रस्त्यावर नाही तर कुठं करणार प्रेम?
By admin | Published: November 20, 2014 06:22 PM2014-11-20T18:22:33+5:302014-11-20T18:22:33+5:30
मनाचे प्रश्न, भावनांचे घोळ आणि शरीराच्या भुकेचे प्रश्नही पोटाच्या भुकेइतकेच गंभीर होतील, ‘तरुण’ होत जाणार्या समाजातले हे नवे प्रश्न समजून घेतले नाहीत तर आज दिसतोय तसा टोकाचा संघर्ष अटळ आहे.
Next
>लाटा येतात. ओसरतात.
कधी दर्याला तुफान येतं, कधी पार खपाटीला गेलेला समुद्र उघड्यानागड्या खडकांत डबकं होऊन ओहोटीत हरवून जातो.
सध्या चर्चा अशाच एका तरुण तुफानाची, ‘किस ऑफ लव्ह’ची !
हे असं उघड्यावाघड्यावर अंगचटीला येत एकमेकांचे मुके घेणं म्हणजे जर तरुणांना स्वातंत्र्य वाटत असेल तर त्यांच्या अकलेचं दिवाळं वाजलेलं आहे असं जुन्याजाणत्यांना वाटतं. ते वाटणं ‘चूक’ असं म्हणत विरोधाचे झेंडे फडकावणं अत्यंत पोकळ वाजंत्री बंडाचं लक्षण आहे हे खरंच. मात्र प्रेम करायला जायचं कुठं, असा प्रश्न न विचारता जाहीरपणे एकमेकांच्या मिठीत शिरणारी तरुण जोडपी चुकीची वागतात असं म्हणणंही तितकंच पोकळ आणि भुसभुशीत आहे, हे कुणी मान्य करणार आहे का?
मुंबईत किमान दहा वर्षे मुक्त पत्रकार म्हणून मी खरंच ‘मुक्त’पणे फिरलो आहे. बॅण्ड स्टॅँड ते मरीन लाईन्स, नरीमन पॉइण्ट, वरळी सीफेस ते माटुंगा-भांडूप-कांजूर आणि माहीम-माटुंगारोड-खारसारखी तुलनेनं कमी गर्दीची स्टेशनंही भटकलो आहे. एवढंच कशाला, रिक्षा भाड्यानं घेऊन त्या फिरत्या रिक्षेत (पुढे रिक्षावाला बसलेला असताना) एकमेकांच्या जवळ येणारं आणि अंधार्या गल्ल्यातून फिरणारं ‘रिक्षेतलं प्रेम’ही नजरेतून सुटलेलं नाही. जे रिक्षेत तेच टॅक्सीत, मल्टिप्लेक्समध्ये आणि रेस्टॉरण्ट्समध्येही. अगदी स्पष्ट आणि स्वच्छच शब्दात सांगायचं तर एक शेवटची काही मिण्टांची लैंगिक कृती सोडली तर सारंकाही खुलेआम करणारी जोडपी मुंबईसारख्या शहरात सर्रास दिसतात. गर्दीत विसरून जातात देहभान.!
मुंबईकरांच्या सरावलेल्या नजरा आताशा यासार्याचा बाऊ करत नाहीत की, संस्कृती बुडाली म्हणून हाकारेही बडवत नाही. लग्न झालेली अनेक जोडपीही वीकेण्डला कुठंतरी लॉजमध्ये तास-दोन तास जाऊन येतात हेही आता या शहरात ओपन सिक्रेटसुद्धा उरलेलं नाही ! कारण दहा बाय दहाच्या घरात खच्चून माणसं भरलेली असल्यानं शरीरसंबंधापुरतीही जागा आणि निवांतपणा मिळत नाही हे या शहरातलं सत्य आहे. या शहराच्या स्पीडचा आणि नाइलाजाचा भाग म्हणून या शहरात हे सारं सामावूनही जातं आहे.
