आपल्या मदतीला कोण?

By admin | Published: September 1, 2016 12:57 PM2016-09-01T12:57:35+5:302016-09-01T12:57:35+5:30

खूप निराश वाटतं, जीव द्यावासा वाटतो, आपल्याला कुणी मदत करत नाही असं वाटत असेल, तर स्वत:ची मदत स्वत: करा. आपणच आपली प्रेरणा बना. कशी?

Who is your help? | आपल्या मदतीला कोण?

आपल्या मदतीला कोण?

Next
>- डॉ. श्रुती पानसे
(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
 
परीक्षेत नापास झाल्यामुळे मुलाची आत्महत्त्या
‘ती’ नाही म्हणाली म्हणून आत्महत्त्येचा प्रयत्न 
- अशा किती बातम्या आपण ऐकतो, वाचतो.
आणि प्रश्न पडतो की, एक परीक्षा, एक इंटरव्ह्यू, एक प्रेमप्रकरण आपल्या संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठं असतं का? वास्तविक प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडत असतो. स्वत:च्या अस्तित्वावर फार प्रेम करत असतो. छोटीशी मुंगीसुद्धा स्वत:च्या जिवाला जपते. एखादा धोका आला तर धावून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करते.
मग विचार करू शकणाऱ्या, शिकलेल्या मुलामुलींना नेमकं काय होतं?
अनेकदा आपल्या आयुष्यात चित्रविचित्र प्रसंग येतात. अगदी अनपेक्षित असेच असतात हे प्रसंग ! त्यामुळे आपण ताणाखाली असतो. आपल्याच अंतर्मनातला ताण कधी आपल्याला जाणवतो, तर कित्येकदा जाणवत नाही. अगदी आपल्या जवळच्यांनाही जाणवत नाही. अनेकदा मनाला कधीकाळच्या गोष्टी लागलेल्या असतात. अभ्यासात प्रगती दिसत नसली तर सर्वांची बोलणी खावी लागतात. घरची माणसं आपला अपमान करतात, त्यापेक्षा आपण स्वत:चा अपमान करतो!
आणि अशी स्वत:च्याच विचारांमध्ये गुरफटणारी मुलं असुरक्षिततेच्या छायेत वावरतात. त्यांच्या मनाचा एक कोपरा कायम भीतीच्या सावटाखाली असतो. अशी मुलं एरवी नीट वागली, तरी त्यांच्या मनावर घातक परिणाम झालेले असल्यामुळे मन एकाग्र होण्यात अडथळे येतात. सगळ्यांशी मिळून मिसळून राहू-बोलू शकत नाहीत. मोकळेपणाने कुणाशी मैत्री करू शकत नाहीत. आत्मविश्वास कमी होतो. मनावर झालेला परिणाम शरीरावरही दिसून येतो. या नकारात्मकतेच्या मुळाशी असलेली भावना जास्त घातक आहे ती म्हणजे स्वत्वाला बसलेला धक्का. 
वाढत्या वयात जेव्हा आपण स्वत:विषयीच्या काही जाणिवा विकसित करू बघत असतो, तेव्हाच असा धक्का बसणं हे आत्मसन्मानालाच धक्का बसण्यासारखं असतं. याचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर होत असतो.
आणि हे सारं टाळायचं तर इतरांनी आपल्याला मदत करण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपण स्वत: आपल्या मदतीला जायला हवं. स्वत:साठी काही गोष्टी करून पाहायला हव्यात.
अगदी विमानात सांगतात तसंच, इतरांना मदत करण्यापूर्वी स्वत:ची काळजी घ्या. 
ती कशी घ्यायची, याचीच ही काही सूत्रं.
 
 
स्वत:च स्वत:ला मदत करा!
इतरांना मदत करण्याच्या भावनेविषयी खूप काही लिहिलं, बोललं जातं. सर्वसाधारणपणे आपल्या घरातली माणसं, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना आपण शक्य ती मदत करतही असतो. पण आज जरा स्वत:ला केलेल्या किंवा न केलेल्या मदतीविषयी बोलूया. आपण स्वत:ला मदत करतो का? स्वत:ला कशाकशाची मदत लागते? सारखीच मदत लागते की एखाद्यावेळी मदत केली तरी चालतं? इंग्रजीत सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकं असतात. साधारणपणे अडचणींवर मार्गदर्शन असं त्या पुस्तकांचं स्वरूप असतं. स्वत:ला मदत कुठे लागते, ते बघायला हवं. तरच या संकल्पनेची गरज लक्षात येईल.
 
