कशाला फॉरवर्ड मारता?
By admin | Published: November 10, 2016 01:49 PM2016-11-10T13:49:59+5:302016-11-10T13:49:59+5:30
..प्लीज फॉरवर्ड. हे वाक्य तसं आता अनोळखी नाही. कारण आजकाल सोशल मीडिया वापरत असताना या पेजवरून त्या पेजवर किंवा दुसऱ्या ग्रुपवर अविरतपणे ‘फॉरवर्ड’ करत असतो
- अजिंक्य अंकुश जाधव
..प्लीज फॉरवर्ड.
हे वाक्य तसं आता अनोळखी नाही. कारण आजकाल सोशल मीडिया वापरत असताना या पेजवरून त्या पेजवर किंवा दुसऱ्या ग्रुपवर अविरतपणे ‘फॉरवर्ड’ करत असतो. पण आता मात्र या वाक्याचा दिवसेंदिवस त्रास होत चाललाय. कारण आजकाल समाजविघातक तरुणांची डोकी कशी तापतील, भडकतील या उद्देशाने असे फॉरवर्ड फिरवत राहतात.
आणि बऱ्याचदा आमची हुशार तरु ण मंडळी विचार न करता असे फॉरवर्ड पुढे ढकलत राहते. आजच्या ज्या माझ्या तरुण मित्रांना पुस्तकं, इतिहास किंवा आपल्या भारताची राजकीय परिस्थिती वाचून समजणार नाही तितकी ती एका फॉरवर्डमधून समजते. ज्यांना देशाच्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ठीक अशी माहितीही नाही ते माझे १९-२० वर्षांचे मित्र अशा फॉरवर्डच्या आधारे देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना दिसतात. बऱ्याचदा त्यात धार्मिक वादाचेदेखील विषय असतात. ‘प्रत्येक धर्म तुम्ही आधी चांगला माणूस बना, माणुसकीनं वागा’ असं सांगत असतो. पण आजच्या पिढीला मात्र स्वत:चा धर्म मोठा दाखवताना दुसऱ्या धर्माचे दोष दाखवणारे फॉरवर्ड पुढे ढकलायचे असतात. आपल्याला कुणीतरी ही ढकलगाडी ढकलायला भाग पाडतंय, हे मात्र ते विसरतात.
फार फार वरवरची माहिती वाचून हे दोस्त राजकीय विश्लेषक बनतात आणि चर्चा करत वाद घालतात.
म्हणून मला वाटतं मित्रांनो, काहीही फॉरवर्ड करण्याआधी काही सेकंद थांबा. जे वाचलं त्याचा विचार करा आणि विचारा स्वत:ला की, हे फॉरवर्ड करून मी चूक तर करत नाही ना? आणि मगच फॉरवर्ड करा.
कुडाळ, सिंधुदुर्ग