पहचान कौन
By admin | Published: April 2, 2015 06:10 PM2015-04-02T18:10:27+5:302015-04-02T18:10:27+5:30
लग्न मग ते लव्ह असू देत नाहीतर अरेंज. जोडीदाराविषयी अपेक्षाच जास्त. आणि आता त्या
Next
>- लीना कुलकर्णी (विवाह समुपदेशक)
लग्न मग ते लव्ह असू देत नाहीतर अरेंज. जोडीदाराविषयी अपेक्षाच जास्त. आणि आता त्या अपेक्षाही काही पूर्वींसारख्या ‘टॉल-डार्क-हॅण्डसम’ आणि ‘सुंदर-सोज्वळ-सुशील’ या चौकटीतल्या राहिल्या नाहीत.
मुलीला नवरा म्हणून हवा असलेला मुलगा उत्तम करिअरवाला, चांगले पैसे कमावणारा, बायकोला समजून घेणारा, स्पेस देणारा, आपली मतं जोडीदारावर न लादणारा, कोणत्याही चौकटीत आणि बंधनात न अडकवणारा असा हवा असतो तर मुलांनाही बायको शिकलेली, नोकरी करणारी, पैसे कमावणारी, लग्नानंतर घरातल्या आणि बाहेरच्या जबाबदार्या स्वतंत्रपणे हाताळू शकणारी, आपल्या घरच्यांशी अँडजेस्ट करू शकणारी, घराच्यांचं आणि आपलं मन राखणारी, आपल्यात आणि आपल्या मित्र-परिवारात सहजपणे मिसळून जाणारी अशी हवी असते.
ही अपेक्षांची यादी मोठी आहे कदाचित न संपणारीही.
पण या सार्यात ‘जरा स्वत:विषयी सांग’ हा अवघड प्रश्न कुणी विचारलाच तर नाव-गाव-आवड-निवड-नोकरी यापुढे उत्तराची गाडी काही सरकत नाही. आणि ज्या व्यक्तीला स्वत:लाच हे माहिती नाही की, आपण नेमके कसेय, ते जोडीदाराकडून अपेक्षा काही का बाळगेनात; स्वत:ला नेमकं काय हवंय हे त्यांना कळणं अवघडच!
तुम्हाला स्वत:ची ओळख व्हावी, आपल्याला स्वत:कडून, जगण्याकडून आणि जोडीदाराकडून नेमकं काय हवंय हे कळायला मदत व्हावी म्हणून हे काही प्रश्न. खरं तर परीक्षेच्या काळातले हे पेपरच; त्यांची उत्तरं तुमची तुम्ही सोडवा आणि तपासा, तुम्ही नेमके कुठं उभे आहात ते?
पेपर पहिला
स्वत:शी आहे ओळख?
१) मी कसा किंवा कशी आहे?
२) माझी जडणघडण कशी झाली आहे? त्याचा माझ्या विचारसरणीवर कोणता परिणाम झाला आहे?
३) माझ्या अवती-भवतीचा माझ्यावर चांगला-वाईट काय परिणाम झाला आहे?
४) माझी मूल्यं काय आहेत? माझे विचार सकारात्मक आहे की नकारात्मक?
५) मला काय जमतं? काय जमत नाही?
हे प्रश्न स्वत:ला विचारले आणि खरी खरी उत्तरं दिली तर चटकन कळतील आपले स्टॉंग आणि विकपॉइंट!
पेपर दुसरा
माझी लाइफस्टाइल कशी आहे?
लग्नाआधी नोकरी करणार्या मुलींना आई हातात डबा देते. लग्न झाल्यावर मात्र ऑफिसला जाताना डबा आयता हातात मिळत नाही. उलट कधी कधी सगळ्यांच्या हातात देऊन मग निघावं लागतं. लग्नानंतर ही कसरत करायला आपण तयार आहोत का?
लग्नाआधी मोबाइल, कम्प्युटर, फिल्म्स, मित्र, पाटर्य़ा हीच लाइफस्टाइल असलेल्या आपल्या आयुष्यात आता बायको म्हणून जी मुलगी येणार आहे तिला आपला वेळ द्यावा लागणार आहे, तिच्यासोबत आपली प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय लावावी लागणार आहे. हे करणं आपल्याला सोपं जाणार की अवघड?
असे लाइफस्टाइलबाबतचे प्रश्न विचारा स्वत:ला.
१) लग्नाआधीची माझी जीवनशैली कशी आहे?
२) लग्नानंतर माझी जीवनशैली किती बदलणार आहे?
३) लग्नानंतर आयुष्यात आलेल्या नवीन घराशी, घरातल्या माणसांशी, नवीन नात्यांशी मी जुळवून घेऊ शकेल का? जुळवून घेण्यासाठी मला काय करावं लागेल?
४) मी कोणत्या प्रकारच्या माणसांमध्ये राहू शकतो/शकते? कोणाशी आणि कोणत्या प्रकारच्या माणसांशी जुळवून घेऊ शकतो/ शकते?
५) मला कसं कुटुंब हवं आहे? एकत्र की वेगळं?
या प्रश्नांमुळे आपल्या क्षमता जशा कळतात तशाच आपल्या र्मयादांचा अंदाजही येतो. फक्त या प्रश्नांची खरी उत्तरं द्या, स्थळ चांगलं असेल तर जमवू असं म्हणत स्वत:ला फसवू नका.
पेपर तिसरा
पैशाचं काय?
१) माझ्या आर्थिक सवयी कशा आहेत?
२) मला उधळपट्टी करायला आवडतं की काटकसर करायला?
३) लग्नानंतर माझ्या कोणत्या आर्थिक सवयींवर मला र्मयादा घालाव्या लागतील?
४) लग्नानंतर माझ्यावर कोणत्या नवीन आर्थिक जबाबदार्या पडतील आणि त्या मी कशा पार पाडेल?
आर्थिक सवयींचा विचार जर आधीच केला तर लग्नानंतर पैशांमुळे नात्यात निर्माण होणारी कचकच वेळीच टाळता येऊ शकते.
पेपर चौथा
मी समाजात कसा वागतो?
१) जात-पात-धर्म याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन खुला आहे की संकुचित आहे?
२) मी समाजप्रिय आहे की एकलकोंडा?
३) मी समाजात वावरताना कायदे पाळतो/पाळते की कायदे तोडतो/तोडते?
४) वीज-पाणीबचत याबाबत माझे विचार घरातल्या सवयी कशा आहेत?
५) मी इतरांचा आदर, नात्यांचा सन्मान करतो/करते का?
६) नवरा-बायको या नात्याकडे मी कसा बघतो/बघते? या नात्यातली आपल्याला समानता प्रिय आहे की बायको कानाखालचीच हवी असं मत आहे?
या प्रश्नातून आपली सामाजिक वृत्ती तपासता येते. खरं तर दोन विरुद्ध प्रकृतीच्या व्यक्ती उत्तमपणे आपलं सहजीवन जगू शकतात की नाही याचं उत्तर सामाजिक विचारसरणीतल्या या प्रश्नांच्या उत्तरात दडलेलं आहे.
( शब्दांकन : माधुरी पेठकर)