इंजिनिअर होवून नोकरी मिळत नाही ते का?

By admin | Published: April 4, 2017 06:30 PM2017-04-04T18:30:41+5:302017-04-04T18:39:41+5:30

प्रत्येकवर्षी साधारणत: पंधरा लाख अभियंते शिक्षण घेऊन बाहेर पडतात मात्र त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. यामागे अनेक कारणं आहेत.

Why do not you get a job as an engineer? | इंजिनिअर होवून नोकरी मिळत नाही ते का?

इंजिनिअर होवून नोकरी मिळत नाही ते का?

Next

मुंबई, ओंकार करंबेळकर

गेल्या दशकभरात आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केल्यानंतर अभियांत्रिकी क्षेत्राला एकदम उर्जितावस्था आली. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई अशा शहरांबरोबर वर्ग दोन म्हणजे पुणे- हैदराबादसारख्या शहरांमध्ये आणि नंतर त्याहून लहान शहरांमध्येही उदंड इंजिनिअरिंग कॉलेज उभी राहिली. त्यातून पास होवून बाहेर पडणाऱ्या इंजिनिअर्सची शंका मोठी पण कॅम्पस तर सोडाच बाहेरही अनेकांना नोकरी मिळत नाही. आणि मग काहीजण मिळेल ती नोकरी करतात काही एमबीए करतोय या भावनेवर समाधान मानतात.
प्रत्येकवर्षी साधारणत: पंधरा लाख अभियंते शिक्षण घेऊन बाहेर पडतात मात्र त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. यामागे अनेक कारणं आहेत.
भारतामधील इंजिनिअरिंगच्या करिअरमधील संधी मुख्यत्वे मोठ्या शहरांच्या आसपास आहेत. त्यातही मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद या महानगरांच्या आसपास त्या एकवटलेल्या आहेत. मात्र वर्ग तीनमध्ये असणाऱ्या शहरांमधील विद्यार्थ्यांना मात्र या संधी मिळत नाहीत. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रमही काळानुरुप बदलत नसल्याचे मत तर मुलंच काही अनेक अभ्यासकही वारंवार उघड सांगतात. नोकरीसाठी आवश्यक असणारी विषयातील कौशल्ये आणि संवाद कौशल्ये या विद्यार्थ्यांकडे नसल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे या महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे शिक्षकही बदलत्या गरजांनुसार आणि काळानुरुप बदलणाऱ्या विषयाचा अंदाज घेऊन शिकवणारे नसतात. 
बहुतांश शिक्षक हे अभियांत्रिकी विषयांची आवड म्हणून अध्यापनासाठी येण्याऐवजी केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून याकडे पाहतात. त्यातले काहीतर पास आऊट होताच फर्स्ट इयरच्या मुलांना शिकवायला हजर होतात.
दरवर्षी लाखो विद्यार्थी अभियंते होता, पदवी घेतात आणि बाहेर पडतात. पण बाहेर पडल्यावर नोकरीच्या आपल्याकडून वेगळ््याच अपेक्षा असल्याचे त्यांच्या लक्षात येते. त्यातील काही मुले मुलाखतीच्याच पातळीवर बाजूला पडतात. तर काही मुलांना नोकरीमध्ये अडथळ््यांचा सामना करावा लागतो. 
आपल्या महाविद्यालयांमध्ये अध्यापनाबरोबर नवोन्मेषी शिक्षण आणि संशोदनाकडे लक्ष पुरवले जात नसल्याचे मत अभ्यासक नेहमीच व्यक्त करतात. काही महिन्यांपुर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतात संशोधनाला कमी वाव मिळतो यावर चिंता व्यक्त केली होती, यावर बोलताना ते म्हणाले होते, आपल्याकडे संशोधन कमी का होते? तर आपल्याकडे प्रश्न विचारण्यास परवानगी दिली जात नाही, मुलांच्या मनातील चौकसबुद्धीला संधी दिली जात नाही. जर एखाद्याने तरीही प्रश्न विचारलाच तर त्याला वर्गात खाली बसायला सांगितले जाते. हे होता कामा नये, त्यांच्या जिज्ञासेला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडलेले मत खरोखर अभियांत्रिकीसह सर्वच महाविद्यालयांनी विचारात घ्यायला हवेत.
संवाद कौशल्य आणि इंग्लिश
बहुतांशवेळा अभियांत्रिकीचे ज्ञान चांगले असले तरी भारतीय मुले संवादकौशल्य आणि इंग्लिश बोलण्यामध्ये मागे पडतात. इंग्लिशची भीती आणि संवादकौशल्यांचा अभाव त्यांच्या नोकऱ्यांवर परीणाम करतात. आजकाल सर्व कंपन्यांचे संबंध परदेशातील ग्राहकांशी असल्यामुळे आणि सर्व कामकाज इंग्लिश किंवा इतर परदेशी भाषांमधून होत असल्यामुळे इंग्लिश येणे क्रमप्राप्त आहे. दुर्देवाने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. बरेचसे बुद्धीमान विद्यार्थी यामुळे मागे राहतात व चांगल्या संधी त्यांच्यापासून हिरावून घेतल्या जातात.

 

Web Title: Why do not you get a job as an engineer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.