बिचकतो कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 05:24 PM2018-01-31T17:24:12+5:302018-02-01T16:23:24+5:30

गावातून जिद्द आणलीच होती, शहरानं रीत शिकवली तेव्हा कुठं स्वत:ची ओळख पटली...

Who hesitates? | बिचकतो कोण?

बिचकतो कोण?

Next

- किशोर डंभारे
माझं गाव तसं खूपच छोटं. चारशे-पाचशे लोकवस्तीचं. सावंगी देरडा. पोस्ट तरोडा, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा हा माझा पत्ता. एकेकाळी या गावात पक्की सडकपण नव्हती. टेलिफोनची सुविधा नव्हती. २००० सालापर्यंत मोबाइलसुद्धा गावात पोहोचला नव्हता. तीन गाव मिळून एक गट ग्रामपंचायत, जी आजही आहे. डॉक्टर नाही, शाळा चौथीपर्यंतच.
एक छोटंसं दुकान फक्त होतं. तिथं गोळ्या-बिड्या मिळायच्या. एक साधा कुणाला फोन करायचा म्हटलं तरी पाच किलोमीटरवर असलेल्या मांडगाव किव्वा तरोडा गावी जावं लागायचं. शिक्षणाचं कुणाला कौतुक नव्हतं. पन्नास टक्के मुलं दहावीपर्यंत, २५ टक्के मुलं जेमतेम बारावीपर्यंत जात. पदवीपर्यंत जाणारे कमीच. शेती, शेतमजुरी करून जगायचो सारे. आजही हे चित्र काही फार बदललेलं नाही.
आला शहाणा शिकणार, आता बॅरिस्टरच बनणार असं लोक सर्रास म्हणत. चौथीपर्यंत मी गावच्या शाळेत शिकलो. पुढं दुसºया गावात. बाजाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी शाळेत जाणं अनिवार्य बाकी अर्धे अधिक दिवस घरी व शेतीवरच राहायचो. दहावी तर पास झालो. पुढे समुद्रपूरला विद्याविकास विद्यालयात प्रवेश घेतला. रोज १६ किलोमीटरवर सायकलनं जाणं फार अवघड व्हायचं; पण बसला पैसे नसायचे. कसंबसं बारावीही उत्तीर्ण झालो.
वाटायचं शेतात काम करून जगणं फारच अवघड आहे, आपण शिकायला हवं. काहीतरी करायला हवं. गाव सोडल्याशिवाय शिक्षण होणार नव्हतं. शेवटी गाव सोडलं, आणि मग गाव सोडायचा निर्धार पक्का झाला. २००० साली थेट शेगाव गाठलं. आयुष्यात पहिल्यांदा घर, आईवडील, मित्र आणि गावही सोडलं. शेगावला आयुष्याच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली. मी इंजिनिअरिंग शिकू लागलो.
शहरात किंवा उच्चशिक्षित, आर्थिक सबळ लोकांच्या दुनियेत काय असतं आणि काय नसतं हे जवळून पाहण्याचा योग आला. जगण्याची नवी रीत समजली. स्वच्छ, टापटीप राहणं, खाणं, बोलणं या वातावरणानं शिकवलं. छोट्याशा गावातून आणलेली जिद्द, प्रामाणिकपणा, संयम, कठोर परिश्रम करण्याची तयारी हे सारं सोबत होतंच. दोन्ही जगातल्या चांगल्या गोष्टींची जोडी लावून टाकली.
पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन नागपूर विद्यापीठातून पूर्ण केलं. जिद्द वाढली होती. हुरूप आला होता. अचानक वडील गेले. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. शेगाव सोडलं आणि अमरावतीत पोहोचलो. या शहरानं मला व्यवहार आणि दुनियादारी शिकवली. प्रगतीचा वेग वाढवल्याशिवाय ध्येयापर्यंत पोहचता येणार नाही ही जाणीव करून दिली. शर्यतीत आहोत तर पहिल्या नंबरसाठीच धावायचं हे शिकवलं. खेड्याचा आणि शहराचा रंग मिळून नवीन नवा रंग तयार झाला. यश हाताशी लागायला लागलं.
सुरु वातीची कमीपणाची भावना आणि लाजाळूपणा कमी झाला. मग लक्षात आलं की, या शहरांना बिचकायचं काय कारण? शहरंही आपलीच आहेत. इथली अनेक माणसं आपल्यासारखीच कधीकाळी कुठल्याशा खेड्यातून आलेली असतील. त्यांची माणसंही कुठल्या तरी खेड्यात असतील. जीवन सुखी करण्याची साधनं या शहरात भरपूर आहेत त्यांना गावाकडच्या समाधानाशी जोडलं की जगणं सुंदर होईल. समृद्धही होईल. शहरातलं आपल्याला जे आवडतं, पटतं ते ते घ्यायचं. नाही रुचलं ते सोडून द्यायचं किंवा दुर्लक्ष करायचं. गाव सोडून शहरात गेल्यावर ते शहर आपल्याला आपलीच ओळख करून देतं, हे नक्की!

Web Title: Who hesitates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.