माझ्याशीच असं का वागतात लोकं? हा प्रश्न तुम्हाला छळतो का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 02:23 PM2017-10-04T14:23:09+5:302017-10-05T08:54:02+5:30

‘ते’ काय म्हणतील? काय सांगतील इतरांना? माझ्याविषयी गॉसिप करतील? घेणारच नाही का त्यांच्यात? मुळात माझ्याशीच लोकं असं का वागतात? बरे असतात; पण मधूनच तोंड फिरवतात, ना बोलती होतात. असं का होतं नेहमी?

Why do people like me? Does this question tease you? | माझ्याशीच असं का वागतात लोकं? हा प्रश्न तुम्हाला छळतो का

माझ्याशीच असं का वागतात लोकं? हा प्रश्न तुम्हाला छळतो का

Next

- प्राची पाठक

‘ते’ काय म्हणतील? काय सांगतील इतरांना? माझ्याविषयी गॉसिप करतील? घेणारच नाही का त्यांच्यात? मुळात माझ्याशीच लोकं असं का वागतात? बरे असतात; पण मधूनच तोंड फिरवतात, ना बोलती होतात. असं का होतं नेहमी? माझ्याच वाट्याला का हा वैताग? -हे सारे प्रश्न छळतात तुम्हाला? या प्रश्नांनी मनातल्या मनात भळभळणा-या जखमांनी किती टोल वसूल केला तुमच्याकडून मोजलाय कधी?


‘मी हे केलं तर तो काय म्हणेल?’

‘मी असे वागलो तर त्यांना आवडणार नाही!’

‘त्यांनी मला काढून टाकले तर..’

‘आताच तर मिळालीय नोकरी, ती हातची गेली तर..’

‘मला त्यांच्या ग्रुपमध्ये घेतील का?’

‘त्यांच्यात का नाही घेत मला? माझ्यात काय कमी आहे?’

‘सगळ्यांसमोर कुणी मला बोललं तर?’

‘कोणी मला नावं ठेवली तर?’

‘ते माझ्या नावानं सतत गॉसिप करतात.. कायम..’
***
ही वाक्यं काय आहेत?
यापैकी एकतरी वाक्य कधी ना कधी आपल्या मनात येऊन गेलेलं असतंच.
अशा प्रकारच्या अनेक शंका-कुशंका आपल्या मनात असतात. साधं उदाहरण घ्या - फेसबुकवर कालपर्यंत आपल्याशी चांगलं हसत-खेळत बोलणारा माणूस एकदम गायब झाला, की आपण त्याला शोधतो. मध्येच कुठेतरी त्याची कमेंट दिसते किंवा इतरांशी तो बोलतोय असं दिसतं; पण आपल्याशी बोलत नाहीये. रिप्लाय करत नाहीये. म्हणजे एकतर त्यानं आपल्याला काढून टाकलं त्याच्या फ्रेण्ड्स यादीतून किंवा ब्लॉक तर केलं नाही, असं येतंच आपल्या मनात. वरवर आपण कितीही म्हणालो, ‘काय फरक पडतो. तरी मनात येतंच. का काढलं असावं आपल्याला? असं काय केलं आपण? काय बिनसलं त्याचं? आपली प्रत्यक्ष ओळख असली तर वेगळे प्रश्न मनात येतात. नसली, म्हणजे फक्त फेसबुक ओळख असली तर वेगळे प्रश्न मेंदू कुरतडतात. खरं तर अशा स्वरूपाच्या व्हर्च्युअल मैत्रीतदेखील कोणी आपल्याला नाकारणं, कुठून तरी काढून टाकणं, कुणी तोंडावर किंवा आपल्या पाठीमागे आपल्याला नावं ठेवणं हे आपल्याला धाकात ठेवत असतं. मन खात असतं. आतून आत पोखरून टाकतं. आपल्याच मनाला एक चाळा लागून जातो, उत्तर शोधायचा! आज, आता, ताबडतोब ते उत्तर मिळालंच पाहिजे, अशी ती अगतिकता असते. का केलं कुणी असं? आपण तर्क लढवत बसतोे; पण शेवटी ती आपली बाजू आणि आपलं आकलन असतं. तेच खरे असेल की नाही, आपल्याला कळत नसतं. कोणी आपल्याला नाकारू नाही याच काळजीत आपण सतत सावध असतो. कोणाला काय वाटेल आणि ते आपल्याला सोडून जातील का, काढून टाकतील का, चिडतील का?...
असे हजारो प्रश्न डोकं कुरतडत राहतात.
आपण कुठे रस्त्याने चालत जातोय आणि अचानक कोणी आपल्या अंगावर येतंय असं वाटलं तर त्या प्रकारच्या सूचना आपला मेंदू चटकन बाजूला होण्यासाठी, दुखापत टाळण्यासाठी देतो, तशाच काहीशा घटना कोणी आपल्याला नाकारत असेल, टाळत असेल, तर ते होऊ नये यासाठी आपल्या आत घडत असतात. सब केमिकल गडबड हो जाता हैं रे। कधी आपण हल्ला परतून लावतो. पण या नाकारलं जाण्याबाबत तर आपण आधीपासूनच असं काही आपल्या सोबत होऊच नाही, याबाबत मनातून कुठेतरी सतत दक्ष असतो.
एरव्ही इतर काही आपल्याला आठवो न आठवो, आपण फार चिंता करत बसत नाही; पण कोणी आपल्याला कसंकसं नाकारलं आहे, टाळलं आहे, पॉलिसी आखून वागलं आहे, ते मात्र असलेल्या-नसलेल्या सगळ्या बरकाव्यांसकट आपण नीटच लक्षात ठेवतो. कुठले कुठले तपशील कळत नकळत शोधत राहतो. त्याच त्या विचारांत गुंतून पडतो. भळभळून येतात अगदी आठवणी. बदला घ्यावासा वाटतो. हिंसा करावीशी वाटते. मनातच खूप आंदोलनं सुरू असतात. त्या आंदोलनांमध्ये आपली काळजी घेणारं कोणी अध्येमध्ये आलं तर आपण मनातला इतरच कोणावरचा राग या चांगल्या व्यक्तीवर काढतो. या प्रकारात ज्यांनी आपल्याला नाकारलं ते त्यांचं आयुष्य जगत राहतात. पण जे आपल्यासोबत आहेत त्यांना मात्र त्या निघून गेलेल्या लोकांनी आपल्या मनाचं जे नुकसान करून ठेवलेलं असतं त्याचा नाहक फटका बसतो. असंच सुरू राहिलं तर मग तेही दूर जाऊ लागतात. हे चक्र असंच फिरत राहतं.

