मरून जावंसं का वाटतं?
By Admin | Published: October 9, 2014 06:42 PM2014-10-09T18:42:07+5:302014-10-09T18:42:07+5:30
स्ट्रेस, प्रेमभंग आणि डिप्रेशन या तीन कारणांमुळे आजही तरुण मुलं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करतात. परिस्थितीशी ‘कोप-अप’ न करता आल्यानं स्वत:च्या जिवावर उठतात.
>सगळे मित्र मित्र ट्रेकला गेलेले असतात.
त्यातलाच एक रोहित. उंच कड्यावर पोहोचताच म्हणाला, ‘मला वाटतं यार, फेकून द्यावं स्वत:ला याक्षणी इथून.’
सगळे हसले त्याला. तो विषय संपला तिथेच. एकदा ट्रेनने जाताना एक बोगदा लागला. काळोख्या बोगद्यात दाराजवळ उभा रोहित, मित्राला म्हणाला देऊ का रे फेकून स्वत:ला या अंधारात, धावत्या ट्रेनमधून.
पागल आहेस का, असं म्हणत मित्रानं तो विषय तिथंच संपवला.
रोहित अधनंमधनं मित्रांना म्हणायचा, मला बैचेन होतं, काहीच करावं वाटतं नाही, मरून जावंसं वाटतं.
मी आत्महत्त्याच करीन एक दिवस.
पण कुणी त्याला गांभीर्यानं कधी घेतलं नाही. कधीतरी समजावलं, दटावलं असेल की असं काय अभद्र बोलतोस. पण तेवढंच. आणि एक दिवस. रोहितनं खरंच घरातल्या पंख्याला स्वत:ला लटकावून घेतलं. चिठ्ठी सापडली, मला मरावंसं वाटत होतं, मेलो. बाकी काही नाही, मी कुणालाही दोष देत नाही. सगळी माणसं खूप रडली, पस्तावली. तो नेहमी मरून जावंसं वाटतंय म्हणायचा, पण कुणी सिरीयस्ली घेतलं नाही.
असं का व्हावं? का त्यानं आत्महत्त्या केली.? मित्रांनी शोधलं तर कळलं की, त्याच्या घरात मागच्या दोन पिढय़ातही तीन आत्महत्त्या झाल्या होत्या.
ही टेंडन्सी होती का.? तो डिप्रेशनमध्ये होता का?
का केलं रोहितनं असं?
आणि मित्रांनी त्याचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं असतं तर तो वाचला असता का.?
रोहित सांगत होता तसं अनेकजण आपल्या मनातलं मित्रांशी बोलतात. पण मग मित्र वेळीच ‘ते बोलणं’ गांभीर्यानं का घेत नाहीत?
अनिकेत. दहावी-बारावीत बोर्डात आला होता. मग इंजिनिअरिंग केलं. अमेरिकेत गेला. तिथं पीएच.डी. केलं. परत आला. घरचे लग्नाचं पाहू लागले. नोकरीही होतीच.
पण एकदिवस त्यानं आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. घरातलं फिनेल पिऊन.
सुदैवानं वाचला.
खूप कौन्सिलिंग केल्यावर त्यानं सांगितलं की, मी कायम यशस्वी झालो. मी कायम परफॉर्मर. कायम यशच पाहिलं.
पण मला नव्या कंपनीत जमवून घेता येत नव्हतं. मला त्या वातावरणाचा काही अंदाज येईना. मी मागे पडतोय, अपयशी होतोय या भावनेशी ‘कोप-अप’च करता येईना.
तो स्ट्रेस वाढला. आणि मग ठरवलं, अपमानित होऊन जगण्यापेक्षा.
मरून जावं!
हा असा कामाचा, परफॉर्मन्सचा, डेडलाईनचा, व्यावसायिक स्पर्धेचा आणि त्या स्पर्धेत टिकण्याचा प्रचंड स्ट्रेस अनेकांना येतो. पण त्यावर, स्वत:ला संपवणं, हा उपाय कसा असेल?
आजकालची मुलं काय आज प्रेमात पडतात, उद्या ब्रेकप.परवा परत तेच. मग नवं अफेअर.
पूर्वीसारखं प्रेमात उद्ध्वस्त कोण होतं.? पण ते खरं कुठंय? निता. आदित्यच्या प्रेमात होती.
पण घरच्या विरोधापुढे आदित्य नमला आणि निताला त्यानं सांगून टाकलं की, आपलं नातं तुटलं.
निता खूप दिवस शांत, अबोल होती.घरच्यांना वाटलं, सावरेल ती हळूहळू. एक दिवस मात्र तिनं झोपेच्या खूप गोळ्या खाल्ल्या. आणि संपवलं स्वत:ला.
प्रेमभंगातून आजही असे सुसाईडचे अँटॅम्प्ट अनेकजण करतात.खरंच एक प्रेम असं आयुष्य उदध्वस्त करू शकतं.? आणि संपवू शकतं. तसं असेल तर ते थांबवायला हवं.!
स्वत:चा जीव कशानं घेतात?
आपल्याकडे म्हणजे भारतातच नाहीतर संपूर्ण दक्षिण आशियातच तरुण मुलांच्या आत्महत्त्येचा दर अधिक आहेत.
आणि स्वत:ला संपवण्यासाठी अनेकजण घरातली किटकनाशकं, टॉयलेट वॉशर वापरतात.
अनेकजण फाशी तरी लावून घेतात आणि काहीजण झोपेच्या गोळ्या घेतात. आजारी असतील तर आपल्या सगळ्या औषधांचा डोस एकदमच घेऊन टाकतात.
घरात तरुण मुलं अस्वस्थ असतील तर हे सारं त्यांच्या हाताशी लागणार नाही, असं लपवून ठेवायला हवं असं जागतिक आरोग्य संघटनेचा रिपोर्ट म्हणतो.
ह्या लेखातील कहाण्या पूर्ण सत्य. फक्तगोपनीयतेसाठी नावं बदललेली आहेत.