तुमच्यात कुठला स्पार्क आहे?

By admin | Published: March 11, 2016 11:53 AM2016-03-11T11:53:59+5:302016-03-11T11:53:59+5:30

आपल्यातही गुणांचा खजिना लपलेला असतो. या खजिन्यात चित्रकार असतो, शास्त्रज्ञ असतो, कधी दुस:याचं मन जाणणारा मानसतज्ज्ञ,एखादा आर्किटेक्ट किंवा व्हिजुअलायझरही असू शकतो. प्रत्येकात काही ना काही क्षमता असतातच. पण त्या आपल्यात आहेत, हेच कळत नाही; मग आपल्यात काय आहे, हे नेमकं ओळखायचं कसं?

Which sparks do you have? | तुमच्यात कुठला स्पार्क आहे?

तुमच्यात कुठला स्पार्क आहे?

Next
>आपल्याही नकळत आपल्याला अनेक माणसं दिशा देत असतात. ते सर्व लोक म्हणजे आपले ‘डायरेक्टर्स’ अर्थात दिग्दर्शक असतात. कधी हे डायरेक्टर्स आपल्या घरातलेच म्हणजेच आपले पालक असतात. आई-बाबा, आजी-आजोबा, मामा- मावशी, काका - काकू यांच्यापैकीच कोणाचं तरी काम, त्यांचं करिअर आपल्याला जबरदस्त आवडून जातं आणि तेच करिअर करायचं, असं आपण ठरवतो. 
कधी आपले शिक्षक-प्राध्यापक, शाळा-कॉलेजमध्ये बोलायला आलेले वक्ते यांच्या बोलण्यातून एखादा धागा सापडून जातो. काहीतरी क्लिक होतं. जे क्लिक झालं, त्याचा पाठपुरावा केला तर कदाचित तीच आपल्या करिअरची दिशा असू शकते.
वर्तमानपत्रतली एखादी बातमी ही देखील करिअरची वाट दाखवू शकते. इतरांच्या आत्मचरित्र, चरित्र यातून ‘आपल्यालाही आयुष्यभर हेच करायला नक्की आवडेल’ असं वाटू शकतं. 
कधी असं होतं की, आपल्यामध्ये लपलेल्या गुणांची अचानक ओळख पटते. आपल्यात गुणांचा खजिना लपलेला असतो. या खजिन्यात चित्रकार असतो, शास्त्रज्ञ असतो, कधी दुस:याचं मन जाणणारा मानसतज्ज्ञ असतो. एखादा आर्किटेक्ट किंवा व्हिजुअलायझरही असू शकतो. प्रत्येकात काही ना काही क्षमता असतातच. आतार्पयत या क्षमतांना मूर्त रूप मिळालं असेल असं काही सांगता येत नाही. पण आपण काही तरी वेगळं करावं ही ‘छोटीसी आशा’ प्रत्येकाच्या मनात लपलेली असते. पण हा खजिना आपल्यात लपलेला आहे, हे दुस:याच कोणामुळे तरी कळतं. ते आपले डायरेक्टर्स असू शकतात. त्यांचा शोध घ्या. पण तो कसा घ्यायचा?
- हा शोध सोपा जावा म्हणून अशा काही गोष्टी करता येतील.
 
1.  गेल्या दोन वर्षात ज्यांनी ज्यांनी करिअरचा निर्णय घेतला आहे, त्यांच्याशी बोला. (तुम्हाला तेच करिअर निवडायचं नसेल तरीही यातून आपल्याला सध्याच्या काळात नक्की काय चालतं, याची माहिती असणं गरजेचं आहे.) तुम्ही ज्यांना भेटाल त्यातले काही करिअरविषयी समाधानी असतील, तर काही असमाधानी असतील. त्यांचे अनुभव विचारा. दोघांकडूनही जी माहिती मिळेल, ती आपल्यासाठी उपयुक्तच असेल. 
 
