बाप्पा, सॉरी वी आर बिझी ! गणेश मंडळांत पूर्वी अनलिमिटेड उत्साह होता, आता तो लिमिटेड झालाय, असं का?

By सचिन जवळकोटे | Published: September 12, 2019 07:45 AM2019-09-12T07:45:00+5:302019-09-12T11:25:32+5:30

ज्या मंडपात कधीकाळी तरण्याबांड पोरांचा रात्रभर कलकलाट असायचा, तिथं आता रात्री शुकशुकाट असतो. एखादा दुसरा जुना जाणता वयस्कर पदाधिकारी सोडला तर तरुण कार्यकर्ते आपापल्या घरात. काही तरणी पोरं तर प्रतिष्ठापना मिरवणुकीत ‘सेल्फी’ काढून गेली की थेट विसजर्नालाच पुन्हा मोबाइल घेऊन हजर.

why youth turning their back to Gansh mandlas & why enthusiasm is now less? | बाप्पा, सॉरी वी आर बिझी ! गणेश मंडळांत पूर्वी अनलिमिटेड उत्साह होता, आता तो लिमिटेड झालाय, असं का?

बाप्पा, सॉरी वी आर बिझी ! गणेश मंडळांत पूर्वी अनलिमिटेड उत्साह होता, आता तो लिमिटेड झालाय, असं का?

googlenewsNext
ठळक मुद्देहातातल्या मोबाइलवर पब्जी खेळताना पोरं मंडप-बिंडप विसरत चाललीत.

