कोरोनाकाळात पालक आणि मुलं नेमके कुठं अडले आहेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:16 PM2020-08-06T17:16:18+5:302020-08-06T17:18:36+5:30
दहावी-बारावीचे निकाल लागले की एरव्हीही आपला ‘कल’ शोधणाऱ्या मुलांची आणि पालकांची काउन्सिलर्सकडे गर्दी होते.
कोरोनाने सगळ्यात जास्त कुणाचे प्लॅन्स फिस्कटवले असतील तर ते तरुण मुलांचे.
कुणाला पटकन डिग्री, चटकन नोकरी या दिशेनं जायचं होतं, कुणाला परदेशी शिकायला, कुणाला मोठय़ा शहरात, कुणाला पुढच्या वर्गात अॅडमिशन घ्यायची होती.
तर कुणाला ड्रॉप घ्यायचा होता.
पण ते सगळं राहिलंच आणि सक्तीचं घरी बसणं वाटय़ाला आलं.
काय चाललंय, तर काही नाही असंच उत्तर येतं.
त्यात एटीकेटीवाल्यांचे हाल भलतेच, लास्ट इअरला असणा:यांना तर कळतच नाहीये की नेमकी आपली नाव या वादळात कुठं आणि कशी जाणार आहे.
त्यांचं तर कशातच काही नाही.
पण एरव्ही काय व्हायचं अनेक जण परीक्षा झाली की रिझल्ट लागण्यापूर्वीच म्हणत यंदा पेपर भंगार गेलेत, स्कोअर काही बरा येणार नाही. आपण कुठल्याच भुक्कड कॉलेजला जात नसतो.
आपण ड्रॉप घेणार. ते दोस्तांनाही सांगतात, आपण ड्रॉप प्लॅन करतोय.
दोस्तांना काय ते कळतं, या दोस्ताचं अप्रूपही वाटतं आणि हे आता जास्त रट्टा मारणार असं म्हणत ते ऑल द बेस्ट म्हणणार.
तसंही ड्रॉप घेणारे जास्त कॉन्फीडंट मानले जात.
पण घरच्या आघाडीवर काय व्हायचं, मी ड्रॉप घेणार आहे. वर्षभर पुन्हा सीईटीची तयारी करून चांगला स्कोअर आणतो असं सांगितलं की मोठा गहजब होत असे.
पालकांना काही हा निर्णय मान्य नसे. ते कटकट करत, काहीजण नाराज होत, ओरडत, चिडत; पण शेवटी मुलांसमोर हात टेकत.
मग पुन्हा खासगी क्लास, कोचिंग, तासन्तास अभ्यास हे सगळं चक्र सुरूव्हायचं.
त्यातून काहीजण खरंच चांगला स्कोअर आणत असत, काहीजणांना मात्र आधीच्या स्कोअरपेक्षाही कमी मार्क पाहण्याची नामुष्की पाहावी लागे.
पण आता या कोरोनासह जगण्याच्या काळात या ड्रॉप घेऊ म्हणणा:यांचं काय होणार?
त्याला पूर्वीसारखंच ग्लॅमर राहील का ते जाईल?
हा प्रश्नच सध्या अनेकांना छळतो आहे, कारण कधी नव्हे इतकी अनिश्चितता समोर आहे.
काहीजण त्यासाठी करिअर काउन्सिलरचा सल्लाही घेत आहेत.
सोनाली सावंत, करिअर काउन्सिलर सांगतात, ‘शेवटी हा निर्णय त्या मुलांचा आहे. कारण त्यात चूक -बरोबर असं काही नाही. मात्र एक नक्की की आताच्या काळात ड्रॉप न घेणं उत्तम.
आधीच स्पर्धा जास्त, नोकरी-जॉब्ज-अॅडमिशन- परीक्षांचे निकाल हे सारं चक्र सुरळीत नाही. त्यामुळे आता अनाठायी धोका पत्करू नका. ड्रॉप घेणं डेअरिंगबाज, अॅडव्हेंचर्स वाटू शकतं; पण त्यातलं आव्हान दिसत नाही. रीपीट करतोय मी अटेम्प्ट असं म्हणून तसा निर्णय घेण्यापूर्वी दहावेळा विचार करा. यश हे सापेक्षच असतं.
त्यामुळे जो स्कोअर आहे, त्याला हाताशी धरून पुढचं प्लॅन करा. ते जास्त व्यावहारिक होऊ शकेल.
***
दहावीचे निकाल लागले, यंदा प्रत्यक्ष नाही तरी ऑनलाइन काउन्सिलिंग अनेकांनी केलंच.
कुठली साइड निवडायची, हा आपल्याकडचा जीवन-मरणाचा प्रश्न आहे.
त्यातही जी मुलं ठाम असतात त्यांचं ठीक ;पण जी ही शाखा की ती शाखा असा सारखा झोका खात असतात त्यांच्या पालकांना मग करिअर काउन्सिलरची, इक्यू-आयक्यू टेस्टची मदत घ्यावीच लागते.
आता मात्र यंदा कोरोनाच्या ऑनलाइन काळात एक नवाच ध्यास पालकांनी घेतल्याचं करिअर काउन्सिलर सांगतात.
ते म्हणजे ऑनलाइन कोर्सेस. त्यातही सोशल मीडिया कोर्सेस.
अनेकांना वाटतं आहे की एव्हीतेव्ही आपली मुलं ऑनलाइन पडीकच असतात.
तर निदान सोशल मीडिया मार्केटिंग, कोडिंग, पीआर, कम्युनिकेशन, इंग्लिश स्पीकिंग असे कोर्सेस तरी त्यांनी करायलाच हवेत.
काउन्सिलर सोनाली सावंत सांगतात, ‘पालक म्हणतात हल्ली काय हो, 95 टक्के मार्क म्हणजे काहीच नाही, अनेकांना पडतात. त्यात आपल्याकडे वेगळं स्किल हवं. त्यासाठी हे ऑनलाइन कोर्सेस करायला नको का, साइड कोणतीही निवडली तरी चालेल; पण हे सगळं तर यायलाच पाहिजे, डायनॅमिक झालं पाहिजे. काहीजण तर पैसे भरून मुलांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, कम्युनिकेशन, सोशल मीडिया कोर्सेसना जाण्याचा आग्रह करत आहेत. आपलं हुशार मूल बोलक्या बाहुल्यांच्या नव्या ऑनलाइन जगात मागे पडेल असं आता अनेक पालकांना वाटू लागलं आहे. त्याचा फायदा होईल की मुलं डिस्ट्रॅक्टच होतील याचा विचार फार कमी पालक करताना दिसतात.!’
- ही नवीन स्किल्स काळाची गरज असली तरी आपला नेमका फोकस काय, हे लक्षात घेऊन मग ऑनलाइन कोर्सेसच्या प्रेमात पडायला हवे.