तरुणांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:55 AM2021-01-28T07:55:24+5:302021-01-28T08:00:22+5:30

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील ऋतुराज देशमुख वयाच्या २१ व्या वर्षी त्यानं स्वत:सह गावात पॅनल निवडून आणलं.तो विचारतो, हातावर हात ठेवून किती दिवस बसायचं?

Why do young people just pick up satranjya? | तरुणांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?

तरुणांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?

Next

-समीर इनामदार

तरुण पोरांनी नुसतंच किती दिवस सतरंज्या उचलायच्या? नुसतं फेसबुक, व्हॉट्‌स ॲपवर लिहून उपयोग होत नसतो, थेट मैदानात उतरून सत्ता मिळवायला हवी.. विकास आपल्याला पाहिजे तर आपण कष्ट करू, आपण पुढं होऊन काम करू..

- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाचा ऋतुराज रवींद्र देशमुख सांगत असतो. वय २१ वर्षे.

त्याच्या गावात गेल्यावर लक्षात येतं की तो जे काही गावच्या विकासाचं स्वप्न, त्याच्या दोस्तांना सोबत घेऊन पाहतोय ते बोलण्याइतकं सोपं काम नाही. त्याच्या गावाला ना रस्ता आहे ना प्यायला पाणी. नदी गावाजवळून गेली असली तरी आयाबाया डोक्यावर हंडा घेऊन पाण्याला जातात.

ऋतुराज म्हणतो, या साऱ्याची मला चीड आली. इलेक्शन लागलं तसं ठरवलं की, आपण लढायचं. किती दिवस नुसतं हातावर हात ठेवून बसून राहायाचं? वारंवार सांगूनही काही होत नसेल तर ही सिस्टिम बदलली पाहिजे. त्यासाठी आपण निवडणूक लढविली पाहिजे.

मग त्यानं त्यानं नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनेते बाबुराव पाटील पॅनल उभं केलं. सात सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीत पाच सदस्य निवडून आले आहेत. आता सत्ता त्यांचीच. या तरुण मुलानं आपला प्रचार प्रत्यक्ष केला तसा सोशल मीडियाचा वापर करूनही केला. वचननामा तयार केला तो गावकऱ्यांना दिला. गावच्या लोकांनीही या तरुण पोरांवर विश्वास टाकत, त्यांना निवडून दिलं.

ऋतुराजला तर म्हटलं तू निवडून तर आलास, तुझं पॅनलही जिंकलं, आता पुढं काय?

तो सांगतो, ‘आता गाव बदलायचं. एकदम पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडीसारखं. गावात दुधाचा मुख्य व्यवसाय. शेतीसोबत लोक दुधाचा धंदा करतात. गावात ४५०० लीटर दूध तयार होतं. हे सारं गृहित धरून गावाला मुख्य प्रवाहात आणायचंय. गावाला चांगले रस्ते असले पाहिजेत, वृद्ध, महिलांना डोक्यावर पाणी आणायाला नको यासाठी पाण्याची टाकी बांधायची, गावात कचरा व्यवस्थापन झालं पाहिजे, पाण्याचा ऑडिट झालं पाहिजे.’

बी.एस्सी. केल्यानंतर पुण्यात विधी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या ऋतुराजला आता सरपंच होण्याची इच्छा आहे. २७ जानेवारीला सरपंचपदाचं आरक्षण जाहीर होईल, तेव्हा कळेल तो सरपंच होतो किंवा नाही.

मात्र निवडून येण्याइतपत विश्वास त्यानं कमावला. तो सांगतोच,

एखादी गोष्ट आवडली नाही तर ती बदलण्यासाठी स्वत: पुढे आले पाहिजे. दुसरं कुणी येईल आणि आपलं भवितव्य बदलेल असं असणार नाही. त्यासाठी स्वत:च व्यवस्थेत उतरु, व्यवस्था बदलू, काम करू!

 

( समीर लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहे.)

joyasam@gmail.com

Web Title: Why do young people just pick up satranjya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.