ग्वाटेमालामधील तरुण We are fed up  असं का म्हणताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:55 AM2020-12-24T07:55:14+5:302020-12-24T08:00:17+5:30

ग्वाटेमालामध्ये तरुण मुलं-मुली रस्त्यावर उतरली आहेत आणि सत्तेला उघड सांगताहेत की, आता बास, पुरे झाला तुमचा धिंगाणा!

Why do young people in Guatemala say We are fed up? | ग्वाटेमालामधील तरुण We are fed up  असं का म्हणताय?

ग्वाटेमालामधील तरुण We are fed up  असं का म्हणताय?

Next

-कलीम अजीम

ग्वाटेमालामध्ये राजकीय सुधारणेसाठी व्यापक जनचळवळ सुरू आहे. वाढता भ्रष्टाचार आणि रेप कल्चरचा विरोध, महिलांची सुरक्षा आणि अर्थसंकल्पात सामान्य माणसाचं हित पाहा, अशा मागण्यांसाठी निदर्शने सुरू आहेत. गेल्या सहा आठवड्यांपासून ग्वाटेमाला सिटीमधील राष्ट्रपती भवनासमोर तरुण साखळी निदर्शनं करत आहेत. आंदोलक राष्ट्राध्यक्ष अलेजान्ड्रो गियामाट्टेई यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. गुन्हेगारी कायदा दुरुस्त करावा, महिलांची लैंगिक हिंसा रोखावी; शिवाय राजकीय व प्रशासकीय कारभारात रचनात्मक बदल करण्याचा त्यांनी आग्रह धरला आहे.

विद्यार्थी, तरुण, स्त्रीवादी व मानवी हक्क संघटना सारे एकत्र येत प्रतीकात्मक व सांकेतिक मोर्चे-निदर्शने करून आपल्या मूलभूत हक्काची मागणी करत आहेत.

ग्वाटेमाला सरकारने २१ नोव्हेंबरला अर्थसंकल्प २०२१ मंजूर केला. त्यात सरकारी अधिकारी व नेत्यांसाठी विशेष आर्थिक तरतूद होती, तर मानवाधिकार संस्था, आरोग्य सेवा, शिक्षण आणि न्याय व्यवस्थेसाठी निधी कमी करण्यात आला. सामान्य नागरिकांचे हक्क डावलून लोकप्रतिनिधींना अनेक सवलती प्रदान करण्यात आल्या होत्या. देशात या सरकारी धोरणाविरोधात व्यापक निदर्शनं सुरू झाली. २२ नोंव्हेबरला २००० तरुणांनी राष्ट्रपती भवनला घेराव घातला. दुसरीकडे राजधानी ग्वाटेमाला सिटीच्या रस्त्यावर तरुणांचे लोंढे उतरले. बघता बघता संतप्त जमावाने सरकारी मालमत्तेची जाळपोळ, नासधूस सुरू केली. विद्यार्थ्यांच्या एका गटाने मोर्चाच्या वेळी काँग्रेसच्या इमारतीचा भाग पेटवून दिला.

एकीकडे कोरोना लॉकडाऊन, आर्थिक मंदी यात तरुणांच्या हाताला काम नाही. ते अस्वस्थ हाेतेच. ते रस्त्यावर उतरले. पाच-सहा दिवस ग्वाटेमाला सिटीमध्ये हा संघर्ष सुरू होता. जनतेचा रोष व आक्रोष पाहता सरकारने वादग्रस्त अर्थसंकल्पच रद्द केला. सरकार नमू शकतं, हे लक्षात आलं आणि आंदोलन अधिक उग्र झालं.

महिला आणि तरुणीही सहा आठवड्यांपासून आंदोलनं करत आहेत. ‘We are fed up’ अर्थात ‘आम्ही वैतागलो आहोत’ अशी घोषणा देणारे आंदोलक राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा द्यावा म्हणून हटून बसले आहेत.

५ डिसेंबरला ग्वाटेमाला सिटीत स्त्रीवादी संघटना, एलजीबीटी समुदाय, महिला व मुलींनी रेप कल्चरविरोधात मोर्चा काढला. लैंगिक हिंसेला रोखा आणि सुरक्षा पुरवा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. या प्रतीकात्मक मोर्चाची थीम ‘Virgin of the Struggle’ अशी होती. मोर्चात सामील झालेली क्रिस्टिना वलेन्झुएला हिने लक्षवेधी पेहराव केला होता. भ्रष्टाचाराविरुद्ध झालेल्या मागच्या निषेध मोर्चात तिने मुलींचे नेतृत्व केले होते. सरकारविरोधी संघर्षाचा आयकॉनिक चेहरा झालेल्या क्रिस्टिनाने या मोर्चात हिरवा बुरखा, निळा मुखवटा आणि केशरी शाल परिधान केली होती.

 

तिच्या हातात असलेल्या निषेधाच्या प्लेकार्डवर चिकटविलेल्या छोट्या कपड्याच्या बाहुल्या लक्ष वेधून घेत होत्या. तरुण मुली आयकॉन झालेल्या या चळवळीची घोषणा “A Rapist in Your Path” अशी आहे.

मीडिया रिपोर्टचा आधार घेतल्यास असे दिसते की, ग्वाटेमालामध्ये स्त्रियांना सतत भेदभावाचा सामना करावा लागतो. वंशविद्वेषाचा विकृत हिंसाचार इथंही जगणं भयाण करत आहे. अर्थसंकल्पाचं निमित्त झालं, आता मूलभूत राजकीय सुधारणांसाठी इथं तरुण मुलं-मुली आग्रही झाली आहेत. दर शनिवारी ग्वाटेमालामध्ये होणाऱ्या या सांकेतिक प्रोटेस्टची धार वाढते आहे. नव्या वर्षी ही चळवळ आणखी जोर धरेल, अशी शक्यता आहे.

(कलीम मुक्त पत्रकार आहे)

kalimazim2@gmail.com

Web Title: Why do young people in Guatemala say We are fed up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.