मदत का करायची?
आपण स्वत:ला बऱ्यापैकी ओळखत असतो. ‘स्वत:’साठी आवश्यक आणि अतिआवश्यक कोणत्या गोष्टी आहेत, आपण त्या का करत नाही, हे आपल्याला चांगलंच माहीत असतं. माहीत असूनही आपण ते करत नाही. म्हणजे नक्कीच त्यासाठी कोणाची तरी मदत हवी आहे. मग आपणच ती केलेली काय वाईट?
 
मदत कुठे लागते?
* अनेक दिवस झाले सकाळी चालायला जायचं ठरवलं आहे. पण उठवत नाही. उठलं तरी चालायचा कंटाळा येतो आणि राहून जातं. संध्याकाळी नक्की, असं म्हणत सकाळ तशीच संपते. आणि अशा अनेक संध्याकाळीही निघून जातात. 
- इथे स्वत:ला मदत करण्याची गरज आहे. स्वत:ला दटावून चालायला लावण्याची गरज आहे. 
 
* कितीही ‘गुड मॉर्निंग’चे मेसेज सकाळी सकाळी वाचले तरी ‘मॉर्निंग’ होतंच नाही ‘गुड’. मनात नकारात्मक विचार घोळत राहतात. 
काय हा अजून एक दिवस. आजही तेच आणि तेच. कित्ती दिवसांपासून वेगळं काहीतरी करायचंय. काही होतच नाही. अशावेळी स्वत:ची नक्कीच मदत लागणार आहे. पहाट आणि सकाळ याच्या मध्ये जी प्रसन्न वेळ असते, ती अतिशय ऊर्जादायी असते. त्या वेळात मन आपोआपच सकारात्मक असतं. (वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाहीत.) या सुंदर वेळी, फक्त आजची ही वेळ आणि हा आजचा दिवस एवढ्याचाच विचार करता येतो. कालच्या दिवशी केलेल्या स्वत:च्याच चुकीच्या गोष्टी मोठ्या मनाने माफ करू शकतो. स्वत:लाच माफ करणं, ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी स्वत:च्या चुका लक्षात येणं हीदेखील आवश्यक गोष्ट आहे. प्रत्येक सकाळ स्वत:लाच ‘गिफ्ट’ द्यायची ! तेही रोजच्या रोज.
 
* महिन्यातून एकदा वेळ काढा. चांगली पुस्तकं वाचा.
* छानशी कविता स्वत:ला ऐकवा. स्वत:बरोबर कवितांची, गाण्यांची मैफल जमवून. 
* वहीच्या पानावर स्वत:विषयी लिहा. दरवेळी नवं लिहा. नवं लिहिण्यासाठी नवं काही करावं लागेल. 
* स्वत:विषयी लिहिलेलं केव्हातरी वाचून भरपूर करमणूकही होईल आणि स्वत:ची चांगली भेट घडेल.
* एकटेपणा हा वाईट असतो. एकटेपणाला नकारात्मक छटा आहे. तशी एकांताला नाही. स्वत:शीच एकांत घडावा. डोक्यातली कलकल शांत करायला, स्वत:शी संवाद साधायला, घडलेल्या वाईट प्रसंगातून स्वत:ला सावरायला, हातून काही छान घडलं असेल तर स्वत:चं कौतुक करायला, स्वत:ची पाठ थोपटायला तो आवश्यक असतो. या गोष्टी एकांतात चांगल्या प्रकारे घडून येतात.
* आपलं सामर्थ्य कशात आहे, आपलं शक्तिस्थान कोणतं, हे ओळखायला असा वेळ आवश्यक. आपलं सामर्थ्य ज्यात आहे ते अजून वाढवायला तर हवंच, त्याचा वेळोवेळी आढावाही घ्यायला हवा. 
* त्याचबरोबर आपल्यातल्या कमतरताही शोधायच्या आहेत, हे माहीत हवंच. घडलेल्या घटनांवर शांतपणे विचार कराल तेव्हाच या कमतरता सापडतील.
* आपल्या बदलत जाणाऱ्या विचारांकडे आपण अलिप्तपणे बघायला हवं. काळानुसार, प्रसंगानुसार, आपल्याला आलेल्या अनुभवांसमोर आपले विचार बदलत जातात. 
* आपल्याला चांगलं काम करण्याच्या प्रेरणा कशामुळे मिळतात, हे शोधायला हवं. या प्रेरणांच्या आसपास राहायला हवं. ही स्वत:ला मदतच आहे.

Web Title: Who is your help?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.