कसलं बोअर होतंय यार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 06:00 AM2019-08-15T06:00:00+5:302019-08-15T06:00:07+5:30

तसं बरं चाललंय की तरुण मुलामुलींचं? पण त्यांना भेटा, ते सांगतात, ‘काय विशेष नाही. तेच आपलं रूटीन. सगळं बोअरिंग, वाटतं द्यावं सगळं सोडून, आणि जावं पळून.!’ का होतंय ऐन तारुण्यात असं आपलं?

why youngsters are exhaust & running away from life? | कसलं बोअर होतंय यार?

कसलं बोअर होतंय यार?

Next
ठळक मुद्देतरुण मुलामुलींशी बोलून घेतलेला हा वेध. तरुण जगण्यात काय बोअर होतंय, हे शोधणारा खास रिपोर्ताज.

- राहुल गायकवाड 

मग, काय चाललंय तुझं सध्या.? 
काही नाही रे. तेच आपलं रूटीन दुसरं काय.?
सगळं बोअरिंग..
हा संवाद शहरांमधल्या, गावांमधल्या नाक्यानाक्यांवर मित्रांच्या ग्रुपमध्ये कानावर पडतो. रूटीन, बोअरिंग या भावना आता दैनंदिन आयुष्याच्या भाग झाल्या आहेत. रूटीन सुरू आहे म्हणून बोअर होतंय की बोअर होतंय म्हणून रूटीन चालू असल्यासारखं वाटतंय, या प्रश्नात अनेक तरु ण अडकून पडलेत. 
पण खरंच सगळ्यांच्या आयुष्यात ‘रूटीन’ सुरू आहे का?
कामात काही मजा नाही रे.. तेच तेच काम करून आता कंटाळा आलाय, सगळं सोडून द्यायचंय पण कळत नाहीये काय करावं?
ही वाक्यंही सतत कानी येतात. सोडून द्यायचं म्हणणारे अनेकजण; पण सोडत कुणी काहीच नाही, तेच ये रे माझ्या मागल्या सुरू. 
आज बहुतांश तरुणाईची हीच स्थिती आहे. मी किती जणांशी, मित्र-मैत्रिणींशी या संदर्भात बोललो. त्यांना पुन्हा पुन्हा काही प्रश्न विचारले. त्यातून लक्षात एवढंच आलं की, अनेकांना त्यांच्या कामात मजा वाटत नाही, तर इतरांना ते 9 ते 6 चे गुलाम झाल्यासारखं वाटतंय. प्रत्येकाला स्पेस हवी आहे. आणि त्या स्पेसमध्ये काहीतरी भरण्यासाठीही हवं आहे; पण म्हणजे नेमकं काय हवंय हे कळत नाही. 9 ते 6 रूटीनमधून बाहेर येऊन त्यांना त्यांचं काहीतरी करायचं आहे. परंतु मार्ग काही सापडत नाही. बरं मग दुसरं काही केलं तर करावं का तर हेही माहिती नाही. कारण पैशाच्या गरजा तर आहेतच. पण मग पैशासाठी जी नोकरी, जे 9 ते 6 चं रूटीन आपण स्वीकारलंय ते इतकं बोअर, बोगस आणि फारच रूटीन असं का वाटू लागलं आहे. नैराश्याच्या, त्यातून आत्महत्या करणार्‍यांच्या बातम्याही आताशा आम होऊ लागल्या आहेत. मग इथे प्रश्न पडतो की असं काय झालं गेल्या काही वर्षात की तरु णाईला आयुष्यच रूटीन वाटायला लागलंय?
त्यासाठी फार नाही थोडं मागे जावं लागेल. 
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक स्टेटस वाचलं होतं.
1985 ते 1996 या काळात तरुण झालेल्या त्याकाळच्या तरुण पिढीने अनेक महत्त्वपूर्ण बदल पाहिले आहेत. म्हणजे सध्या गोल आकडे फिरवायच्या फोनपासून ते स्मार्टफोनर्पयत. घरी रिझल्ट घेऊन येणार्‍या पोस्टमनपासून ते ऑनलाइन लागणार्‍या रिझल्टर्पयत. एका मेसेजसाठी 3 रुपये मोजण्यापासून ते व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इतर सोशल माध्यमार्पयतचा बदल. आजूबाजूची परिस्थिती, साधणं बदलली की माणूसही बदलत जातो. हा बदल जितक्या झपाटय़ाने होत होता, तितकाच त्याचा परिणामदेखील इन्स्टंट होता. या जनरेशनने हे बदल पाहिल्यामुळं त्यांना त्यातील फरक माहीत आहे. त्यातला फोलपणा आता हळूहळू जाणवू लागला आहे. स्मार्टफोन, सोशल मीडिया याबाबत चिकार लेखन झालंय. त्याच्या दुष्परिणामाबाबत भरभरून लिहिलं गेलंय. पण, या सगळ्याने ते घडायचं थांबलं नाही. 
मात्र त्यानंतर आलेल्या तरुण पिढीच्या वाटय़ाला मात्र हा वेगाचा धबधबा अचानकच आला. एकदम वेगातच पोहायला शिकावं तसा. आणि मग त्या सोशल मीडियाच्या प्रपातात अडकली जणू ही तरुण पिढी. भांबावली. धास्तावली. आणि त्यात तरण्याचा प्रयत्नही करू लागली.
मग एका टप्प्यानंतर सुरू झालं बोअर होणं,आयुष्य रूटीन सुरू आहे असं अगदीच उदास वाटणं. एकीकडे तुम्ही रोज फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम यावर धडाधड सेल्फी, आनंदी क्षण, मजा, मस्ती, हॉटनेस, रॉयलनेस हे सगळं बघत असाल आणि दुसरीकडे तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते अनुभवता येत नसेल तर नैराश्य येणं तसं साहजिकच आहे. नव्हे ते येतंच.
खरं तर ही झाली एक बाजू. 
दुसरी बाजू तर वेगळीच आहे. 
जी लोकं दिवसरात्र फोटो, सेल्फी, चेक इन, आनंदी क्षणाचे फोटो, व्हिडीओ टाकतात खरं तर ते निराश नसतात असं कुणी सांगितलं?
फरक फक्त एवढा आहे की त्यांना ते त्यांच्या फोटो, सेल्फीमधून लपवता येतं. आणि प्रत्यक्षात तेही म्हणतच असतात की, काय यार, बोअर होतंय.
आता मुळात प्रश्न असा आहे की आपल्याला एवढं बोअर का होतंय?
एखादी गोष्ट करणं आणि ते करतानाच्या क्षणाचा आनंद घेणं आपण सोडून दिलंय. एकत्र आलं तरी ते सेल्फी आणि ग्रुप फोटोसाठी येणं होतं. तेवढेच आठवडाभराच्या फेसबुक पोस्ट आणि डीपी होऊन जातात. मित्रांची भेटही आता यांत्रिक झाली आहे. तिही सोशल मीडियावर दाखविण्यासाठी. ज्यावेळी मग सोशल मीडियावर दाखविण्यासारखं काही राहात नाही, तेव्हा नैराश्य घेरण्यास सुरु वात करतं. सध्या कुठल्याही शहराचा फेरफटका मारा पुस्तकांच्या दुकानात तुरळक तर कॅफेमध्ये भरमसाठ (वेटिंग करावं लागलं तरी) गर्दी दिसून येते. तिथेही अर्धावेळ हा स्क्र ोलिंगमध्येच गेलेला असतो.
त्यातून मनात जागतेय स्पर्धा.
सध्या सगळीकडे आकडय़ांचा खेळ आहे. आता काम केलं हे गुणवत्तेवर नाही, तर आकडय़ांमध्ये मोजलं जातंय. आकडे दाखवा मग ते लाइक्सचे असो किंवा प्रोफिटचे. त्याच्याशी गुणवत्तेचा संबंध नाही. कारण समोरचा सुद्धा याच चक्राचा भाग असल्यामुळे त्यालादेखील आकडय़ांशीच घेणं-देणं आहे. मग जास्तीत जास्त लाइक्स आणि  प्रोफिट मिळविण्यासाठी तुम्हाला काहीही करावं तर लागणारच ना.. आणि ते न जमल्यास नैराश्य घेरणारच.
 हा रस्ता कुठे घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. परंतु तो सध्यातरी नैराश्य आणि तणावाकडे घेऊन चालला आहे एवढं नक्की. त्यामुळे भेटल्यानंतर सध्या काय चाललंय, या प्रश्नाचं उत्तर आता तरी रूटीन चालू आहे, असंच आहे!