2. आता आपल्याला जी करिअरची वाट निवडावीशी वाटते आहे, त्या वाटेवर आधी जे पोहचलेत, प्रत्यक्ष कामाला लागले आहेत, त्यांच्या कामाचं, जीवनशैलीचं, ताणतणावांचं आणि पॅकेजचाही अर्थात त्यांना मिळणा:या पैशांचाही विचार करा. ते पैसे कधी मिळायला लागले, त्यापूर्वी म्हणजे सुरुवातीला ते किती मिळत होते, याचीही माहिती घ्या.
 प्रत्यक्ष निर्णय घ्यायला याचा उपयोग होईल.
 
3. प्रामाणिकपणो तुमच्या मनाला विचारा की, आपल्या जवळपासची यशस्वी माणसं कोण कोण आहेत? आपल्या नातेवाइकांपैकी कोणी आहे का? प्रसिद्ध उद्योजक आहे का? आपले फॅमिली डॉक्टर, आपला एखादा मित्र, एखादी मैत्रीण, आपण नेहमी ज्या बॅँकेत जातो तिथले कर्मचारी की अजून कोण? यापैकी किंवा एकदम वेगळी अशी तुमच्या माहितीतली माणसं आठवा.
आपल्याला यशस्वी वाटणा:या लोकांची यादी करा. ही माणसं इतरांपेक्षा वेगळी आहेत का? काय वेगळेपण आहे त्यांच्यात? असे कोणते वेगळे गुण आहेत की, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे वाटतात? असा विचार केला तर आपल्याला त्यांचे गुण सहजपणाने कळतात.  
शिक्षक-प्राध्यापक हे अभ्यासू, संवेदनशील असावे लागतात. व्यावसायिकाच्या अंगी चिकाटी हवीच. कलाकाराच्या अंगी सृजनशीलता हवी. अभिव्यक्ती हवी. आपल्या नोकरी - व्यवसायासाठी लागणारी सर्व कौशल्यं चांगल्या पद्धतीने यायला हवीत. आपल्या अंगी कितीतरी गुण असतात, त्या गुणांचं कौशल्यांमध्ये रु पांतर करता यायला हवं. या  कौशल्यांमुळेच त्या त्या माणसाचा वेगळेपणा दिसून येतो. तो माणूस इतरांपेक्षा उठून दिसतो. 
हे गुण पाहून आपल्यामध्ये असलेल्या अशा विविध कौशल्यांचा शोध घ्यायला हवा. असलेल्या कौशल्यांची जपवणूक करायला हवी. तसच जी आवश्यक कौशल्यं आहेत, ती शिकून घ्यायला हवीत. या व्यक्तींना या व्यवसायात नवीन कोणकोणती कौशल्यं शिकावी लागली आहेत, हे त्यांनाच विचारा. 
यातल्या कोणाची वाट आपल्याला भावते? 
या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला आपली वाट शोधायला मदत करेल.
 
4. या सर्व गोष्टी करून झाल्यावर महत्त्वाचा मुद्दा येतो तो स्वत:विषयीचा. आपण अनेकदा इतरांना प्रेरणास्थान मानत असतो. दुस:यांकडून मार्गदर्शन मिळावं, याची अपेक्षा करतो. तेव्हा हे विसरतो की आपणही स्वत:पासून प्रेरणा घेऊ शकतोच.
अभिनव बिंद्राचं या संदर्भातलं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणतो, ‘सुवर्णपदकाचं स्वप्न मी पाच वर्षापूर्वीच पाहिलं होतं.’
म्हणजे तेव्हापासून त्याला सुवर्णपदकाचा ध्यास होता. असा ध्यास, अशी इच्छाशक्ती युवावस्थेपासूनच बाळगली पाहिजे. 
एखादं आवाक्यात नसलेलं स्वप्न बघायचं, त्या स्वप्नाचा पाठलाग करायचाच असं मनाशीच ठरवूनच टाकलं तर? 
तर कदाचित इतरांकडून मार्गदर्शन मिळेलच पण अंतिमत: स्वत:चा ‘डायरेक्टर’ 
आपण स्वत:च होऊ.
प्रयत्न केला तर आपली दिशा आपल्याला नक्की सापडेल!
 
डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
drshrutipanse@gmail.com 
 

Web Title: Which sparks do you have?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.