- सचिन जवळकोटे

1999 

वेळ : रात्री साडेबाराची. स्थळ :  गणेशोत्सव मंडळाचा मंडप. पंधरा ते वीस जण बसलेल़े  पत्त्याचा डाव रंगलाय. पत्ते पिसता-पिसता एक जण सांगत होता,  ‘उद्याची पूजा मेंबरच्या हस्ते हायùù, लवकर उठून हारबीर घेऊन या.’ 
पत्ते उचलत दुसरा होकार देत होता, ‘मी इथंच मुक्कामाला हाय ùù काळजी नग. सकाळी मंडपामागच्या हापशावरच अंघोळ करून समदं सामान आणतू’ 
2019
वेळ : रात्री अकरा. स्थळ :  तोच मंडप. आत फक्त दोनच प्रौढ व्यक्ती. समोरच्या रस्त्यावर खुर्ची टाकून एक पगारी सिक्युरिटी गार्ड निवांत बसलेला. एकानं फोन लावून विचारलं, ‘उद्याची पूजा आमदारांच्या हस्ते हायùù समदी तयारी झाली नव्हं?’. तिकडून स्मार्ट उत्तर आलं, ‘टेन्शन घेऊ नका अंकल. पूजेचं सारं कॉन्ट्रॅक्टच दिलंय मी कॉर्नरवरच्या फुलवाल्याला. व्हॉट्सअ‍ॅपच्या फोटोवरून हारही फायनल केलाय. सकाळची जिम करून आरतीला मंडपात चक्कर मारून जातो आम्ही दोघं-तिघं.’ 
***
अवघ्या वीस वर्षात किती परिस्थिती बदलली बघा. 
स्मार्ट तरुणाईची कशी विचारपद्धती बदलली बघा.
 ज्या मंडपात कधीकाळी तरण्याबांड पोरांचा रात्रभर कलकलाट रहायचा, तिथं आज रात्रीनंतर केवळ शुकशुकाटाचाच मुक्काम. एखादा दुसरा जुना जाणता वयस्कर पदाधिकारी सोडला तर बाकीचे आपापल्या घरात. तरणीताठी पिढी तर केवळ प्रतिष्ठापना मिरवणुकीत ‘सेल्फी’ काढून गेली की थेट विसजर्नालाच पुन्हा मोबाइल घेऊन हजर. 
अवघ्या मराठी मुलखाची स्वतंत्र ओळख म्हणून जगभरात पोहोचलेला गणेशोत्सव म्हणजे उत्साहाला उधाण. दहा दिवस कसे झपाटलेले. गल्ली-बोळातल्या पोराटोरांसाठी तर हा वर्षभरातला सर्वात मोठा इव्हेंट. चाळिशी ओलांडलेल्यांना आजही आपल्या तारुण्यातला गणेशोत्सव आठवला की मन कसं थरारून उठतं. वीस-पंचवीस वर्षापूर्वी ही गोष्ट. उत्सवाच्या पंधरा दिवस अगोदरपासूनच घरातली पोरं गायब व्हायची. सकाळी बाहेर पडली की मध्यरात्रीच घरी परतायची. मंडपातल्या दोरीपासून ते वर्गणीच्या पावतीर्पयत सारी कामं मन लावून करायची. प्रतिष्ठापनेनंतरचे ते दहा दिवस तर जणू स्वप्नवतच. रात्र-रात्र जागून आरास सजविली जायची. वेळप्रसंगी खिशातले पैसे घालून सजावट केली जायची. शेवटच्या तीन दिवसात देखावे पाहण्यासाठी जेवढी गर्दी उफाळायची, तेवढं कष्टाचं चीज व्हायचं. 
आताही तीच मंडळं. तेच मंडप. 
तोच गणपती. 
मात्र देहभान विसरून गणेशोत्सव सोहळ्यात स्वतर्‍ला झोकून देणारी पोरं खूप कमी झालेली. 
उत्साह तोच असला तरी पूर्वीसारखा ‘अनलिमिटेड’ नाही.
मंडपा-मंडपामध्ये अत्याधुनिक यंत्रणा आली असली तरीही काहीतरी हरपलंय, याची रूखरूख जुन्या पिढीला उगाचंच लागून राहिलेली दिसते. त्याचाच शोध घेण्याचा प्रय} आम्ही केला. सोलापुरातले कैक मंडप पालथे घातले.  बर्‍याच तरुणांना  बोलतं केलं. अनेक जुन्या पदाधिकार्‍यांच्या आठवणीतला तो सुवर्णकाळ पुन्हा एकदा जागा केला. त्यातून स्पष्टपणे जाणवत गेलं की, उत्साहाचा तो माहोल सध्याच्या तरुणाईसाठी हळूहळू  परका होत चाललाय. उधाणातला आनंद मुठीतल्या वाळूसारखा निसटत चाललाय.
 का? असं का घडावं?
 याचंही उत्तर शोधण्याचा केला प्रयत्न. 
तेव्हा हाती आली तब्बल आठ कारणं. 
किती योगायोग ना? बाप्पाचा आकडाही आठच. जणू अष्टविनायकच. 
सोलापूरच्या मध्यवर्ती गणेश मंडळाचे ट्रस्टी विजय पुकाळे सांगत होते.
 ‘ मंडपात तरुण पोरं कमी दिसू लागलीत, हे खरंय. त्याला दोन कारणं महत्त्वाची. पहिले एज्युकेशन अन् दुसरे मायग्रेशन!’
1. एज्युकेशन आणि मायग्रेशन
 आजकालच्या पोरांसाठी शाळा-कॉलेजपेक्षाही खासगी क्लासेसचाच इतका भडिमार झालाय की, या मुलांना इकडं-तिकडं पहायलाही वेळ नाही. करिअरच्या वेगात  आजकालची तरुण पिढी इतकी झपाटून गेलीय की, इच्छा असूनही त्यांची पावलं मंडपात थांबत नाहीत. 
2. स्थलांतर
आजकाल सर्वच गावातील मुलांचा ओढा पुण्या-मुंबईकडं. जवळच्या शहरांकडं. सुरुवातीला शिक्षणासाठी अन् नंतर नोकरीसाठी. ही नवी पिढी कायमचीच मोठय़ा शहरात स्थायिक व्हायला निघालीय. कधीतरी वाटलं तर येतात सणाला गावाकडं. मंडपात बाप्पाचं दर्शन घेऊन पुन्हा निघून जातात आपल्या घराकडं.
3. डॉल्बी नाय तर काय मजा?
