; हा टॅटू करतात कुठं?
By admin | Published: August 13, 2015 02:45 PM2015-08-13T14:45:20+5:302015-08-13T14:45:20+5:30
; हा टॅटू आहे, हे खरं पण तो टॅटू नाही तर ते एक स्टेटमेण्ट आहे, जगण्याची उमेद संपलेली नाही हे सांगण्याचं!
Next
>- हा टॅटू मुख्यत्वे मनगटावर करून घेतात. चांगला ठसठशीत, सगळ्यांना दिसेल असा. आता मात्र कानाच्या मागे, मानेवर, घोटय़ावर, हाताच्या मधल्या बोटावर इथेही असे सेमीकोलन हमखास दिसतात!
; या खुणोचा अर्थ तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अर्धविराम. अर्थात इंग्रजीत ज्याला सेमीकोलन म्हणतात अशी ही खूण!
हल्ली या खुणोचा टॅटू करून घेण्याचा एक मोठा ट्रेण्ड पाश्चिमात्य जगात दिसतो. त्यातही तसा टॅटू करून घेतला की, त्याचा फोटो सोशल नेटवर्किग साइटवर टाकण्याचाही ट्रेण्ड आहे.
फॅशनच्या जगात हे व्याकरण कुठून घुसलं असं तुम्हाला वाटू शकतं, पण ही फॅशन नाही. नुस्ता ट्रेण्ड तर नक्कीच नाही.
हा टॅटू आहे हे खरं; पण तो टॅटू नाही तर ते एक स्टेटमेण्ट आहे.
जे म्हणतं की, ‘आयुष्यात हा एक फक्त अर्धविराम आहे, पूर्णविराम नाही. माझं आयुष्य एका वळणावर जरासं थांबलं असेल, पण मी हरलेलो नाही. संपलेलो नाही. मी फक्त एका अर्धविरामी वळणावर येऊन थांबलोय.’
या ‘सेमीकॉलन’चा अर्थ एवढाच की, मी माझ्या जिंदगीची कथा लिहिणारा एक लेखक आहे, या लेखनात काही कारणास्तव आलाय अर्धविराम, पण माझी कथा संपलेली नाही. अजून पूर्णविराम मानत मी कसलीच हार मानलेली नाही.
2क्13 मधे ही एक सोशल मीडिया चळवळ सुरू झाली. तिचं नावच होतं प्रोजेक्ट सेमीकोलन.
हे चिन्ह प्रतीक ठरले आशा, उमेद आणि प्रेमाचे. जगण्याच्या दुर्दम्य इच्छेचे. जगात अशी अनेक माणसं आहेत जी डीप्रेशन, फ्रस्ट्रेशन, आत्महत्त्येचे विचार, कुठकुठली व्यसनं आणि स्वत:ला संपवण्याच्या विचारातून स्वत:वरच हल्ले करत घुसमटत जगताहेत.
ही खूण त्यांना असं सांगतेय की, ही लढाई आहे. तुम्ही एकटे नाही, तुमच्या लढाईत आम्ही सहभागी आहोत. फक्त हरू नका, हार मानू नका. पुन्हा सुरू होईल आयुष्य, या अर्धविरामाहून पुढे चला.
***
जगभरातच मानसिक आजार, त्यातून येणारी निराशा आणि आत्महत्त्या हा तसा दुर्लक्षित विषय. शक्यतो लपवण्याचाच. न बोलण्याचाच. त्यातही तरुण मुलं या सा:यातून जातात तेव्हा जास्त एकेकटी उदास होतात.
त्यांना सोबत व्हावी, या मानसिक आरोग्याविषयी जनजागृती व्हावी म्हणून हा ‘सेमीकोलन’ अनेकजण करून घेताना दिसतात.
जे मानसिक आजारानं ग्रस्त आहेत ते तर आवजरून करतात. आपल्याला हा आजार आहे हे लपवणंच मुळात त्यांना मान्य नाही.
आणि त्यांना सोबत म्हणून त्यांचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक हेसुद्धा असा टॅटू मुद्दाम बनवून घेत आहेत, मिरवतही आहेत!
चिवट जिद्दीच्या या लढाईत सहभागी होत जगण्याला, आशेला आणि उमेदीला आपला पाठिंबा देत आहेत. या टॅटूला आता सिम्बॉल ऑफ सायलेण्ट फाईट असं म्हटलं जातंय!