फॉरवर्ड मेसेजच्या ढकलगाडीत आपल्या कुणाशी बोलायचं राहून गेलंय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:38 PM2019-11-01T12:38:34+5:302019-11-01T12:38:41+5:30
एखादा दुरावलेला जीव, एखादा आपला दोस्त, नातेवाइक यांना मनापासून माफी मागण्याचा, सॉरी म्हणण्याचा एकतरी मेसेज केला का आपण या दिवाळीत?
-ऑक्सिजन टीम
मुन्नाभाई सिनेमा पाहिलाय ना, त्यात मुन्ना सर्किटवर हात उचलतो आणि मग माफी मागतो.
किंवा त्या सुरक्षारक्षकाला मारतो आणि म्हणतो, ऊठ रे अपुन को तेरे को सॉरी बोलने का है!
हे असं सॉरी म्हणणं इतकं अवघड असतं का? नात्यातही, दोस्तीतही आणि आपल्याला आपल्याशीही? आपल्यातले अनेक मुन्ना-सर्किट दोस्तीपेक्षा मनात अढी धरून बसतात आणि कधीच एकमेकांना सॉरी म्हणत नाहीत.
आपण एवढे फॉरवर्ड मेसेज पाठवले दिवाळीत, दिवे उजळो, काजळी हटोवाले.
पण एखादा दुरावलेला जीव, एखादा आपला दोस्त, नातेवाइक यांना मनापासून माफी मागण्याचा, सॉरी म्हणण्याचा एकतरी मेसेज केला का आपण या दिवाळीत?
मग कसं काय म्हणायचं की दिवाळीतली काजळी झटकली म्हणून आणि स्वच्छ झालं मन म्हणून तरी.
खरंच इतकं अवघड असतं सॉरी म्हणणं.?
माझं चुकलं, मला माफ कर. पुन्हा असा गाढवपणा करणार नाही, असं कान पकडून सांगणं.? आपली चूक मान्य करणं.?
आणि कुणी माफी मागतच असेल तर त्याला चटकन माफ करून टाकणं.
-अवघड नसतं खरं तर पण आड येतो आपला इगो. तो भिंतीसारखा आडवा येतो आणि मग म्हणत बसावं लागतं की, ये दिवार टुटती क्यों नही.
दिवाळी सरली असली तरी अजून देवदिवाळी बाकी आहे.
त्यामुळे फक्त एक फोन.
एक एसएमएस.
एकदा म्हणता येईल सॉरी.?
आणि करता येईल मनावरचा ताण हलका.?
ट्राय इट!