जी शिकली ती गाव सोडून गेली. जी गावातच राहिली त्यातली बरीच पोरं समाजकारण अन् राजकारणात गुंतली. नेत्यानं डॉल्बी मागवायची. त्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचण्यात पोरं रमली. मात्र गेल्या पाच-सात वर्षापासून डॉल्बीवरही कठोर बंदी आली. तिचा आवाज करकचून आवळला जाताच पोरांचाही मूड ऑफ झाला. जणू उत्सवातला उत्साहच निघून गेला. हेही तिसरं कारण असू शकतं कदाचित. 
4. चिंचोळ्या बोळात एवढासा मंडप
सोलापूरच्या पूर्व भागातलं लोकप्रिय मंडळ म्हणजे ताता गणपती. याचे पदाधिकारी उमेश मामडय़ाल सांगत होते, ‘पूर्वीच्या काळी आपल्या हौसेप्रमाणं मंडप उभारला जायचा. त्याला कसलं लिमिट-बिमिट नव्हतं. भल्या मोठय़ा मंडपात पाचपन्नास पोरं आरामात झोपू शकत होती. गप्पा मारत बसत होती. आता मात्र वाहतुकीच्या नियमांमुळं मंडपाचे आकार झालेत कमी. चिंचोळ्या बोळातल्या इवल्याशा मंडपात बाप्पाच्या मृूर्तीनंच सारी जागा व्यापलेली. त्यामुळं बरीच पोरं आजकाल इकडं फिरकेनाशी झाली. त्यामुळे जागा कमी हे पण एक कारण पोरांच्या उत्साहाला आवर घालतंय.
5. कॉन्ट्रॅक्टर करेल की!
 अजून एक कारण म्हणजे आता इन्स्टण्टचा जमाना. कॉन्ट्रॅक्टरला गुत्तं दिलं की, मंडप लावण्यापासून ते आरास सजवेर्पयत सारी कामं बसल्याजागी बिनबोभाट होतात. कार्यकत्र्याना आता काहीच करायची गरज नाही. पूर्वी तसं नव्हतं. मंडपातल्या बांबूला सुतळी बांधण्यापासून ते थर्माकोलचे शीट कापेर्पयत प्रत्येक गोष्ट कार्यकर्ते करायचे. त्यात खूप कष्ट होते; परंतु तेवढीच मजाही यायची. आता झटपट युगात सारंच बदललंय. घरात बसून मोबाइलवरूनच मांडवाची सारी कामं होताहेत. त्यामुळं पोरांची गर्दी कमी होत चाललीय. तरी नशीब की, सकाळ-संध्याकाळच्या आरतीला तरी बरेच चेहरे मंडपात दिसतात.
6. गणपती आणि गार्ड
मंडपातलं  रेडिमेड प्रॉडक्शन जसं तरुण कार्यकत्र्याला आळशी बनवत गेलं, तसंच रात्रभर जागणारे पगारी सिक्युरिटी गार्ड्सही या परिस्थितीला कारणीभूत ठरले. दहा दिवसांसाठी बारा-पंधरा हजारात गार्ड मिळू लागले. सोबतीला बर्‍याच संवेदनशील ठिकाणी पोलीसही थांबू लागले. सुरक्षेची चिंता मिटली. आपसूकच पोरांची पावलं घरांकडं वळाली. 
7. मंडप रिकामा अन् पोरं घरीùù
 जुळे सोलापुरातल्या ओम गजर्ना मंडळाचे माजी अध्यक्ष योगिराज निंबाळे सांगत होते, ‘पूर्वी मंडपात रात्रभर जागण्याची मर्यादा नव्हती. बंधनं नव्हती. फुल्ल लाउडस्पीकर लावून मंडपात हसत-खेळत बसता येत होतं. मात्र आता रात्रीचे दहा वाजले की, आवाजच बंद. मंडप रिकामा अन् पोरं घरीùù.’ 
सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून कठोरपणे अंमलात आणलेले कायदे मंडळाच्या काही कार्यकत्र्याना जाचक वाटत असले तरीही पोलिसांसाठी नाइलाजच. रात्री दहानंतर एखाद्या मंडपात आवाज सोडाच मोठ्ठी लाइटही भणभणली तरी  पोलिसांची गाडी वाँवùù वाँवùù करीत तिथं आलीच समजायची. 
8. मोबाइल
शेवटचा महत्त्वाचा इश्यू नजरेसमोर आणला बाळीवेसच्या कसबा गणपती मंडळाचे बाळासाहेब मुस्तारे यांनी, ‘पूर्वी सकाळी बाहेर पडलेली पोरं रात्री उशिरार्पयत घरी आली नाहीत तरी घरचे गप्प बसायचे. कारण त्यांच्याशी संपर्क साधायचं साधन होतंच कुठं? आता रात्रीचे साडेसात-आठ वाजले की, मंडपातल्या पोरांचा मोबाइल वाजलाच म्हणून समजा. ताट वाढून ठेवलंय. किती वेळात येतोस? अशी विचारणा मोबाइलवरून झाली की, पोरं घराकडं पळालीच.’
या मोबाइलनंही मंडपातली बरीच पोरं कमी केलीत बरं का. पूर्वी पत्ते कुटायला किंवा कॅरम खेळायला पोरं एकत्र जमायची. मात्र आता मनोरंजनाची साधनं बदलली. हातातल्या मोबाइलवर पब्जी खेळताना पोरं मंडप-बिंडप विसरत चाललीत. व्हिडीओ न्याहाळताना आरासलाही भुलली. अजून एक महत्त्वाचं म्हणजे सजावट पहायला येणार्‍या पोरा-पोरींचीही गर्दी कमी झाली. कारण एखाद्यानं या हलत्या देखाव्याचं मोबाइल रेकार्डिग करून मित्र-मैत्रिणींना फॉरवर्ड केलं की, चॅप्टर क्लोज. कोण कडमडायला जातंय तिकडं गर्दीत. नाही म्हणायला मंडपात बाप्पासोबत किमान सेल्फी काढायला तरी जमताहेत ही पोरं. हेही नसे थोडकं. गणपती बाप्पा मोरयाùù

