पहा नायगारात शिकणार्‍या भारतीय मुलांचं चविष्ट जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:24 PM2018-10-04T16:24:21+5:302018-10-04T16:25:02+5:30

नायगारातला धबधबा जगप्रसिद्धच. पण इथं जगभरातनं विद्याथ्र्याचा धबधबा येतो. आणि मग ही मुलं शिकतातही, शिजवतातही आणि त्यातून कमवतातही.

world of Indian students in Niagara | पहा नायगारात शिकणार्‍या भारतीय मुलांचं चविष्ट जग

पहा नायगारात शिकणार्‍या भारतीय मुलांचं चविष्ट जग

Next

-अर्चना मिरजकर

समजा तुम्हाला नवीन नवीन पदार्थ खायला आवडतात. आणि समजा आवडणारे पदार्थ करून इतरांना खायला घालायलाही आवडतात. मग तुम्ही जर शेफ झालात किंवा तुम्ही जर स्वतर्‍चं रेस्टॉरण्ट उघडलंत तर? आवडीचं काम जर व्यवसाय म्हणून स्वीकारलं, केलं तर कामाचा कधीच कंटाळा येत नाही, असं आधुनिक मानसशास्त्न सांगतं. आता कल्पना करा, की तुमचं हे उपाहारगृह जगाच्या एका अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे, आणि तिथं जगभरातून लाखो लोक दर वर्षी येतात.
अगदी हेच स्वप्न पूर्ण झालंय कॅनडात शिकायला गेलेल्या काही भारतीय विद्याथ्र्याचं. जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याच्या काठावर वसलेल्या पर्यटक नगरीत त्यांनी सुरू केलेल्या उपाहारगृहाच नाव आहे मोक्ष. या उपाहारगृहातील अस्सल भारतीय खाद्य पदार्थाना नायगारा पहायला येणार्‍या पर्यटकांकडून भरपूर मागणी आहे. पारदर्शक बरण्यामध्ये भरून ठेवलेले भारतीय मसाले आणि खमंग वास यामुळे इथं येणारे पर्यटक या हॉटेलकडे आकृष्ट होतात आणि इथले पदार्थ चाखल्यावर वरचेवर इथे येतात. 
हे विद्यार्थी आहेत नायगारा कॉलेजचे. नायगारा ऑन द लेक नावाच्या ओन्तरिओ सरोवराकाठी वसलेल्या सुंदर गावात हे कॉलेज आहे. या कॉलेजात आरोग्यसेवा, उद्योग, आतिथ्य आणि पर्यावरण अध्ययन, आहार आणि  मद्य या शाखांमध्ये अनेक विषयात डिग्री, डिप्लोमा आणि  सर्टिफिकिट कोर्सेस करता तरुण मुलं येतात. यातील आरोग्यसेवांपैकी नर्सिग आणि आतिथ्य सेवांपैकी हॉटेल व्यवस्थापन, पाकशास्त्न, मद्य शास्त्न हे कोर्सेस भारतीय विद्याथ्र्यामध्ये लोकप्रिय आहेत. डिग्री कोर्सेस सप्टेंबरमध्ये तर डिप्लोमा आणि सर्टिफिकिट कोर्सेस जानेवारी आणि मे महिन्यात सुरू होतात. यावर्षी सप्टेंबर महिन्यात दीड हजार नवीन भारतीय विद्यार्थी नायगारा कॉलेजात विविध विषय शिकण्यासाठी आले.
इथे येणार्‍या भारतीय विद्याथ्र्याना भासणारी सर्वात मोठी समस्या कोणती असं विचारलं तर अंशुमन या कोलकात्याहून आलेल्या विद्याथ्र्यानं सांगितलं की, इथल्या थंडीची सवय करून घेणं सर्वात कठीण असतं. हॉटेल व्यवस्थापन शिकण्यासाठी पश्चिम बंगालमधून अंशुमन जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच कॅनडाला आला. 
‘कॉलेज आणि होस्टेलची इमारत उबदार असली तरी बाहेर जीवघेणी थंडी असते. अशी थंडी मी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती,’ असं अंशुमन सांगतो. 
परंतु एकदा इथल्या वातावरणाची सवय झाली की इथं शिकणार्‍या विद्याथ्र्यासाठी एक नवीन विश्व उलगडत जातं. इथल्या अभ्यासक्रमाच्या बळावर, त्यांना जगात कुठेही नोकरी मिळू शकते. डिग्री अभ्यासक्र म करणार्‍या विद्याथ्र्याना आठवडय़ातून वीस तास काम करण्याची परवानगी असते. पाकशास्त्नाच्या शाखेतील विद्यार्थी नायगारा धबधब्याच्या काठावर असणार्‍या मोक्षसारख्या अनेक उपाहारगृहांमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत तर होतेच; पण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या हॉटेलांमध्ये काम करण्याचा अनुभवही मिळतो. पुढे नोकरी मिळण्यासाठी हा अनुभव उपयोगी ठरतो.
सप्टेंबरच्या सुरुवातीला मी नायगारा कॉलेजला भेट दिली तेव्हा मला अनेक भारतीय विद्यार्थी भेटले. हिमाचल प्रदेशमधून आलेली अनुष्का नर्सिगचा कोर्स करत होती तर पाटण्याहून आलेला राजेश वाइनरीचा कोर्स करत होता. नायगारा प्रदेशातील वाइनला जगभर मागणी आहे. विशेषतर्‍ अमेरिकेत इथल्या वाइन प्रसिद्ध आहेत. ओन्तरिओ आणि एरी या दोन प्रचंड सरोवराच्या मध्ये असलेल्या नायगारा प्रदेशाची सुपीक जमीन द्राक्षांच्या लागवडीसाठी उत्तम आहे. इथे अनेक जातींची द्राक्षं, पीच, स्टॉबेरी आणि चेरी यासारख्या फळांचे उत्पादन करून त्यापासून उत्तम प्रतीची वाइन तयार केली जाते. संपूर्ण प्रदेशात अशा अनेक वाइनरी आहेत. पर्यटकांना तिथे जाऊन मद्यांचा आस्वाद घेता येतो आणि वाइन तसंच वाइनपासून बनवलेली चॉकलेट विकत घेता येतात.
नायगारा कॉलेजची अद्ययावत वाइनरी आहे. इथे वेगवेगळ्या घटकांमुळे बदलणारी मद्याची चव, त्याचे रंग प वगैरे गुणधर्म शिकवणारी आधुनिक प्रयोगशाळा आहे, बिअर कशी तयार करायची हे शिकवण्यासाठी ब्रेवरी आहे, आणि अनेक एकर पसरलेल्या द्राक्षांच्या व इतर फळांच्या बागा आहेत. 
या निसर्गरमणीय ठिकाणी वसलेल्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षणाबरोबरच जगभरचे मित्नमैत्रिणी आणि एक अनोखा अनुभवविश्व विद्याथ्र्याना मिळू शकतो. भारतीय खाद्य परंपरेची चांगली बैठक असेल आणि अन्न उत्पादन, ते खाण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, त्यांचं सादरीकरण आणि या सर्वाशी संबंधित उद्योग-व्यापार याचं शास्त्नशुद्ध शिक्षण मिळालं तर भारतीय विद्याथ्र्याना आपलं पाकशास्त्न कॅनडासारख्या वैविध्याने नटलेल्या देशात लोकप्रिय करण्यात काहीच अडचण येणार नाही.    


 

Web Title: world of Indian students in Niagara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.