का लिहायचं पण..

By admin | Published: March 10, 2017 01:09 PM2017-03-10T13:09:16+5:302017-03-10T13:09:16+5:30

आज कितीतरी दिवसांनी असं पेनाने कागदावर लिहायला घेतलंय. नाहीतर लॅपटॉप-कीबोर्डचीच सवय झालीय आजकाल. माझंच आहे ना हे अक्षर? किती वेगळं वाटतंय-खूप दिवसांनी पाहतोय म्हणून कदाचित.

Why write it? | का लिहायचं पण..

का लिहायचं पण..

Next
>प्रसाद सांडभोर
 
आज कितीतरी दिवसांनी असं पेनाने कागदावर लिहायला घेतलंय. नाहीतर लॅपटॉप-कीबोर्डचीच सवय झालीय आजकाल. माझंच आहे ना हे अक्षर? किती वेगळं वाटतंय-खूप दिवसांनी पाहतोय म्हणून कदाचित. पण बरंच बरं झालंय आता. शाळेत असतानाचं अक्षर किती वेगळं होतं-वेळेसोबत, माझ्यासोबत अक्षरदेखील वाढलंय, बदललंय. हो. तरमाडेबाई काय बरं म्हणतील हे अक्षर पाहून? शाळेत असताना दररोज शुद्धलेखन करून घ्यायच्या-‘त’ चा दांडा नीट खालपर्यंत आलाच पाहिजे-‘न’ च्या टोकातला गोल गोल असला पाहिजे- ‘य’ ‘य’सारखा दिसायला हवा-‘प’सारखा नको. ‘प’ वेगळा असतो आणि ‘म’ वेगळा आणि हा ‘स’-असा हवा... अक्षराला नीट वळण लागावं म्हणून रेषांचं कुंपण - आधी चार-मग दोन आणि अखेर एका रेषेचं... रेषेला लागूनच लिहायचं, का बरं असा अट्टाहास? आजकाल तर मला रेषांची प्रचंड चीड येते. मला नाही आवडत दुसऱ्या कुणीतरी आखलेल्या रेषांतून लिहायला-अगदी अडकल्यागत वाटतं-दोन भिंतींमध्ये कोंडल्यासारखं. असा बिनरेषांचा कोरा सपाट कागद छान वाटतो. मोकळा वाटतो. चांगलं अक्षर काढण्याचे नियम नुसत्या अक्षरांपुरतेच मर्यादित नाहीत हं! अक्षरं जोडून बनणार शब्द आणि शब्दांची वाक्य. एका वाक्यातल्या सर्व शब्दांदरम्यान समान अंतर हवं. फार जास्तही नको आणि फार कमीदेखील नको. शब्दांच्या डोक्यावर रेष हवी. ती शब्दाच्या थोडी आधी सुरू व्हावी आणि थोडी नंतर संपावी. सगळं कसं नीटनेटकं हवं. दुसरऱ्या कोणाला वाचता आलं पाहिजे की नाही? का बरं? दुसऱ्यांनी वाचावं म्हणून नाही लिहायचं मला. ठीकय, दुसऱ्यांचा विचार नको करूस. पण उद्या तुझं तुला तर वाचता यायला हवं ना काय लिहिलंयस ते? उद्या वाचायचं म्हणून आज लिहू होय मी? कशाला ते? मला आत्ता लिहायचंय म्हणून लिहितोय मी - उद्याचं उद्या-नंतरचं नंतर-आत्ताचं-आत्ता. 

Web Title: Why write it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.