पायजे कशाला हा फालतूचा पैका?

By admin | Published: February 25, 2016 09:32 PM2016-02-25T21:32:50+5:302016-02-25T21:32:50+5:30

हुंडा घेतला नाही किंवा घेणार नाही असं स्वत:च्या अनुभवातून सांगणारी काही पत्रं या गठ्ठ्यात मिळाली आणि तिही ग्रामीण भागातून आलेली!

Why are papas packed with crust? | पायजे कशाला हा फालतूचा पैका?

पायजे कशाला हा फालतूचा पैका?

Next

 हुंडा घेतला नाही
किंवा घेणार नाही
असं स्वत:च्या अनुभवातून सांगणारी
काही पत्रं या गठ्ठ्यात मिळाली
आणि तिही ग्रामीण भागातून आलेली!
त्यातले काही नमुने..



कशाला हवी
खोटी प्रतिष्ठा??


आम्ही तीन भाऊ. एकानेही लग्नात हुंडा घेतला नाही. वडिलांनी मागितला नाही. माझ्या सगळ्यात मोठ्या भावाच्या लग्नात पन्नासच्या आत वऱ्हाडीमंडळी नेली. आपल्या घरी पाहुण्यांना रिसेप्शन दिले. माझे लग्न साखरपुड्यातच आटोपले. माझी सासू मुलीच्या लग्नासाठी व हुंड्यासाठी शेती विकणार होती ती वाचली. माझ्या लहान भावाने आंतरजातीय आंतरप्रांतीय विवाह केला. ही सगळी लग्न साधेपणानं झाली. वरातीसाठी घोड्याचा वापर नाही. फटाके फोडणं, रस्त्यावर नाचगाणं नाही. अहेर घेणं-देणं नाही. वर-वधूचे कपडे आपापले घ्यावेत असं ठरलं. लग्नाच्या वेळी प्रतिष्ठित लोकांचे सत्कार ठेवले नाहीत. कारण येणारा प्रत्येकजण आमच्यासाठी प्रतिष्ठितच होता. 
मुलीच्या बापाकडून पैसे घेऊन त्यातच नवरदेवाचे अंडरपॅण्ट, बनियन, बूट, सॉक्सपासूनचे कपडे घेणं, घोड्यावर बसणं, वरातीच्या गाड्या आणणं, फटाके फोडणं, यात मला तरी काही भूषण वाटत नाही. आणि माझे वडीलही या मताचे आहेत, ते अत्यंत सुधारणावादी व पुरोगामी आहेत.
- राजू छगन शिराळे,
बुलडाणा
तो त्रास 
इतरांना कशाला?

मी एकुलता. एक माझे वय २५ वर्षं आहे. माझे लग्न झालेले नाही. पण घरात लग्नाचा विषय निघाला की मी म्हणतो हुंडा घेणार नाही. तेव्हा माझे आई-वडील खूप चिडतात. कारण मला चार बहिणी आहेत. त्यापैकी तीन बहिणींची लग्न झालेली आहे आणि एकीचे बाकी आहे. त्या तिघींचे लग्न झाले तेव्हा पहिलीला ५१ हजार रुपये, दुसरीला ३ लाख रुपये, तिसरीला २ लाख ५१ हजार रुपये इतका हुंडा दिलेला आहे. आणि चौथ्या बहिणीच्या लग्नात ३-४ लाख रुपये हुंडा द्यावा लागेलच.
आणि मग तू का घेणार नाहीस हुंडा, असा माझ्या आई-वडिलांचा मला प्रश्न. पण तरीपण माझे मन म्हणते की जो त्रास आपण भोगला तो इतरांना नको. मी हुंडा घेणार नाही आणि लग्न पण सामूहिक विवाहसोहळ्यातच करीन. बघू कसं जमतंय.
- गणेश, बीड
ताई, जिजू

