भय मिसळलं कोणी?

By admin | Published: August 11, 2016 04:11 PM2016-08-11T16:11:52+5:302016-08-11T16:11:52+5:30

मुंबईसारख्या महानगरात टेलिव्हिजनच्या धबडग्यात रोज धावणारी एक तरुण पत्रकार मैत्रीण. तिला काहीतरी जाणवतं आहे... जाणवते आहे तरुण मुलींच्या मनात वस्तीला आलेली भीती... ती म्हणते, की श्वास घुसमटतो आहे मुलींचा! त्यांच्या आयुष्यातले हे काटे कसे निघतील?

Who is afraid? | भय मिसळलं कोणी?

भय मिसळलं कोणी?

Next

- सोनाली शिंदे

‘आम्हाला खेळायला मैदानं नाहीत... वस्तीत सुरक्षित नाही वाटत...आम्ही गॅलरीत आलो तरी खालून मुलं मोबाईल नंबर मागतात...खूप छेडखानी सुरु असते... रस्त्यावरु न जाता-येता त्रास होतो...’ - ती सांगत होती.

परवा आझाद मैदानात भेटलेल्या एका शाळेतील मुलीची ही दोन वाक्यं. हे शब्द वस्ती-वस्तीतील, झोपडपट्ट्यांमधील मुलींच्या असुरक्षिततेचं चित्र डोळ्यासमोर उभं करु न जातात. कोपर्डीतील घटनेने आधीच जखमी झालेल्या मनाला ही परिस्थिती अधिक दुखावते.वस्तीतील भीतीयुक्त हवेची जाणीव करु न देते.

किती कोलाहल असेल या मुलींच्या मनात! सतत पाठलाग करणारी भीती. भीतीने जड झालेले श्वास घेत या मुली लहानाच्या मोठ्या होतात.
खेड्यातील, शहरातील, या वस्तीतील ते अगदी घरातील वातावरण सुरक्षित व्हायचे तेव्हा होईल. पण त्यांच्या ‘मनात’ मात्र भीतीने घर करायला नको. ही भीती फोडून काढायला पाहिजे. बाहेरील हवा जेव्हा सुरक्षित व्हायची तेव्हा होईल, मनात मात्र स्वातंत्र्याचेच अंगण बहरायला हवे. अर्थात, हे दोन वेगळं थोडंच आहे. ते एकमेकांशी थेट संबंधित आहे.
लहानपणी मनात बसलेली भीती आयुष्यभर पाठ सोडत नाही. 
त्या मुलींशी बोलता-बोलता संवाद एका टप्प्यावर पोहोचला असताना, माझ्याच वयाच्या एका मैत्रिणीने मनाच्या एका कोपऱ्यात बांधून ठेवलेल्या भीतीच्या गाठोड्याची गाठ नकळत सोडली. ती तिसरी-चौथीत असताना माणसांनी गच्च भरलेल्या एसटीच्या प्रवासात एका पन्नाशीच्या माणसाने तिला मांडीवर घेऊन तिच्या गुप्तांगाला वारंवार स्पर्श केल्याची घटना अजूनही तिने मनात तशीच खुपसून ठेवलेली होती. त्यावेळी तिला कळलेच नाही की आपल्यासोबत काय होतेय! सत्ताविशी पार केली तरी आजवर तिने याबाबत कोणाकडेही चकार शब्द काढलेला नाही.