उद्या कुणी संस्कृती रक्षकांनी उगारल्याच काठय़ा तर कुठं जातील मरीन ड्राईव्हवर आणि वरळी सीफेस-बॅण्डस्टॅण्डवर बसणारी जोडपी? मुळात आपल्या आयुष्यातली पहिलीवहिली शरीरक्रिया आणि शारीर जवळीक अशी उघड्यावाघड्यावर करताना या तरुणांना काहीच वाटत नसेल का? कसलंच दडपण? लाज किंवा संकोच? याच प्रश्नाचं उत्तर शोधत तरुण मुलामुलींशी त्यांच्याही नकळत या विषयांवर बोललो तर समोर येतो फक्त नाइलाज ! आणि डोळ्यावर कातडी ओढून जग विसरण्याचीच सक्ती!
मुळात या शहरात ‘जागा’ महाग. अगदी एखाद्या हॉटेलात नुस्तं जेवायला जाऊ म्हटलं तरी गर्दी. त्यात कधीकधी तर इतकी गर्दी की, आपल्या शेजारच्या दोन खुच्र्यांवर दोन अनोळखी माणसं येऊन बसतात आणि आपण काय खातो हे पाहत आपण काय बोलतो ते ऐकत बसतात. अशा वेळी निवांतपणे एकमेकांसोबत जेवण्याचा रोमान्सही पूर्ण होत नाही, तिथं काय बोलणार प्रायव्हसीविषयी?
खच्चून भरलेली घरं, स्टेशनं, गाड्या, ऑफिसं. परस्परांना चोरटे स्पर्श करण्यापलीकडे दुसरं काय असतं हातात? शांत निवारे कोपरे फार कमी सुदैवांच्या नशिबात असतात. आणि दुसरीकडे तरुण होत जाणारे मुलंमुली एकत्र शिकतात, एकत्र तरुण होतात, तेव्हा शारीर आकर्षणानं जवळ येतील हेच सहज आहे. आणि ते सहजी मान्य करायलाच आपला समाज तयार नाही.
एरव्ही तरुणांचा देश, तरुण ऊर्जा म्हणून मारे डांगोरे पिटले जातात. पण हा तरुण डेमोग्राफिक चेंज काही ‘तरुण’ प्रश्न निर्माण करील, हे कधीतरी आपण खुल्यादिलानं मान्य करणार आहोत का?
आणि ते तरुण प्रश्न रोटी-कपडा-मकान यापेक्षा वेगळे असतील. मनाची बंड असतील, मनाचे प्रश्न, भावनांचे घोळ आणि शरीराच्या भुकेचे प्रश्नही पोटाच्या भुकेइतकेच गंभीर होतील, हे समजून घेतलं नाही तर आज दिसतोय तसा टोकाचा संघर्ष अटळ आहे.
आणि त्या संघर्षातून घटकाभराची करमणूक यापलीकडे काहीही साधत नाही. आज जे भररस्त्यात किस करून आपल्या हिमतीचे झेंडे फडकावत आहेत, त्यांच्या हिंमतीमुळे मूळ प्रश्न सुटत नाही. आणि संस्कृतीचा पुळका म्हणून जे विरोध करत आहेत त्यांना समाजात तरुणांची होणारी भावनिक-शारीरिक घुसमट समजून घेण्याइतपत फुरसत नाही, गरजही वाटत नाही.
तात्पर्य दोन्ही बाजूला प्रसिद्धीचे फुसके झोत आणि बडबडे पोंगापंडित फक्त दिसतात. मूळ प्रश्न गंभीर आहे आणि येत्या काही काळात तो अधिक गंभीर होत जाईल. निसर्गनियमानं होणारी शारीरिक जवळीक करायलाही तरुण शरीरांना जागा उरली नाही, तर ते नाइलाज म्हणून रस्त्यावर येतीलच.
त्यांच्या भावनिक-मानसिक घुसमटीचं आपण काय करणार, हा प्रश्न या चर्चामधे हरवून जातो, हेच आपल्या समाजाचं दुर्दैव आहे !
- चिन्मय लेले