आणि त्यांचा संसार
ताईला बघण्यासाठी जिजू आले. १०-१५ नातेवाइकांसोबतच. पाहण्याचा कार्यक्रम होता, मात्र त्यांनी लगेच, तेव्हाच लग्न करून ताईला नेले. दहेज-हुंडा, दाग-दागिने म्हणून त्यांनी काहीच मागितलं नाही. ताईसाठी आधीपासूनच घरात घेऊन ठेवलेल्या वस्तूही त्यांनी नेल्या नाहीत. लग्नानंतर त्यांनीच गावपंगत दिली. ताई बीएड आहे. जिजूंनीच तिला नोकरीला लावले. आज ती शिक्षिका आहे. जिजू स्वत: वकील आहेत. इतक्या घाई-गडबडीत झालेलं लग्न पाहून समाजात, नातेवाइकांत कुजबुज सुरू झाली. सुरुवातीला आम्हाला आणि त्यांनाही लोकांचे टोमणे ऐकावे लागले पण आज ताईच्या लग्नाला साडेपाच वर्षे होऊन गेली. तिच्या सासूबाई कधी म्हणाल्या नाही, की माहेरून अमुक-तमुक वस्तू आणं. पैसे आण. तिचा संसार सुखानं सुरू आहे.
सांगण्याचा अर्थ एवढाच की, समाजात अशा ही व्यक्ती आहेत ज्या स्त्रियांचा इतका आदर करतात. ते अपवाद समाजासमोर यायला हवेत. एखाद्या मुलाने हुंडा न घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला दूषणे न देता सपोर्ट करायला हवा. नुसताच हुंडाबंदीचा कायदा कागदावर न राहता तो अमलात आणला गेला पाहिजे.
- तसलिम,
औरंगाबाद
...अरे आज्या,
कशाले, फालतूचं?

माझ्या लग्नाचा बस्ता बांधायचा होता. तालुक्याच्या ठिकाणी कापड दुकानातून खरेदी करण्यासाठी आमचे चुलते, मामे, शेजारी-पाजारी मिळून २०-२२ लोकं ही लग्नाच्या बस्त्याची खरेदी करायला दोन काळी-पिवळी गाडीनं तालुक्याला आली होती. ५-६ जण एसटीने आले. अमुक-अमुक दुकानात कपडे खरेदी करायचे ठरले. आम्ही तेथे १०-१५ लोकं अगोदर पोहचलो. मी दुकानात उभा राहून म्हणालो, तो पॅण्ट पीस, तो शर्ट पीस आणि पुन्हा एक पांढरा पॅण्ट पीस आणि पांढरा शर्ट पीस, अमुक-अमुक कंपनीचे दोन बनियन, त्या गठ्ठ्यातल्या दोन साड्या, टावेल टोपी बस् एवढे द्या. लगेच बील विचारले त्याने ११०० रु. मुलाचे आणि मुलीचे कपडे मिळून झाले असं सांगितलं. मी लगेच खिशातून तेवढे पैसे काढले अन् दुकानदाराच्या हाती दिले आणि म्हणालो, बांधा तो सर्व बस्ता... अन् द्या इकडं! कपडे घेतले व पायात चप्पल घातली बाहेर निघालो. माझ्यासोबतची माणसं आवाक्क झाली. त्यातली बरीचशी कुजबुज करत होती की, ‘तुलाच तुझ्या हाताने कपडे घ्यायचे होते तर आम्ही एवढे लोक येऊन इथं काय फायदा?’ 
म्हटलं फायद्या-तोट्याचं गणित नाही. कपडे घेतले आता चला. बाजारातून गावात एक तासातच परत आल्यामुळे शेजारी-पाजारी विचारू लागले.
‘‘काय सोयरीक फिसकटली की काय...?’’
म्हटलं, अरे, कपडे घेण्यासाठी २५-३० माणसं कशाला पाहिजेत? विनाकारण टाइमपास करायचा. बडे-बुढे म्हणत, ‘‘अरे एकतर हुंडा घेतला नाही बराबर. सगळ्याचीच बचत करतोसकी काय? एकदाच तर लग्न होते आयुष्यात...’’
मी म्हणालो, आज्या, कपडे जन्माला पुरत नसतात अन् हुंडाही काही पुरायचा नाही. मग कशाले फालतूचं...?
साध्या-सुध्या प्रकारे लग्न झालं. काही दिवसांनी मी ‘स्क्रीन प्रिंटींग’ करू लागलो. पत्रिका छापायला येणाऱ्या माणसासोबत किती हुंडा घेतला? काय करते मुलगी? किती शिकली? अशा चर्चा व्हायच्या त्यावेळेस मी त्यांना हुंडा न घेता लग्न करा, असं सांगत रहायचो.
आता तर मला वाटतं, ‘जो मागेल हुंडा, तो एक नंबरचा गुंडा’ असा फलक घेऊन नवरदेवाच्या वरातीत घुसलं पाहिजेत! फरक पडेलच हळूहळू का होईना..
- प्रा. बंदू वानखेडे 
मुंगळा, जि. वाशिम

Web Title: Why are papas packed with crust?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.