****

मंडळ नको.  वर्गणी नको.  झंझट नको!


‘पूर्वी मंडपात दिसणारी तरुण पावलं आता कमी का झाली?’ याचा शोध घेता-घेता एका गंभीर मुद्दय़ावर बोलताना मात्र बरेचजण स्तब्ध झाले. सांगण्याची इच्छा असूनही आपली भावना व्यक्त करताना अडखळले. 
तरीही प्रत्येकाच्या तुटक तुटक बोलण्यातले संदर्भ जुळवत गेल्यानंतर तो एक मुद्दा हळूहळू आकार देत गेला. पूर्वीच्या काळी हक्कानं वर्गणी मागितली जायची. दुकानदाराच्या हातात अगोदरच रकमेचा आकडा टाकलेली पावती ठेवली जायची. मात्र अलीकडच्या काळात यावरून अनेक ठिकाणी  वाद झाले. वादंग झाले. पोलीस ठाण्यात गुन्हेही रंगले. केवळ वर्गणीसाठी पुढे आलेले हात खंडणीच्या गुन्ह्यात जेरबंद झाले. कैकजणांचं शिक्षण खुंटलं. करिअर पुरतं मातीमोल झालं. अनेकांच्या नोकर्‍यांवर गंडांतरही आलं. तेव्हापासून ‘मंडळ नको. वर्गणी नको. अन् कसलं झंझटही नको!’ म्हणत सुशिक्षित तरुण पिढी मंडपालाच टाळू लागली.

     

(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत निवासी संपादक आहेत.) 

 

Web Title: why youth turning their back to Gansh mandlas & why enthusiasm is now less?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.