अगदी अलीकडे मलाही जुईनगर रेल्वे स्टेशनवर एका वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागले. ठाण्याहून सानपाड्याला येण्यासाठी मला पनवेल लोकल मिळाली. त्यामुळे रात्री साडेअकरा-बाराच्या सुमारास मी जुईनगर रेल्वे स्टेशनला उतरु न सानपाड्याला जाणाऱ्या लोकलच्या प्लॅटफॉर्मवर आले. मुळात हे स्टेशन जास्त गर्दीचे नाही... स्टेशनपासून वस्तीही लांब आहे. त्यात सुट्टीचा दिवस असल्याने लोकलमध्ये, तसेच प्लॅटफॉर्मवर गर्दीही नव्हती. स्टेशनवर दुकाने नाहीत... नवी मुंबईतील स्टेशनवर केवळ नावाला असणारे सुरक्षारक्षकही नव्हते. माझ्याच लोकलमधून येणारे लोक काही सेकंदातच प्लॅटफॉर्मवरु न निघून गेले होते. लांबून चालत येणारा तो तगडा माणूस माझ्याकडेच येत होता. अगदी काही पावलांवर पोहोचल्यावर त्याचा चेहरा दिसला. चेक्सचा शर्ट, घामट चेहरा, तुरळक दाढी, ती घाणेरडी नजर...तो दारु प्यायलेला आहे, हे त्याच्या चालीवरु न समजतच होते. काही वेळात त्याच्यासोबत आणखी एक माणूस आल्याचे पुसटसे आठवते. धीट मनाची मी त्यावेळी मात्र आतून गडबडून गेले. तो ज्या आवेशात आणि वेगाने माझ्याकडे येत होता, त्या वेगात काय करावे हे समजेना. मी ओरडणार.. . तो माझ्यापर्यंत पोहोचणार आणि पुढे काहीतरी होणार...इतक्यात लांबून लोकलचा हॉर्न ऐकायला आला. पण त्या माणसाला मधले सेकंदही पुरेसे होते. म्हणून मी पुढे-पुढे चालत राहिले. तोपर्यंत लोकल आली. मी डब्यात चढले आणि सुटकेचा सुस्कारा टाकला.
पण, अशा भीतीचे व्रण कायम राहतात. ते आयुष्याची किंमत मागतात. उसनी हिंमत संपवून टाकतात. त्याचं काय करायचं?
प्रश्न असा आहे की, अगदी सार्वजनिक ठिकाणी असं धाडस कसं होतं? काही सेकंदांच्या काळातच अशी कृती करायला ही माणसं कशी धजावतात?
अशा प्रवृत्तींची वाढ जिथून होते, त्या प्रारंभालाच खरं म्हणजे हात घालायला हवा. पण त्याआधी अशा घटनांमुळे मुलींच्या मनात भीतीचे ढग दाटलेत. ते दूर करायला हवे. 
अत्याचाराचे स्तर अनेक आहेत. बालपणी एसटीत ओढवलेला अतिप्रसंग झेलणारी माझी मैत्रीण असो वा मी असो! आम्ही मोकळेपणाने बोलतो. ती भीती मनातून घालवतो. पण आझाद (!) मैदानात, वस्तीतील मुलींची व्यथा सांगणाऱ्या त्या शाळकरी मुलीचं काय? तिला सकाळी उठल्यापासून... शेजाऱ्यांकडं जाताना...बाजारात जाताना...शाळेत-क्लासेसला जाताना...ते अगदी सार्वजनिक शौचालयात जाताना, अनेकदा घरी असताना... किती साऱ्या नजरांना, स्पर्शांना सामोरे जावे लागत असेल! तिच्या मनातील भीती कशी घालवणार? तिच्या वस्तीत राहणाऱ्या शेकडो मुलींनी काय आयुष्यभर भीती मनात ठेवून जगायचं? 
अशा परिस्थितीत वेगळ्या प्रकारे काम करण्याची गरज आहे. काही महिन्यांपूर्वींच काही संस्था झोपडपट्ट्यांमध्ये अशा प्रकारे काम करत असल्याची माहिती समजली. त्यांनी ठिकठिकाणी मुलींचे गट बनवले आहेत. हे गट मुलींना छेडछाड, तसेच अत्याचाराच्या घटनांमध्ये काय करायचे, प्राथमिक पातळीवर काय करायचे, पोलीसांची मदत कशी घ्यायची, हे शिकवताहेत. विशेष म्हणजे या गटांच्या लीडर त्यांच्यातील मुलीच आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात येतं या मुलींना. लीडर मुलींना या परिस्थितीचा अनुभव आहे. त्या स्थानिक असल्याने मुलींना त्यांच्याशी बोलणं अधिक सोपं जातं. 
‘राईट टु पी’ ही चळवळ राबविणाऱ्या मुमताज शेख सुद्धा या मोहिमेचा भाग आहेत. अशा प्रकारच्या मोहिमांमुळं लोकांमध्ये तसेच सरकारी यंत्रणांवर एक दबावही निर्माण होतो.
पण, हेच काम आपण व्यक्तिगत पातळीवरही सुरु करु शकतो. सध्याची परिस्थिती बदलायची असेल तर प्रत्येकाने आपापल्या पातळीवर पाऊल उचलण्याची गरज आहे. मी मुलींशी बोलायला सुरु वात केलीय. आपल्याला मिळेल त्या संधीचा फायदा घ्या आणि आजूबाजूच्या मुलींशी बोला. लोकल, रिक्षा, बस, रोजच्या संपर्कात येणाऱ्या मुलींशी बोला. त्यांना सुरक्षित वाटेल, असा संवाद करा. प्रचंड क्षमता-एनर्जी-उत्साह असलेल्या मुलींना छान, स्वच्छंदी आयुष्य जगता आलं पाहिजे. एकदा का मनात भीतीने घर केलं, तर पुढचं आयुष्य कसं मोकळेपणाने जगणार या मुली? त्यांच्या मनातील भीती मोडून काढता आली, तर या मुलीच स्वत:हून वातावरणातल्या भीतीशी दोन हात करतील.
कराटे आणि शस्त्र परवाने नंतर, आधी त्यांच्या मनाचं आकाश निरभ्र करु या. त्यांना भयमुक्त करु या.
मी हे लिहित असतानाही, माझ्या मनात खोलवर लपलेले भीतीचे व्रण मला पुसता येत नाहीएत! हा प्रवास दूरचा आहे. ठाणे-सानपाडापेक्षाही दूरचा!


निर्भया...आणि निर्भय
कुणाचं आहे हे भय?
मुलग्यांचं! पुरुषांचं!!
कधी आपल्या शरीरावर कोणाची कसली नजर पडेल
आणि कधी कसल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल याचं!!
तरुण मुलींचा हा कोंडमारा तरुण मुलांना जाणवतो का?
त्यांना काय वाटतं त्याबद्दल?
‘अशा’ मुलांना ‘तशी’ बुध्दी होऊच नये, 
त्यांच्या शरीरातला बेदरकार राक्षस काबूत ठेवला जावा
म्हणून काय करता ये ईल?
फक्त मुलींशी बोलणं, त्यांना हिंमत देणं पुरेसं आहे का?
मुलग्यांशी कोण बोलणार? काय बोलणार?
काय वाटतं तुम्हाला?
लिहा
निवडक मतांना ‘आॅक्सिजन’मध्ये प्रसिध्दी.
अंतिम तारीख : 20 आॅगस्ट 2016.
(सोनाली महाराष्ट्र वन या वृत्तवाहिनीत बातमीदार आहे.)

Web Title: Who is afraid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.