल. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा हल्ली २४ तासात ४ ते ६ तासाहून अधिक वापरल्या जात नाहीत, त्यांचाही वापर वाढेल. प्रयोगशाळा, स्ट्राफ, सॉफ्टवेअर, मशिनरी यांचा दोन संलग्न संस्थांना परस्परपूरक फायदा होईल. आपापली दिनचर्या सांभाळून संयुक्त वेळापत्रकानुसार असा फायदा घेता येईल.
ज्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता आहे तेथे आपोआपच असे संलग्नीकरण सुलभ होईल. त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळण्यासाठी याचा फायदा होईल. ज्या ज्या महाविद्यालयात टेस्टिंग व कन्सल्टन्सी देण्यात येते त्या त्या कंपनीशी संलग्नीकरण करणे सोपे जाईल. ज्या ज्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या हुद्यांवर कार्यरत आहेत, त्या त्या कंपन्यांशी संलग्नीकरण करणेसुद्धा सुलभ होईल.

जे जे पालक महाविद्यालयांशी संबंधित आहेत व ज्यांच्या ज्यांच्या स्वत:च्या कंपन्या आहेत किंवा जे जे अशा कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमतून सुद्धा संलग्नीकरणासाठी प्रयत्न करता येतील.
याशिवाय देखील दर्जा, गुणवत्ता, प्रसिद्धी, ध्येयसिद्धी वगैरे अनेक मार्गांनी इंडस्ट्रीसोबतचे संबंध सुधारून व सुसंवाद वाढवून विद्यार्थ्यांना फायदा करून देता येईल.

अर्थात, हे सारं घडण्यासाठी विद्यार्थ्यांची मनापासूनची इच्छा, प्राध्यापकांची तळमळ व व्यासंग, महाविद्यालयांची तयारी व विधायक वृत्ती, व्यवस्थापनाचे आर्थिक पाठबळ व गुणवत्तेशी तडजोड न करण्याची भूमिका, पालकांचे सहकार्य आणि इंडस्ट्रीचा सक्रिय सहभाग हे सारं आवश्यक आहे. ध्येय धोरणे, नियम आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी हे काम अखिल भारतीय तंत्रपरिषद व शासन यांना चोखपणे पार पाडावे लागेल. अनावश्यक, गुणवत्ताहीन महाविद्यालये बंद करावी लागतील. उद्योजकता विकास, कौशल्य विकास व रोजगाराभिमुखता वाढण्यासाठी आंतरवासिता असो वा प्रशिक्षण याची गरज आहेच.

अपेक्षित काय इण्टर्नशिप की ट्रेनिंग?
नुकतीच घोषणा झाल्यानुसार जर प्रत्येक अभियंत्याला इण्टर्नशीपसाठी पाठवायचे झाले तर देशात १५ लाख अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री उपलब्ध आहे का? शिवाय त्यांची विद्यार्थ्यांना सामावून घ्यायची तयारी आहे का? यासाठी लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था कोण करणार? शासन, महाविद्यालय की इंडस्ट्री? यात महाविद्यालयांची जबाबदारी काय? इंडस्ट्रीची भूमिका काय? ग्रामीण भागात मोठ्या संख्येने अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर अशी सुविधा उपलब्ध करून देणारी इंडस्ट्री उपलब्ध आहे का? नसल्यास विद्यार्थ्यांना बाहेरगावी जायचे झाल्यास त्यांचा खर्च कोण करणार? यासाठी काही ‘कॉर्पस् फंड’ निर्माण केला आहे काय? याचा कालावधी किती असेल? त्याचे मूल्यमान कोण व कसे करणार? मनुष्यबळ विकासमंत्र्यांना नेमके आंतरवासिता (इण्टर्नशीप) असेच म्हणायचे आहे की प्रशिक्षण (ट्रेनिंग) असे अभिप्रेत आहे? हे व असे असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.
 

Web Title: Where 15-16 lakh students will be internship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.