वरण आणि पिठलंबिठलं
By admin | Published: February 22, 2017 02:38 PM2017-02-22T14:38:56+5:302017-02-22T14:38:56+5:30
करीना कपूर कुळिथाचं पिठलं आणि बाजरीची भाकरी खाते हे वाचून दचकलात.पण प्रोटीनसाठी डाळी खा असं म्हणत नुकतीच एक जागतिक मोहीम संंपन्न झाली,त्यात आपलं डाळ-वरणही गाजलं...
- भक्ती सोमण
एरव्ही ज्या पदार्थांना तरुण मुलंमुली नाकं मुरडतात तेच पदार्थ एकदम सेलिब्रिटी डाएट होऊन आपल्याला भेटतात...
तेव्हा वास्तव झेपणं जरा अवघडच असतं...
पण गेल्या आठवड्यात असं झालं खरं...
करीना कपूर बाळंतपणानंतर काय काय खातेय, याचा एक फोटोच तिची डाएटशियन ऋजुता दिवेकर हिने सोशल मीडियात टाकला...
आणि तो फोटो पाहून अनेकांच्या नजरेत एकच प्रश्न होता..
कुळीथ?
कुळिथाचं पिठलं - बाजरीची भाकरी, सुरणाची भाजी आणि वरणभात हे खातेय करीना कपूर?
म्हटलं ना, झेपणं तसं अवघडच आहे हे वास्तव.
पण आहे हे असं आहे.
आपल्या सुपर फूड सीरिजमध्ये पण ऋजुता हे वारंवार सांगते आहे की, स्थानिक पदार्थ खा. अलीकडे तिनं लाइव्ह चॅटमध्येही डाळीसाळी, कुळीथ, तीळ, भाकरी हे सारं खाणं किती महत्त्वाचं आहे, हेच वारंवार सांगितलं.
अर्थात, हे सारं एकट्या ऋजुता-करीनानं तरी कशाला सांगायला हवं?
गेलं वर्षभर, म्हणजे २०१६ हे वर्ष युनेस्कोनं कडधान्य वर्षे म्हणून जाहीर केलं होतं. जगभर डाळींचं महत्त्व, त्यातल्या प्रोटीनचा, पौष्टिक आहाराचा प्रचार यासाठी वर्षभर जनजागृती करण्यात आली.
पण आपल्यापर्यंत पोहचलं का ते सारं?
की आपण रोजचाच शेरा मारणार घरी की, काय रोज रोज तोच वरणभात. काय रोज रोज कसलं ना कसलं वरण, डाळी, नि उसळी करता?
खरं तर भारतात रोजच्या आहारात कडधान्य आणि डाळींचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. अगदी मूल सहा महिन्याचं झाल्यावर त्याला आई मुगाची डाळ आणि तांदळाच्या मिश्रणाचं खिमट खायला घालते. जसजसे महिने वाढायला लागतात तसे त्याला कडधान्य- मिश्रडाळींचे सूप, मूग-तुरीचे वरण-भात असे खायला मिळते. त्यातून त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारी अनेक पोषणतत्त्वे मुख्यत: प्रथिने त्याला मिळतात. हळूहळू मोठं झाल्यावर तर रोजच आपला विविध डाळी आणि कडधान्यांशी परिचय होतो.
पण तरुण होता होता मात्र आपल्याला हे सारं जुनाट आणि बुरसटलेलं वाटू लागतं.
डाळीसाळी काय खायच्या? कुळिथाचं पिठलं, शेंगोळे, कोरडं डाळीचं पिठलं, मुगामठाची वरणं, उसळी, वाटली हरबऱ्याची डाळ, मुटकुळे हे सारं म्हणजे काहीतरी जुनाट आणि बाहेर हॉटेलातलं भारी असं आपल्या डोक्यात का कोण जाणे रुजतं..
आणि मग आपण आपला हा घरगुती पौष्टिक प्रोटीन इनटेक नाकारत महागड्या प्रोटीन पावडरी शरीरात ढकलत राहतो...
आणि मग एकदिवस आपल्याला कळतं की करीना कपूरचा ग्लो तीळ आणि कुळीथ खाऊन येतो तेव्हा आपल्याला धक्का बसतो..
हा धक्का पुरता पचवून आपण जर आपल्या पारंपरिक डाळी-कडधान्यांकडे वळलो तर काय सांगावं, तो ग्लो आपलीही वाट पाहत असेल...
रोजच्या आहारात कडधान्य आणि डाळींचा वापर आवश्यकच आहे. मूग, मटकी, राजमा, छोले, चणे, वाटाणा, चवळी अशा अनेक कडधान्यांतून फायबर, अॅण्टी आॅक्सिडण्ट, न्यूट्रिएण्ट शरीराला मिळतात. जी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. प्रथिनंही मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच त्यात चरबी आणि सोडियमचे प्रमाण कमी असल्याने ब्लडप्रेशर आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर ती अत्यंत फायद्याची असतात. रोज दोनवेळा कडधान्य खाल्ली तर प्रथिने मोठ्या प्रमाणात मिळाल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होईल. याशिवाय मोड आलेल्या कडधान्यांमुळे त्याची न्यूट्रिशियल व्हॅल्यू वाढते. कडधान्य, डाळींचे घावन, इडल्या, ढोकळा, सॅलेड्सही चवीला छान लागते. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आहारात समावेश झालाच पाहिजे. - कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ
आहारात डाळी आणि कडधान्य नियमित असणं हे आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही चांगलेच आहे. फक्त नेहमी नेहमी तेच पदार्थ खाण्यापेक्षा त्यांना टिष्ट्वस्ट कसे करता येईल हेही पाहिले पाहिजे. बाजारात आजकाल विविध शेप्सचे टार्ट मिळतात, त्यात ही कडधान्ये आकर्षक सजावट करून दिली तर चटकन संपतील. कडधान्यात चीज आणि आवडीच्या भाज्या मिक्स करून पराठा, बर्गरसाठी कटलेट असे प्रकार करता येऊ शकतात. - तुषार देखमुख सुप्रसिद्ध शेफ
( भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे. bhaktisoman@gmail.com )