**
काय तर म्हणे, करा स्क्रोल?

एकतर दिवसाच्या 24 तासात फोन हा जवळजवळ आपण 18 तास वापरला जातो. या सगळ्या तासांमधील जास्त वापर हा निव्वळ 
स्क्रोलिंगसाठी होत आहे. या स्क्रोलिंगमध्ये काश्मीरमध्ये 370 रद्द केल्यापासून ते तुमच्या चौकात काल रात्री काय भांडणं झाली या सगळ्याचा तुमच्यावर भडिमार होत असतो. प्रत्येक पाच मिनिटं फोन बाजूला ठेवला की नंतर पुन्हा फोन घेऊन काहीतरी स्क्रोल करण्याची इच्छा होते. एखादा सिनेमा बघायला गेल्यानंतरसुद्धा इंटरव्हलमध्ये आपण आत्तार्पयत काय पाहिलं आणि पुढे काय होणार? याच्या विचारापेक्षा फोनमध्ये इतक्या वेळात काय झालं असेल? याचा विचार आपल्या मनात येतो आणि कळत-नकळत सर्वात आधी फोन चेक केला जातो. 
**
 इमोटिकॉन्सचं रोबोटिक प्रदर्शन

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, इन्स्टाग्राम स्टोरीज पाहिल्यावर आपल्याकडे असं काही टाकण्यासारखं नाही असं जेव्हा वाटू लागतं, तेव्हा आपलं सगळं रूटीन चालू आहे असं फिलिंग यायला लागतं. बरं या स्मार्टफोनच्या न्यूनगंडातून बाहेर आलात तरी समोरचा त्याच न्यूनगंडात असल्यामुळे संवाद साधण्यासाठी कोणी नाही अशी अवस्था. व्हॉट्सअ‍ॅपवरचे संवाद रोबाटिक झाले आहेत. एखाद्याशी संवाद साधत असताना समोरच्या व्यक्तीचे हावभाव, इंटेन्सिटी, शब्दावरचे जोर 
यावरून त्या व्यक्तीच्या म्हणण्याचा आपण अर्थ काढत असतो. त्यावर आपण आपला संवाद साधत असतो. रोबोटिक संवादात भावना कितीपत असतात, असा प्रश्न पडतोच.

( राहुल ऑनलाइन लोकमतमध्ये वार्ताहर आहे.)

Web Title: why youngsters are exhaust & running away from life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.