आपली टेप मात्र मला का नाकारलं, माझ्याशीच लोक असं का वागतात, यावरच अडलेली असते. पुन्हा पुन्हा वाजत राहते. मन उदास करते. कधी बंड पुकारावं, जाऊन जाब विचारावा, उत्तर तरी मिळालं पाहिजे, असं खूप वाटत राहतं. एखाद्या गोष्टीने शरीराला ईजा झाली तर जितका त्रास होतो, तसाच हा मनाला आणि परिणामी शरीराला होणारा त्रास असतो. म्हणूनच आपण कायम नाकारलं जाण्याबद्दल सावध असतो. पण आपल्याला काहीही वाटो, जे घडतं ते वेगळं असतं. आपल्याला जे वाटतं तेच होतं असं नाही. मग मनातल्या मनात आपण जीवघेण्या जखमेच्या टोलची एक पावती फाडतो. नकाराशी झुंजत राहतो. शरीराची जखम तरी बरी होते, विसरली जाते. कोणी आपल्याला टाळून निघून गेलं ही मनाची जखम मात्र सहज भरत नाही. ती सतत चिकित्सा करत राहते, आठवणीला खत पाणी घालत राहते. प्रत्यक्ष आयुष्यात कितीही बिझी असलो तरी मनाच्या कोपºयात ती भावना तळ ठोकून बसलेली असते. जाता जात नाही. जरा वेळ मिळाला, जुनं काही आठवलं, आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसारखं कोणी समोर आलं तशी त्या व्यक्तीची कोणतीही वस्तू दिसली, मिळती-जुळती घटना घडली तर ही भावना आक्र ाळविक्र ाळ रुप घेऊन परत आपल्याला पछाडून टाकते. कितीही दूर पळा, ती आपल्याला गाठतेच. आपलं वर्तमान आणि भविष्य दोन्ही उधळून लावू शकेल इतकी ताकद तिच्यात असते. तिच्याशी वेळीच दोन हात करावे लागतात. मन ताळ्यावर आणावं लागतं.
हे सारं आपल्याला कळतंही; पण वळत नाही.
जमत नाही, हे कसं करायचं ते
पण करावं तर लागेलच, ते कसं करायचं?
त्याविषयी बोलू पुढच्या गुरुवारी..

 

Web Title: Why do people like me? Does this question tease you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.